Pune News : पबमधील धिंगाण्याने कल्याणीनगरवासी त्रस्त;मद्यपींचा रस्त्यावर गोंधळ,पोलिसांचा अंकुश नसल्याचा नागरिकांचा आरोप

कल्याणीनगर येथील काही रहिवासी इमारतींमध्ये हॉटेलच्या नावाखाली रात्री उशिरापर्यंत पब चालवले जात आहेत. काही सिने कलाकार, राजकीय वरदहस्त असलेल्या व्यक्तींचे पब रात्रभर सुरू असतात.
Pune News
Pune News sakal
Updated on

वडगाव शेरी : कल्याणीनगर येथील काही रहिवासी इमारतींमध्ये हॉटेलच्या नावाखाली रात्री उशिरापर्यंत पब चालवले जात आहेत. काही सिने कलाकार, राजकीय वरदहस्त असलेल्या व्यक्तींचे पब रात्रभर सुरू असतात. याचाच परिपाक म्हणजे रविवारी पहाटे भरधाव मोटार अपघातात एका संगणक अभियंता तरुण आणि तरुणीला जीव गमवावा लागला.

येरवडा पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या कल्याणीनगर भागात रस्त्यावर बेशिस्त पार्किंग, रात्री उशिरापर्यंत मोठ्या आवाजातील संगीत, रस्त्यावर दारू पिणारे मद्यपी, भरधाव मोटार चालवून हॉर्न वाजवून रहिवाशांची शांतता भंग करणे, पबमधून बाहेर पडल्यावर रस्त्यावर दारूच्या बाटल्या फोडणे, मारामारीचे प्रकार सर्रास सुरू आहेत. यावर येरवडा पोलिसांचा अंकुश राहिला नसल्याचा नागरिकांनी आरोप केला.

रात्री दीड वाजल्यानंतरही उशिरापर्यंत पबमधील धांगडधिंग्यामुळे कल्याणीनगर येथील त्रस्त रहिवाशांनी नुकतीच बैठक घेतली. त्यात कल्याणीनगर भागातील अवैध धंद्यांना आवर घालण्याची मागणी पोलिसांकडे केली होती, परंतु त्यात सुधारणा झालेली नाही. याबाबत सहाय्यक आयुक्त आरती बनसोडे, येरवडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक (गुन्हे) अतुल जगदाळे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु संपर्क होऊ शकला नाही.

पबचा दणदणाट अनेकदा पहाटेपर्यंत सुरू असतो. पोलिस आयुक्तांकडे तक्रार करूनही फरक पडत नाही. मद्यपींचा त्रास अनेक वर्षांपासून सहन करीत आहेत.

-पौर्णिमा जोशी,

रहिवासी, कल्याणीनगर

मध्यरात्री अपघातात दोन जीव गेले, हे दुर्दैवी आहे. कल्याणीनगर भागात रहिवाशांना होणाऱ्या त्रासाची पोलिस, महापालिका आणि उत्पादन शुल्क विभागाला वेळोवेळी कल्पना दिली आहे, परंतु त्यात कोणतीही सुधारणा झालेली नाही. अपघातात जीव गमावलेल्या तरुण आणि तरुणीला न्याय मिळावा.

- डॉ. हाजी जाकिर शेख, रहिवासी

रहिवाशांच्या मागण्या

  • येथील सर्व पब साउंडप्रूफ असावेत

  • रात्री दहानंतर पब बंद करावा आणि अकरा वाजल्यानंतर हॉटेल बंद करावेत

  • नियमभंग करणाऱ्या हॉटेलचालकांचा परवाना रद्द करावा

  • पब व हॉटेलचालकांना स्वतःचे पार्किंग असल्याशिवाय परवानगी देऊ नये

‘लँडमार्क’बाहेर श्रद्धांजली सभा

वडगाव शेरी : मोठ्या आवाजातील संगीत, बेशिस्त पार्किंग आणि कायदा सुव्यवस्था बिघडविण्यासमवेत रहिवाशांचे जगणे अवघड करणाऱ्या कल्याणीनगर भागातील रेस्टो बार आणि पबवर कारवाई होत नसल्याचा निषेध करीत येथे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या संगणक अभियंता तरुण आणि तरुणीस श्रद्धांजली वाहण्यासाठी रहिवाशांनी कँडल मार्च काढला. कल्याणीनगर येथील लँडमार्क सोसायटीबाहेरील पदपथावर श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी नागरिकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या, तसेच पोलिस प्रशासनाच्या कामावर नाराजी व्यक्त करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.