आंबेठाण : चाकण एमआयडीसीत रस्त्याच्या कडेला अतिक्रमण करून मोठ्या प्रमाणात दुकाने थाटली जात आहे. परिणामी वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत असून, कामगार आणि प्रवाशी यांना नित्याच्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे चाकण एमआयडीसीच्या विविध टप्प्यात चौकाचौकात झालेली अतिक्रमणे काढणे आणि चौकांना मोकळा श्वास घेऊन देण्याची गरज निर्माण झाली आहे. भर वर्दळीच्या रस्त्याच्या कडेला विविध व्यावसायाची दुकाने आणि हॉटेल्स टाकल्याने चौकांना तर चक्क चौपाटीचे स्वरूप आले आहे.
चाकण एमआयडीसीच्या अंतर्गत येणाऱ्या बहुतांश रस्त्याच्या कडेला विशेष करून चौकात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत.कोणीही यावे आणि रस्त्याच्या कडेला दुकान थाटावे अशी अवस्था या भागात झाली आहे. कोणी विचारत नाही आणि काही ठिकाणी कोणाला भाडे द्यावे लागत नसल्याने स्थानिकांसह अनेक परप्रांतीय लोकांनी अतिक्रमणे करून व्यवसाय सुरू केले आहेत. तर काही प्रमुख चौकात जागा शासनाची आणि भाडे घेणारे दुसरे अशी परिस्थिती आहे.
एमआयडीसीमधील वासुली फाटा भागात तर रस्त्यावर अतिक्रमणे करून दुकानदारी थाटण्याचे प्रमाण मोठे आहे.चहा आणि पान टपऱ्या,हॉटेल,फळांची दुकाने,चिकन सेन्टर,रसाचे गुऱ्हाळ,पाणीपुरी गाड्या अशी नानाविध प्रकारची दुकाने टाकून अतिक्रमण केले जात आहे. काही ठिकाणी रस्त्यावर तर काही ठिकाणी रस्त्यालगत दुकाने टाकली जात असल्याने याचा सर्वात मोठा फटका वाहतुकीला बसत आहे. कंपन्या सुटण्याच्या वेळेस तर अशा भागात मोठ्या वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे. याचा मोठा फटका कामगारांना बसत असून त्यांना वेळेवर कामावर हजर होता येत नाही तर घरी परतायला देखील उशीर होत असतो.अनेक वेळा येथील दुकानदार वाहनचालकांनाच दमबाजी करीत असतात.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
अतिक्रमण काढायला गेले की स्थानिक लोक विरोध करतात. लवकरच पोलिस बंदोबस्त घेऊन अशी अतिक्रमणे काढण्यात येतील.-प्रकाश भडंगे, उपअभियंता, एमआयडीसी.
(संपादन : सागर डी. शेलार)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.