पुणे - रशियन बनावटीचे ‘मिकोयान मिग-२१’ हे सुपरसॉनिक प्रकारातील जेट विमान १९६३ मध्ये भारतीय हवाईदलात दाखल झाले. या विमानाचा वापर हवाईदलाने विविध युद्धांमध्ये या विमानाचा वापर करत आपल्या हवाई शक्तीचे प्रदर्शन सादर केले. दुसरीकडे सुमारे सहा दशकातील आपल्या कारकिर्दीत या विमानाच्या अनेक अपघातांच्या घटना ही घडल्या. दरम्यान, इतक्या वर्षांच्या कार्यकाळानंतर आता हवाईदलाच्या ताफ्यात असलेल्या ‘मिग-२१’ विमानांच्या उड्डाणाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.
भारतीय हवाईदलाच्या विविध मोहिमा आणि युद्धांमध्ये आपल्या क्षमतेचे प्रदर्शन घडविणाऱ्या मिग-२१ या लढाऊ विमानाच्या उड्डाणास थांबविण्यात आले आहे. हवाईदलात सेवेत असल्यापासून आजपर्यंत या विमानांचे २९० हून अधिक अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यात २०० हून अधिक वैमानिक व नागरिकांच्या मृत्यूच्या घटनाही घडल्या. दरम्यान, अपघाताची वारंवारता, वैमानिकांची जीवितहानी होत असतानाही सहा दशकांहून अधिक काळ सेवेत असलेल्या मिग-२१ विमानांच्या ताफ्याचे उड्डाण तात्पुरते थांबविण्यात आल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
राजस्थानच्या सुरतगढ जवळ आठ मेरोजी मिग-२१ हे विमान तांत्रिक बिघाडामुळे एका घरावर कोसळले होते. या अपघातात तीन नागरिकांचा मृत्यू झाला. मात्र, विमानछत विच्छोदन प्रणालीमुळे (इजेक्शन) वैमानिक या विमानातून बाहेर पडले व त्यांना किरकोळ दुखापतच झाली होती. या घटनेनंतर मात्र हवाईदलातील संपूर्ण मिग-२१ ताफ्याचे उड्डाण आता थांबविण्यात आले आहे.
प्रत्येक विमानाच्या वापराचे एक विशिष्ट कालावधी असते. रशियाच्या सोव्हिएत हवाईदलाने १९८५ मध्ये ‘मिग’ या लढाऊ विमानाचा सेवेत वापर बंद करण्यात आला होता. तर भारतीय हवाईदलाची स्थिती पाहता या विमानाच्या निवृत्तीचा कालावधी हा १९९० च्या काळातच होता. परंतु हवाईदलात आवश्यक असलेल्या लढाऊ विमानांच्या संख्येच्या कमतरतेमुळे ‘मिग’च्या सेवेला थांबविण्यात आले नाही.
अपघातांचा मोठा इतिहास
हवाईदलात ६० वर्षांहून अधिक काल सेवा बजावणाऱ्या मिग-२१ या लढाऊ विमानाच्या अपघातांचा इतिहास पाहिला तर आजवर याच्या २९५ घटना घडल्या आहेत. त्यातील सर्वाधिक जास्त अपघात हे १९९१ ते २००० या कालावधीत घडल्या. या दशकात एकूण ८६ अपघाताच्या घटनांची नोंद झाली. सर्वाधिक जास्त काळ हवाईदलात सेवा बजावणाऱ्या लढाऊ विमानामध्ये मिग विमानाचा समावेश आहे.
भारतीय हवाईदलात दाखल झाल्यापासून आजवर सुमारे ८५० प्रकारांचा समावेश झाला आहे. तर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडद्वारे (एचएएल) मोठ्या प्रमाणात या विमानाची निर्मिती देशात करण्यात आली आहे. मात्र, असे असले तरी या विमानाच्या अपघाताची संख्या देखील तुलनेने मोठी असल्याने या विमानाला ‘फ्लाइंग कॉफिन’ असेही म्हणले जाते.
‘मिग’चा इतिहास
प्रतिभेदक क्षमता असलेले मिग-२१ हे रशियाचे पहिले लढाऊ विमान आहे. रशियाद्वारे मिग या लढाऊ विमानाची पहिले प्रोटोटाइप व्हायई-१ ही १९५४ मध्ये निर्माण करण्यात आले. याच्या चाचणीदम्यान विमानाच्या इंजिनची क्षमता कमी असल्याचे आढळून आले. त्यानंतर यामध्ये सुधारणा करत व्हायई-२, व्हायई-३ आणि व्हायई-४ या आवृत्त्या तयार करण्यात आल्या. या विमानाच्या प्रतिकृतीने हवाई झेप घेतली. त्यानंतर मिग-२१ हे रशियाचे पहिले लढाऊ आणि प्रतिभेदक क्षमता एकत्र असलेले विमान ठरले.
या विमानाचा आराखडा नंतर अनेक विमानांसाठी वापरला गेला. हे एक इंजिन असलेले लढाऊ जेट असून भारताला पहिले मिग विमान १९६३ मध्ये मिळाले. पाकिस्तान व चीन सारख्या देशांशी लढण्याकरिता भारताच्या हवाईदलाची क्षमता वाढविण्यासाठी सुरवातीच्या काळात या विमानाने महत्त्वाची कामगिरी केली.
३१ - हवाईदलाच्या एकूण स्क्वॉड्रनची संख्या
३ - मीग-२१ चा समावेश असलेले एकूण स्क्वॉड्रन
सुमारे ५० - एकूण ताफ्यात असलेले मीग-२१
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.