मागितले पाणी, मिळाली नोटीस!

पुणे महापालिकेने समान पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत सुमारे एक लाख मिळकतींना मीटर बसविले आहेत. त्याआधारे अनेक नागरिकांना अतिरिक्त पाणी वापरत असल्याबाबतच्या नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत.
Pune Municipal Corporation
Pune Municipal Corporationsakal
Updated on
Summary

पुणे महापालिकेने समान पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत सुमारे एक लाख मिळकतींना मीटर बसविले आहेत. त्याआधारे अनेक नागरिकांना अतिरिक्त पाणी वापरत असल्याबाबतच्या नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत.

महापालिकेने समान पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत सुमारे एक लाख मिळकतींना मीटर बसविले आहेत. त्याआधारे अनेक नागरिकांना अतिरिक्त पाणी वापरत असल्याबाबतच्या नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत; पण त्यात गंभीर चुका झाल्यामुळे संबंधितांना अकारण मनस्ताप झाला आहे...

पुणे महापालिकेसाठी जलसंपदा विभागाने खडकवासला धरण प्रकल्पातून वार्षिक साडेअकरा अब्ज घनफूट (टीएमसी) पाण्याचा कोटा मंजूर केला आहे. प्रत्यक्षात वापर मात्र सुमारे दीडपट होत आहे. त्यामुळे शहरात पाण्याचा बेसुमार अपव्यय होत असल्याचा आक्षेप जलसंपदा विभाग आणि या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या ग्रामीण भागातून घेतला जातो.

तीन लाख पाणीमीटरचे उद्दिष्ट

पुण्यासाठी खडकवासल्यातून सध्या सुमारे १८ टीएमसी पाणी वर्षभरात उचलले जात आहे. मात्र त्यांपैकी प्रत्यक्षात किती पाणी नागरिकांपर्यंत पोचते, हा संशोधनाचा विषय आहे. कारण मंजूर कोट्यापेक्षा जास्त पाणी घेऊनही, शहरातील मध्यवस्तीपासून कात्रज, कोंढव्यासारख्या उपनगरांपर्यंत पाणीटंचाईविषयीची ओरड नेहमी ऐकू येते. मग हे ‘जास्तीचे’ पाणी जाते तरी कोठे?.. त्याचा शोध घेण्यासाठी, घरनिहाय वा सोसायटीनिहाय अधिकृत माहिती जाणून घेण्यासाठी त्या ठिकाणी पाण्याचे मीटर बसविणे, हा चांगला मार्ग आहे. त्यानुसार, समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत तीन लाख, १८ हजार मीटर बसविले जाणार आहेत. त्यांपैकी एक लाख मीटरचे काम पूर्ण झाले आहे.

मीटरवरील नोंदींचा आढावा

आता या मीटरवरील नोंदी तपासून त्यांचा आढावा घेतला जात आहे. महापालिकेच्या आकडेवारीनुसार, १० टक्क्यांपेक्षा जास्त ग्राहक, निर्धारित प्रमाणापेक्षा जास्त- म्हणजे प्रतिव्यक्ती प्रतिदिन १५० लिटरपेक्षा जास्त पाणी वापरत आहेत. या मिळकतधारकांना महापालिकेने नोटिसा पाठवायला सुरूवात केली आहे.

पाण्याचा अपव्यय होत असलेल्या ठिकाणी ही कारवाई होत असेल, तर त्याबद्दल तक्रार असण्याचे कारण नाही. मात्र, या नोटिसा काढण्यात बऱ्याच ठिकाणी घोळ झाला असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत.

जखमेवर मीठ चोळण्याचे काम

उदा. कात्रज, कोंढवा रस्ता परिसरातील अनेक सोसायट्यांना गरजेच्या तुलनेत अत्यंत कमी पाणी मिळते. ‘पाणीवितरणात सुधारणा करा,’ अशी मागणी तेथील रहिवासी सातत्याने करीत आहेत. त्यासाठी त्यांनी आंदोलनेही केली आहेत. त्याची दखल घेण्याऐवजी, ‘तुम्ही पाण्याचा अतिरिक्त वापर करीत आहात. तो १५ दिवसांत नियंत्रित करावा. अन्यथा तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल,’ असा इशारा देणारी नोटीस त्यांना पाठविण्यात आली आहे!... ज्यांना आपली गरज भागविण्यासाठी खासगी टँकर मागवावे लागत आहेत, अशा मिळकतधारकांना ही नोटीस देणे, म्हणजे एखाद्याच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे.

नोटीसमध्ये चुकीची माहिती

या चुका तरी किती प्रकारच्या असाव्यात?.. एका सोसायटीला पाठविण्यात आलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे, की ‘तुमच्या इमारतीत पाच कुटुंबे राहात असून, एकूण लोकसंख्या १४ आहे. तुम्ही जास्त पाणी वापरत आहात.’ प्रत्यक्षात या इमारतीत २७ सदनिका असून, रहिवाशांची संख्या शंभरपेक्षा जास्त आहे. ही चूक अपवादात्मक नाही. अनेकांना अशा नोटिसा अकारण देण्यात आल्या आहेत.

नाव एक, पत्ते वेगवेगळे

अनाकलनीय दुसरी बाब म्हणजे, एकाच व्यक्तीच्या नावे; पण वेगवेगळ्या सोसायट्यांच्या पत्त्यावर नोटिसा पाठविल्या गेल्या आहेत. याखेरीज, नाव एकच; परंतु इंग्रजी स्पेलिंगमध्ये एखाद्या अक्षराचा बदल करून या व्यक्ती वेगवेगळ्या असल्याचे दाखवून त्यांना स्वतंत्र नोटिसा देण्याचा प्रकार झाला आहे. त्यामुळे या नोटिसा बजावण्याचे काम ज्यांच्यावर सोपविण्यात आले आहे, ते स्थानिक कर्मचारीही गोंधळात पडले आहे. नोटिशीत नमूद केलेल्या काही सोसायट्या नेमक्या कोठे आहेत, याची कल्पना त्यांनाही नाही!

४६०० मिळकतींना नोटिसा

महापालिकेने सुमारे ४६०० नोटिसा आतापर्यंत पाठविल्या आहेत. त्यांत अनेकांच्या बाबतीत अशा त्रुटी आढळल्या आहेत. परिणामी, ही संपूर्ण प्रक्रियाच वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांना चाप बसविणे, हा महापालिकेचा उद्देश स्वागतार्ह आहे. मात्र त्यासाठी ही माहिती संकलित करताना, तिचे विश्‍लेषण करताना पाणीपुरवठा विभागाने गंभीर चुका केल्या आहेत. त्यांत तातडीने दुरुस्ती न केल्यास, समान पाणीपुरवठ्याच्या चांगल्या हेतूवर पाणी पडल्यासारखे होईल.

पाण्याचा सुकाळ आणि मीटरही नाही!

कात्रज-कोंढवा रस्ता परिसरात काही ठरावीक सोसायट्यांवर महापालिकेची खास कृपादृष्टी आहे. या सोसायट्यांना मुख्य जलवाहिनीतून पाणीजोड देण्यात आला आहे. परिसरात इतरांना ठरावीक वेळ पाणी दिले जाते; पण या ‘खास’ सोसायट्यांना मुख्य टाकी रिकामी होईपर्यंत दिवसभर पाणी मिळत राहते. कारण त्यांचा पाणीपुरवठा वेळापत्रकानुसार चालू-बंद करण्यासाठी व्हॉल्व्हच लावलेला नाही. संबंधित अधिकाऱ्यांची आणखी एक विशेष मेहेरबानी म्हणजे त्यांनी तेथे पाण्याचे मीटरही बसविलेले नाहीत. त्यामुळे इतरत्र खडखडाट असला, तरी या ‘व्हीआयपी’ सोसायट्यांकडे पाण्याचा कायम सुकाळ असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.