पुणे : पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून रात्री भयंकर उकाडा जाणवतोय. आपल्याला पंखा किंवा ‘एसी’ लावल्याशिवाय झोपणं शक्यच होत नाही. याचं कारण, शहरात चार वर्षांमधील किमान तापमानात वाढ होत आहे. इतकंच नाही तर, दशकांतील फेब्रुवारी महिन्यातील सहावे उच्चांकी किमान तापमान नोंदले गेले असल्याची माहिती हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.
शहरात गेल्या दोन दिवसांपासून आकाशात ढगांची गर्दी झाली आहे. त्याचा थेट परिणाम किमान तापमानावर झाला आहे, असेही खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले. फेब्रुवारीमध्ये किमान तापमान वाढायला सुरुवात होते. सरासरी ११.४ अंश सेल्सिअसपर्यंत किमान तापमानाची नोंद पुण्यात होते.
रात्रीचा उकाडा वाढला
पुण्यात २०१४ ते २०२४ या दहा वर्षांमध्ये फक्त सात वेळा किमान तापमानाने १८ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त उसळी मारली आहे. यात या दशकातील फेब्रुवारीमध्ये सर्वाधिक किमान तापमान २० फेब्रुवारी २०१६ रोजी २०.५ अंश सेल्सिअस नोंदले गेले. हे या या दशकातील फेब्रुवारीमधील उच्चांकी किमान तापमान आहे. त्या आधी २१ फेब्रुवारी २०१६ मध्ये १९.५ आणि २२ फेब्रुवारी २०१९ मध्ये १९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यानंतर गेली चार वर्षे किमान तापमानाचा पारा १७.५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदला गेला नव्हता. २०२०मध्ये १७.२, २०२१ मध्ये १६.७, २०२२ मध्ये १५.९ आणि २०२३ मध्ये १४.८ अंश सेल्सिअस इतके फेब्रुवारीमधील उच्चांकी किमान तापमान होते. त्यानंतर या वर्षी सलग दोन दिवस किमान तापमानाचा पारा १८ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदला गेला. त्यामुळे पुण्यात रात्रीचा उकाडा वाढत आहे, अशी माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली.
४८ तासांमध्ये सात अंशांनी वाढ
शहरात रविवारी (ता. २५) किमान तापमान सरासरीपेक्षा (१३.३ अंश सेल्सिअस) कमी होऊन १०.९ अंश सेल्सिअस नोंदले गेले. अवघ्या दोन दिवसांमध्ये किमान तापमानाच्या पाऱ्याने मंगळवारी (ता. २७) १८.२ अंश सेल्सिअसपर्यंत उसळी मारली. बुधवारीदेखील (ता. २८) किमान तापमान १८.१ अंश सेल्सिअस होते, असे खात्यातर्फे सांगण्यात आले.
उकाडा वाढला, कारण
शहरात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण झाले आहे. त्यामुळे किमान तापमानात अचानक वाढ झाली. बंगालच्या उपसागरातून येणारे बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राच्या दिशेने वहात आहेत. त्यामुळे ढगाळ वातावरण झाले आहे. तसेच, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे उत्तरेतून येणारे थंड आणि कोरडे वारे महाराष्ट्रावर येत आहेत. त्याचाही परिणाम उत्तर आणि मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भावर होत आहे. त्यामुळे तेथे ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडत आहे. काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यताही हवामान खात्याचे शास्त्रज्ञ डॉ. अनुपम काश्यपी यांनी व्यक्त केली.
फेब्रुवारीमधील उच्चांकी
किमान तापमान
(अंश सेल्सिअसमध्ये)
२९ फेब्रुवारी २०१६ २०.५
२१ फेब्रुवारी २०१६ १९.५
२२ फेब्रुवारी २०१९ १९.२
२२ फेब्रुवारी २०१६ १८.८
१७, १८ फेब्रुवारी २०१४ १८.६
२७ फेब्रुवारी २०२४ १८.२
२८ फेब्रुवारी २०२४ १८.१
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.