Pune News : रस्त्यावरची खडी, माती उचलणार कोण?; क्षेत्रीय कार्यालये, मलनिःस्सारण विभागात हद्दीचा वाद

शहरात मुसळधार पावसामुळे दाणादाण उडाली. रस्त्यांना नदीचे स्वरूप आले, तर चौकाचौकांत प्रचंड पाणी जमा झाल्याने भयानक स्थिती निर्माण झाली होती.
shivajinagar road condition
shivajinagar road conditionsakal
Updated on

पुणे - शहरात मुसळधार पावसामुळे दाणादाण उडाली. रस्त्यांना नदीचे स्वरूप आले, तर चौकाचौकांत प्रचंड पाणी जमा झाल्याने भयानक स्थिती निर्माण झाली होती. पाऊस थांबल्यानंतर रस्त्यावरील पाणी ओसरले आहे. पण पावसाच्या पाण्यासोबत वाहून आलेली खडी, माती, वाळू रस्त्यावर पसरल्याने दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच धूळ उडत असल्याने चालकांना वाहन चालविणे अवघड होत आहे. परंतु, महापालिका क्षेत्रीय कार्यालये आणि मलनिःस्सारण विभागात हद्दीचा वाद लागल्याने रस्ते स्वच्छ करण्याकडे दुर्लक्ष होत आहे.

शहरातील रस्ते झाडण्यासाठी महापालिका दरवर्षी कोट्यवधी रुपयांची निविदा काढते. क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून ही कामे केली जातात. दररोज रस्ते झाडणे, स्वच्छ करणे, कचरा उचलणे अशी कामे ही ठेकेदाराकडून करून घेतली जातात. त्याच प्रमाणे महापालिकेचे सुमारे साडेसात हजार कर्मचारी रस्ता झाडण्याचे काम करतात. मलनिःसारण विभागाकडून रस्त्यावरील पावसाळी गटार, सांडपाण्याचे गटार यांची स्वच्छता केली जाते. चेंबर व त्याच्या भोवती जमा होणारा कचरा, माती, खडी उचलून टाकणे ही पावसाळी गटार साफ करणाऱ्या ठेकेदाराची जबाबदारी आहे.

शहरात ४ जूनला मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे बहुतांश सर्वच भागातील रस्ते पाण्याखाली गेले. त्यावेळी मोठ्या प्रमाणात खडी, माती, वाळू यासह अन्य कचरा वाहून आला. रस्त्यावर ज्या ठिकाणी खोलगट भाग आहे अशा ठिकाणी माती, खडी जमा झालेली होती. त्यानंतर शनिवारी (ता. ८) पुन्हा एकदा पावसाने पुण्याला तडाखा दिला. अनेक भागात घरांमध्ये, दुकानांमध्ये पाणी शिरले, पावसाळी गटारांचे चेंबर कचऱ्याने भरले. त्यावेळी वेळेवर मदत न मिळाल्याने आपत्ती व्यवस्थापनाची पोलखोल झाली. पाऊस ओसरल्यानंतर महापालिकेची यंत्रणा कामाला लागली.

रविवारी सकाळपासून शहरात चेंबर दुरुस्त करणे, कचरा उचलणे, पाणी साचलेल्या ठिकाणी पंप लावून पाण्याचा निचरा करणे, गाळ काढणे अशी कामे महापालिका करत आहे. पण रस्ते झाडण्यासाठी मोठी यंत्रणा असूनही खडी, माती काढली जात नसल्याने रस्त्यावर धूळ उडत असल्याने वाहनचालकांना गाडी चालविताना त्रास होत आहे. शिवाय रस्त्यात पडलेल्या खडीमुळे दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढले आहे, वाहतुकीचा खोळंबा होत आहे.

क्षेत्रीय कार्यालयाकडे झाडणकाम करणारे कर्मचारी माती, खडी झाडून काढत नाहीत. राडारोडा उचलण्यासाठी जी निविदा काढली आहे, त्यांच्याकडून हे काम करून घेतले जाते. आमचे हे काम नाही असे सांगून हात झटकले जात आहेत. तर पावसाळी गटार साफ करणाऱ्या ठेकेदारांकडून आम्ही केवळ चेंबर स्वच्छ करणार असे सांगून काम टाळले जात आहे. महापालिका प्रशासनाचे हे सामुहिक काम करताना प्रत्येक विभाग काम टाळत असल्याने त्याचा त्रास पुणेकरांना सहन करावा लागत आहे.

‘क्षेत्रीय कार्यालय, परिमंडळाकडून रस्त्यांची दैनंदिन स्वच्छता, झाडणकाम केले जात आहे. पावसामुळे वाहून आलेली माती, खडी उचलण्यास सांगितले आहे. रस्ते लवकर खडी व माती मुक्त करण्यासाठी पुन्हा एकदा सूचना दिल्या जातील.’

- संदीप कदम, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग

याकडे प्रशासनाचे अजूनही लक्ष नाही

  • खडकी येथे नवीन रस्त्याची खडी उखडली आहे

  • रेंजहिल्स येथील नव्या रस्त्यावर खडी

  • गणेशखिंड रस्त्यावर चतुःशृंगी चौकात सांडपाणी

  • वडारवाडी येथील होमी बाबा चौक येथे चेंबर तुंबले

  • भांडारकर संस्थेसमोर रस्त्यावर माती, खडी

  • वाकडेवाडी भुयारी मार्गात मातीमुळे चिखल

  • सेनापती बापट रस्त्यावर ठिकठिकाणी माती जमा

  • राजाराम पुलावर पाणी तुंबत आहे, पुलावर खडी

  • बिबवेवाडी रस्त्यावरील खडी, माती काढलेली नाही

  • कात्रज डेअरी, सातारा रस्त्यावरही माती

  • पटवर्धन बाग, एरंडवणे, भागातही माती साचली आहे.

  • पेठांमध्ये मुख्य रस्‍त्यांवर माती पसरली आहे

  • संपूर्ण सिंहगड रस्‍त्यावर कचरा आणि खडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.