‘राजा उदार झाला अन हाती भोपळा दिला...’ अशी अवस्था शिधापत्रिकाधारकांची झाली
पुणे : दिवाळीत सगळीकडे गोडधोड फराळाची रेलचेल सुरू आहे. परंतु बहुतांश शिधापत्रिकाधारकांना दिवाळी कीट (आनंदाचा शिधा) अद्याप मिळालेले नाही. काही रेशन दुकानांमध्ये रवा, पामतेल, साखर, चणा डाळ या चार जिनसांपैकी दोनच आल्या आहेत. तर, त्यामुळे ‘राजा उदार झाला अन हाती भोपळा दिला...’ अशी अवस्था शिधापत्रिकाधारकांची झाली आहे.
राज्य सरकारने दिवाळी सणानिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयांत रवा, पामतेल, साखर, चणा डाळ देण्याचा निर्णय घेतला. परंतु काही ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने कीट वाटपात अडचण आली. त्यामुळे अन्न व नागरी पुरवठा विभागाने ज्याठिकाणी ऑनलाइन वाटपास अडचण आहे, अशा ठिकाणी ऑफलाइन पद्धतीने दिवाळी कीट देण्याचे निर्देश दिले आहेत.
त्यानुसार वितरण विभागाकडून २३ ऑक्टोबरपासून रेशन दुकानांना कीट वाटप करण्यास सुरवात झाली. परंतु दिवाळीत गोदामांमध्ये मजुरांची उपलब्धता असणार नाही. ही बाब लक्षात घेऊन पुरवठाधारकांकडून दिवाळीपूर्वीच पुरवठा होणे अपेक्षित होते. त्याला विलंब झाल्यामुळे बहुतांश रेशन दुकानांमध्ये दिवाळी कीट पोचलेच नाहीत. रेशनचे दिवाळी कीट भेटल्यानंतर घरी फराळाचे करू, या विचारात असलेल्या शिपात्रिकाधारकांना आता रवा, पामतेल, साखर, चणा डाळ बाजारातून खरेदी करायची की रेशन दुकानामधून, असा प्रश्न पडला आहे.
‘आनंदाचा शिधा’
‘आनंदाचा शिध्या’त प्रत्येक शिधापत्रिकाधारक कुटुंबाला एक लिटर पामतेल आणि एक-एक किलो रवा, चणा डाळ व साखर देण्यात येणार आहे. अंत्योदय आणि प्राधान्यक्रम कुटुंब योजनेतील शिधापत्रिकाधारकांनाच हा शिधा देण्यात येणार आहे.
दिवाळी कीटसाठी रेशन दुकानाच्या दोन-तीन चकरा मारल्या. रेशनवर साखर, रवा आला आहे. परंतु चणाडाळ नाही. त्यामुळे दिवाळी कीट दिले नाही. शेवटी मार्केटयार्डमधून एक किलो तयार चिवडा आणला. दिवाळी कीट मिळाल्यानंतर घरी फराळाचे करू, असा विचार होता. वेळीच कीट मिळाले असते तर सरकारचे नाव घेत दिवाळीचा सण साजरा केला असता.
- उद्धव ससाणे, शिधापत्रिकाधारक, आंबेडकरनगर
अन्नधान्य वितरण विभागाकडून बहुतांश दुकानदारांना अद्याप दिवाळीचे कीट मिळालेले नाही. काही दुकानदारांना चणा डाळच पाठवली. तर काहींना रवा, पामतेल, साखर पाठवली. त्यामुळे ग्राहक आणि दुकानदार यांना त्रास सहन करावा लागत आहे. वितरण विभागाने आठ दिवसांपूर्वीच दुकानदारांकडे कीट वाटप करायला हवे होते.
- गणेश डांगी, अध्यक्ष- पुणे शहर रेशन दुकानदार संघटना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.