पिंपरी : १९७० च्या दशकात नगरपालिका असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराला श्रीमंत बनविण्यात सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तर तो म्हणजे बजाज उद्योगसमूहाचा अर्थात राहुलकुमार बजाज यांचा. पिंपरी चिंचवडच्या मातीशी एकरूप झालेले व या शहरातच वास्तव्यास असलेले बजाज या शहराचे नागरिक होते याचा सार्थ अभिमान शहरवासियांना निश्चित आहे. दुचाकी उत्पादनात जगातल्या सर्वोच्च तीनच्या उदयोगपतींमध्ये त्यांचे यांचे स्थान असले तरी गांधी विचारधारा रुजविणारे व लोकशाही परंपरा याचे पालन आपल्या आचरणातून करणारे उद्योगपती म्हणूनही ते प्रसिध्द होते. लोकसभा, विधानसभा असो की, पिंपरी महापालिका निवडणूक आकुर्डी येथील कमलनयन स्कुलमधील मतदान केंद्रावर कुटुंबासह मतदान करायला येणारे राहुल कुमार बजाज या शहराने तब्बल ५० वर्षे पाहिले.
हमारा बजाज’ ही टॅगलाईन असलेल्या व भारतातील रस्त्यांवर स्कुटर आणून इतिहास घडविलेल्या बजाज स्कुटर निर्मितीला ८ डिसेंबर २०२१ रोजी नुकतीच साठ वर्ष पूर्ण झाली. पिंपरी-चिंचवड शहराला जगात ओळख मिळाल्याची हे ऐतिहासिक स्मरण ठरले. जेव्हा हे शहर अस्तित्वातही नव्हते, तेव्हा फक्त आकुर्डीत सुरू झालेला एक कारखाना अशीच ओळख बजाज कंपनीची होती. खेडेगाव असलेल्या आकुर्डीतील खंडोबाच्या पालाजवळ (आताचा खंडोबा माळ चौक) एक कंपनी सुरू झाली आहे, एवढीच माहिती त्या काळात लोकांना होती. आकुर्डीतील सुमारे १४८ एकर जागेत कंपनी विस्तारलेली आहे.
१९५९ मध्ये भारत सरकारने दुचाकी (स्कुटर) व तीन चाकी रिक्षा निर्मितीला बजाज कंपनीला परवानगी दिली .आणि ८ डिसेंबर १९६१ ला पहिली स्कुटर आकुर्डीतील कारखान्यातून बाहेर पडली. जाहिरात व प्रचाराची कुठलीच साधने नसताना भारतीय लोकांना स्कुटरसाठी ‘दिवाने’ केले होते. १८०० रूपयांना व्हेस्पा नावाने आलेल्या या बजाज स्कुटरने पुढे खऱ्या अर्थाने १९७१ साली कात टाकली. महाराणा प्रताप यांच्या ‘चेतक’ नावाच्या घोडयावरून बजाज यांनी आपल्या स्कुटरला ‘चेतक’ नाव दिले आणि इतिहास घडण्यास सुरूवात झाली. मध्यमवर्गीयांना आपले शेवटचे स्वप्न कोणते? असे विचारले तर ते स्कुटर म्हणत. इतका दबदबा व मार्केट या स्कुटरने तब्बल तीन दशके मिळविले.
याच बजाज कंपनीमुळे व नंतरच्या टाटा मोटर्समुळे तेव्हाची पिंपरी-चिंचवड नगरपालिका आशिया खंडात श्रीमंत म्हटली गेली. जकातीच्या अवाढव्य उत्पन्नामुळे प्रचंड गब्बर व लठ्ठ झालेली ही नगरपालिका पुढे इतकी मोठी झाली की, आज राज्यातल्या प्रमुख दहा शहरांमध्ये पाचव्या क्रमांकावर पिंपरी-चिंचवडचा उल्लेख होतो.
शहराच्या विकासात व वाढीमध्ये बजाज यांनी खऱ्या अर्थाने ‘चार चाँद’ लावले. म्हणूनच पिंपरी-चिंचवडची पहिली ओळख ही औद्योगिक नगरी म्हणून सांगितली जाते. जगात बजाजचा कारखाना कुठे? तर तो पिंपरी-चिंचवडमध्ये, असे अभिमानाने सांगितले जाते. व गाच्या नकाशावर या शहराला नेणाऱ्यांमध्ये बजाज यांचा म्हणूनच सिंहाचा वाटा आहे. आपले कामगार, वैयक्तिक कर्मचारी तसेच अन्य स्टाफ यांच्याशी ममतेने वागणे हे त्यांचे गुण वैशिष्टय होते.
बजाज कंपनीतील कामगारांना बॅंका आनंदाने गृह कर्ज असेल किंवा कसलेही कर्ज तात्काळ मंजूर करत. लग्नासाठी सोयरीक जमवायची असेल तर बजाजच्या कामगाराला शंभर पैकी शंभर गुण मिळत. जावई किंवा पोरगा बजाजमध्ये असल्याचा अभिमान गावाला, कुटंबाला असायचा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.