मंचर : “सन २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणूक प्रचारात भारतीय जनता पक्षाच्या सभांचे व दिलेल्या जाहीर आश्वासनाचे स्मरण करा. ‘महागाई कमी करू, परदेशातील काळे धन भारतात आणू, प्रत्येक युवक युवतीच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करू’ असे आमिष दाखवून केंद्रात व काही राज्यात सत्ता संपादन केली.
आज मात्र त्याबद्दल चकार शब्दही बोलत नाहीत. जनतेची दिशाभूल करून सत्तेवर आलेल्या भाजपला आगामी निवडणुकीत हिसका दाखविण्याचे काम जनतेने करावे.” असे आवाहन शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन आहिर यांनी केले
मंचर (ता. आंबेगाव) येथे सोमवारी (ता.११) शरद पवार सभागृहात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या ‘होऊ द्या चर्चा’ या कार्यक्रमात आहिर बोलत होते. यावेळी पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे,
जिल्हाप्रमुख सुरेश भोर, राजाराम बाणखेले, माऊली खंडागळे, बाबाजी काळे, विजया शिंदे, प्रज्ञा भोर, शरद चौधरी, दत्ता गांजाळे, सुरेखा अनिल निघोट, विकास जाधव, पांडू बनकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आहीर म्हणाले, “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर असताना हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. त्यांना स्वाक्षरी करणे ही अवघड जात होते. याच वेळी त्यांच्या विरोधात षडयंत्र करण्याचे काम काही मंडळींनी करून सध्या ते सत्तेवर आले आहेत. साथ देण्याऐवजी पाय ओढण्याचे पाप करण्यात आले.
आता पक्ष अडचणीत असताना निधीला साथ न देता निष्ठेला साथ देणारे मावळे ठाकरे कुटुंबाबरोबर आहेत. याचा मला सार्थ अभिमान आहे. सध्या देशाचा इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला जात आहे.
विरोधकांचा हा प्रयत्न हाणून पाडावा. निवडणुकांना भाजप घाबरले आहे त्यामुळेच महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद या निवडणुका लांबणीवर टाकल्या जात आहेत. सुरेश भोर यांच्या नेतृत्वाखाली पक्ष बांधण्याचे काम जोरदारपणे सुरू आहे. गणेश उत्सव नंतर पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर उद्धव ठाकरे येणार आहेत. त्यावेळी ते खोक्या वाल्यांचा समाचार घेतील.”
सुषमा अंधारे यांनी राज्यसरकारवर तोफ डागली. त्या म्हणाल्या, “श्री क्षेत्र आळंदीत वारकऱ्यावर व सराटी जालना येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यावर लाठीमार करण्यात आला आहे. त्यामुळे या सरकारच्या विषयी सामान्य जनतेच्या मनात चीड आहे.
‘वन नेशन वन इलेक्शन’ ऐवजी ‘वन नेशन वन एज्युकेशन’ असावे म्हणजेच अंबानी, आदानी, टाटा यांच्या मुलांना ज्या शाळेत शिक्षण मिळते. त्याच शाळेत खेडेगावातील मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे ही आमची मुख्य मागणी आहे.” यावेळी राजाराम बाणखेले, अँड. अविनाश रहाणे, दिलीप पवळे आदींची भाषणे झाली. दत्ता गांजाळे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन संदीप वाबळे यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.