पुणेः लोहगाव विमानतळ सलग १५ दिवस बंद राहणार असल्यामुळे पुणे शहरातील उद्योग, पर्यटन, शैक्षणिक, आरोग्याच्या आर्थिक चक्रावर विपरीत परिणाम होत आहे. धावपट्टी दुरुस्तीसाठी विमानतळ बंद ठेवण्याची घोषणा किमान एक-दोन महिन्यापूर्वी करण्याची गरज होती, असे तज्ज्ञांचे आणि प्रवाशांचे म्हणणे आहे. सहली, दौरे, तसेच प्रवासाचे बेत ऐनवेळी मोठ्या प्रमाणात बदलावे लागणार असल्यामुळे प्रवाशांचे लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे. धावपट्टीची दुरुस्ती करण्यासाठी लोहगाव विमानतळ १६ ते २९ ऑक्टोबर बंद ठेवण्याची घोषणा हवाई दलाने केली आहे. मात्र, पुण्यातून कोरोना प्रतिबंधक लस पाठविण्यावर परिणाम होणार नाही, त्या बाबत उपाययोजना करण्यात येतील, असेही हवाई दलाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, अचानक विमानतळ बंद करण्याची घोषणा अचानक झाल्यामुळे प्रवाशांचे तीव्र पडसाद सोशल मीडियावरही पडसाद मोठ्या प्रमाणावर दिवसभर उमटत होते. विमानतळावर कार्गोचे काम अजून होत नाही, नियोजित पुरंदर विमानतळ रखडलेला, विस्तारीकरणाचे काम मंदगतीने सुरू असल्याबद्दलही पुणेकरांच्या संतप्त प्रतिक्रिया त्यावर उमटत होत्या.
पर्यटनासाठी सप्टेंबरअखेर ते फेब्रुवारीपर्यंत हंगाम असतो. तसेच जून-जुलैमध्ये विमान कंपन्यांच्या ऑक्टोबरच्या प्रवासासाठी आकर्षक ऑफर्स असतात. त्यामुळे विमान तिकिटाचे आरक्षण करून प्रवासी सहलींचे नियोजन करतात. आता त्यांना सहलीचे बेत बदलावे लागतील. त्यातून त्यांचे आर्थिक नुकसान होतील. या काळात उद्योग-व्यवसाय वाढतात. त्यांच्या प्रतिनिधींना वारंवार प्रवास करावा लागतो. त्यांचेही आता व्यावसायिक नुकसान होणार आहे. विद्यार्थी ये-जा करतात. त्यांचीही गैरसोय होणार आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्योग-व्यवसाय आणि सेवा क्षेत्र स्थिरसावर होत असताना १५ दिवस विमानतळ बंद राहणार असल्यामुळे त्यांनाही आता जबर फटका बसणार आहे.
काय होते उपाय?
- कोरोनाच्या काळात विमानतळावरील वाहतूक तीन महिने अत्यल्प असताना दुरुस्ती
- विमानतळ बंदची घोषणा किमान एक महिन्यापूर्वी करणे
- पुण्यातील हवाई वाहतूक मुंबई किंवा शिर्डी विमानतळावरून वळविणे
- विमानतळावरून प्रवाशांची वाहतूक मुंबई, शिर्डी विमानतळावर करणे
१३ वर्षांपूर्वीही १५ दिवस विमानतळ बंद
लोहगाव विमानतळ या पूर्वीही १२ ते २६ फेब्रुवारी २००८ मध्ये १५ दिवस बंद होता. विमान वाहतुकीमुळे १०-१२ वर्षांनंतर धावपट्टीची देखभाल दुरुस्ती करावीच लागते. धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम गेल्यावर्षी २६ ऑक्टोबरपासून सुरू झाले असून तेव्हापासून विमानतळ रात्री ८ ते सकाळी ८ बंदच आहे. यंदा २६ एप्रिल ते ९ दरम्यान दुरुस्ती होणार होती. परंतु, त्या काळात ती झाली नाही.
कोण काय म्हणतात?
१) डॉ. सुधीर मेहता मेहता (अध्यक्ष, एमसीसीआयए) - शहरात वाहतूक कोंडी, १५ दिवस विमानतळ बंद ही भीषण परिस्थिती आहे. पुण्याला कोणी वाली आहे की नाही?
२) धैर्यशील वंडेकर (हवाई वाहतूक विश्लेषक) ः नियोजन करून प्रवाशांना पुरेशी पूर्वकल्पना देऊन विमानतळ बंद ठेवणे शक्य होते.
३) किरण पाटील (निवृत्त वरिष्ठ व्यवस्थापक, एअर इंडिया) ः तिकीट रीरूट करणे, बुकिंग बदलणे, प्लॅन बदलणे याचा मोठा आर्थिक फटका प्रवाशांना बसणार.
४) नीलेश भन्साळी (देवम टूर्स) - प्रवाशांना रिफंड मिळाला तरी, नवी तिकिटे चढ्या दराने खरेदी करावी लागणार. पुरेसा वेळ न मिळाल्याने प्रवाशांची ओढाताण होत आहे.
संतप्त पुणेकर म्हणतात...
- ग्लोबल म्हटले जाणारे पुणे १५ दिवस विमान वाहतुकीपासून डस्कनेक्ट कसे ?
- सणासुदीच्या काळात विमान वाहतूक बंद झाल्याने नागरिकांचा संताप
- देशातील महत्त्वाचे शहर असूनही पुण्यात पर्यायी विमानतळ नाही
- पर्यायी धावपट्टी, धावपट्टीची लांबी वाढविण्याकडे लक्ष कसे नाही ?
- लोहगाव विमानतळाचे विस्तारीकरण आणि आणि नियोजित पुरंदर विमानतळाच्या केवळ घोषणाच
विमानतळाची सध्याची वाहतूक
- रोजची विमानांची वाहतूक - ५८ ते ६०
- रोजची प्रवाशांची ये-जा - १५-१८ हजार
- पुण्यातील विमानाने जोडली गेलेली शहरे - २५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.