लोणावळ्यात पावसाचा जोर कायम, दोन दिवसात विक्रमी पाऊस

संततधार कायम; जनजीवन विस्कळित
लोणावळ्यात पावसाचा जोर कायम, दोन दिवसात विक्रमी पाऊस
SYSTEM
Updated on

लोणावळा, : लोणावळ्यात पावसाचा धुमाकूळ कायम असून, दोन दिवसांत विक्रमी पावसाची नोंद झाली. शहरात मागील २४ तासांत ३२२ मिलिमीटर पाऊस झाला. लोणावळा शहरात महाबळेश्वर खालोखाल पावसाची नोंद झाली असून, ४८ तासांत ७१२ मिलिमीटर पाऊस नोंदविण्यात आला आहे. गुरुवारी (ता. २२) ढगफुटीसदृश पावसाने जोरदार तडाखा दिल्यानंतर शुक्रवारी (ता. २३) दिवसभर पावसाची संततधार सुरूच होती. सकाळी आठ ते दुपारी तीनपर्यंत ८४ मिलिमीटर पाऊस नोंदला गेला. येथील जनजीवन विस्कळित झाले असून नागरिक घराबाहेर पडेनासे झाले आहेत. शुक्रवारी सकाळी आठपर्यंत या वर्षीचा २६३९ मिलिमीटर (१०३ इंच) पाऊस नोंदला गेला आहे. घाटमाथ्यावर सुरू असलेल्या पावसामुळे पुणे-मुंबई महामार्गासह द्रुतगती मार्गावरील वाहतूक रोडावली. बोरघाटात वाहतूक संथगतीने सुरू होती.

पूर परिस्थिती कायम
लोणावळा परिसरात जोरदार सुरू असलेल्या पावसामुळे तुंगार्ली, वळवण, पवना धरणांच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. टाटाचे लोणावळा धरण पूर्ण भरल्याने धरणातून पाण्याचा अनियंत्रित विसर्ग होण्याचा धोका असल्याने प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. लोणावळा नगर परिषदेच्या वतीने आपत्कालीन कक्ष तैनात करीत नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याबरोबर सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. नगराध्यक्षा सुरेखा जाधव, मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. डोंगर भागातून मोठ्या प्रमाणात धबधबे वाहू लागले आहेत. इंद्रायणी नदीपात्राच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. कार्ला, मळवली भागात नदीचे पाणी पात्राबाहेर पडल्याने परिसरातील अनेक सोसायट्या, घरांना पुराच्या पाण्याचा वेढा बसला. शुक्रवारी दिवसभर पावसाची संततधार सुरूच असल्याने ही पूर परिस्थिती कायम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.