पुणे नाही, तर कोल्हापूरचे पदवीधर ठरविणार आमदार; चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला!

Chandrakant_Patil
Chandrakant_Patil
Updated on

पुणे : पुणे विभाग पदवीधर मतदार संघातील उमेदवाराचे भविष्य आता पुणेकरांबरोबरच करवीरनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरातील पदवीधर ठरविणार आहे. सर्वाधिक मतदार पुणे जिल्ह्यात असले तरीही मतदानाच्या टक्केवारीत मात्र कोल्हापूरने बाजी मारली आहे. त्यामुळे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 

पदवीधर मतदार संघासाठी झालेली ही अनेक अर्थाने वैशिष्टपूर्ण ठरली. या मतदार संघासाठी नव्याने मतदार नोंदणी करण्यात आली. एरवी या निवडणुकीबाबत मतदारांना फारसे औत्सुक्‍य नसे. यंदा मात्र ही निवडणूक त्यालाही अपवाद ठरली. राजकीय पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनविल्यामुळे मतदानाचा टक्का वाढला. वाढलेला हा टक्का आणि रिंगणातील उमेदवारांची संख्या पाहता ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. 

पाचही जिल्ह्यांपैकी पुण्यात सर्वाधिक म्हणजे 1 लाख 36 हजार मतदारांची नोंदणी झाली. त्या खालोखाल कोल्हापूर मध्ये 89 हजार 503 मतदारांची नोंदणी झाली होती. त्यामुळे पदवीधरचा आमदार पुणेकर ठरविणार असे बोलले जात होते. प्रत्यक्षात मतदानानंतर सर्वच चित्र बदलले आहे. पुण्यात एकूण मतदार संख्येच्या 44. 95 टक्के म्हणजे 61 हजार 404 मतदारांनी मतदान केले. तर कोल्हापुरात 68. 09 टक्के म्हणजे 60 हजार 962 मतदारांनी मतदान केले. त्या खालोखाल सांगली मध्ये 56 हजार 743 (65 टक्के), सातारा 34 हजार 421 (58.27 टक्के), तर सोलापुरात 33 हजार 520 (62,29 टक्के) मतदान झाले आहे. पश्‍चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. परंतु गेली दोन वेळा राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील दुहीचा फायदा भाजपला झाला. यंदा मात्र चित्र काहीसे वेगळे राहिले. 

भाजप विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यामध्ये ही निवडणूक रंगली. यापूर्वी या मतदार संघाचे नेतृत्व केलेले चंद्रकांत पाटील हे मूळचे कोल्हापूरचे. तत्कालीन युतीच्या सरकारच्या पाच वर्षांच्या काळात ते मंत्री देखील होते. या काळात त्यांनी पक्षाची ताकद वाढविण्यासाठी सर्वतोपरी पर्यंत पुणे विभागात केले. त्यामुळे मतदार संघाची चांगली जाण त्यांना आहे. सध्या ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष असून याच मतदार संघातील पुणे शहरातील कोथरूडचे ते आमदार देखील आहेत. त्यामुळे मतदारांची नोंदणी करण्यापासून ते मतदान करून घेण्यापर्यंत त्यांनी जातीने लक्ष घेतले होते. त्यामुळे सुरवातीच्या टप्प्यात भाजपचे पारडे जड असल्याचे चित्र होते. परंतु कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पश्‍चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी ही निवडणूूक तेवढीच प्रतिष्ठेची केली.

गेल्या पाच वर्षात भाजप सरकारच्या काळात झालेला त्रास पाहून त्यांची परतफेड करण्याची ही नामी संधी आल्याचे सांगत कोल्हापूर, सांगली, सातारा भागात मतदानाचा टक्का कसा वाढेल, यावर जाणीवपूर्वक भर दिला. त्यामुळे यंदा प्रथमच पदवीधर मतदार संघातील मतदानाने विक्रम नोंदविला. त्यामुळे पुण्यातील पदवीधरांनी भाजपला हात दिला, तरी कोल्हापूर, सांगली आणि काही प्रमाणात सातारातील पदवीधरांच्या मदतीने ती उणीव भरून काढण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आल्याचे मतदानाच्या टक्केवारीवरून समोर आले आहे. त्यामुळे ही निवडणूक वरकरणी भाजप विरुद्ध महाविकास आघाडी दिसत असली, तर ती खरी चंद्रकांत पाटील विरुद्ध पश्‍चिम महाराष्ट्रातील नेते अशीच राहिली. यात कोण बाजी मारणार हे येत्या अवघ्या तासांवर येऊन ठेपले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()