पुणे - ‘सकाळ सोबत बोलूया’ या हेल्पलाइनवर गेल्या १४ महिन्यांत राज्यभरातून सुमारे ११ हजार लोकांनी विविध मानसिक स्वास्थ्य व समस्यांच्या मार्गदर्शनासाठी मुक्त सवांद साधला. तज्ज्ञ समुपदेशक, मानसिक विकारतज्ज्ञ, मानसशास्त्रतज्ज्ञ यांची टीम हेल्पलाइनवर फोन करणाऱ्या व्यक्तींना मानसिक आधार देत, त्यांचे २४ तास मोफत योग्य समुपदेशन करत आहेत. हेल्पलाइनमुळे लोकांना व्यक्त होण्यासाठी व योग्य मार्गदर्शनासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
‘सकाळ माध्यम समूहा’तील ‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या वतीने we are in this together या मोहिमेंतंर्गत कर्वे समाज सेवा संस्थेच्या सेंटर फॉर मेंटल हेल्थ अँड डीसअँबीलीटीजच्या सहकार्याने मानसिक ताणतणाव व्यवस्थापन व एकूणच मानसिक स्वास्थ्य व समस्यांच्या मार्गदर्शनासाठी ‘सकाळ सोबत बोलूया’ ही २४ तास मोफत हेल्पलाइन उपक्रम सुरु आहे.
हेल्पलाइनवर फोन करणाऱ्यांमध्ये पुरुष वर्गाचे प्रमाण ६३.४ टक्के होते. तर महिला वर्गाचे प्रमाण ३६.१ टक्के होते. यामध्ये वयोगटानुसार १८ ते २९ वयोगटातील लोकांचे प्रमाण ८.१ टक्के, ३० ते ४९ वयोगटातील लोकांचे प्रमाण २१.४ टक्के, ५० ते ६९ वयोगटातील लोकांचे प्रमाण ४९.४ टक्के, ७० पेक्षा अधिक वयोगटातील लोकांचे प्रमाण ६.९ टक्के होते. इतर वयोगटातील लोकांचे प्रमाण १४.२ टक्के होते. तसेच ३०.१ टक्के लोक शहरी भागातील होते. ६६.७ टक्के लोक निमशहरी भागातील होते. ३.२ टक्के लोक ग्रामीण भागातील होते. तसेच फोन करणाऱ्यांमध्ये ५१.९ टक्के पदवीधारकांचे व २३.५ टक्के पदव्युत्तर पदवीधारकांचे प्रमाण होते. तसेच डिप्लोमाधारकांचे प्रमाण ९.३ टक्के होते. याशिवाय उच्च शिक्षित, प्राथमिक-माध्यमिक शिक्षण झालेले यांचे प्रमाण त्याखालोखाल होते.
हेल्पलाइनवर मदतीसाठी फोन करणाऱ्या लोकांमध्ये खासगी नोकरदार वर्गाचे प्रमाण (३३.९ टक्के) पहिल्या क्रमांकावर आहे. त्याखालोखाल शासकीय नोकरदार वर्गांचे प्रमाण (१४.२ टक्के) दुसऱ्या क्रमांकावर आहे. गृहिणी (११.५ टक्के) व व्यावसायिक (१०.९ टक्के तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तसेच लॉकडाउनमुळे बेरोजगार झालेल्या व्यक्ती, बेरोजगार व्यक्ती, शेतकरी, असंघटित क्षेत्रातील कामगार या वर्गांचे मदतीसाठी फोन करण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. येणाऱ्या कॉल्सच्या समस्यांमध्ये प्रामुख्याने काळजी, चिंता, ताण व आत्महत्येचे विचार त्यामुळे येणारे नैराश्य, नातेसंबंधातील ताणतणाव व वैवाहिक सहजीवनामधील समस्यांमुळे येणारे नैराश्य, नोकरी व व्यवसायातील आर्थिक अडचणी यामुळे आलेले नैराश्य, अनुवांशिक आजार तसेच मानसिक व शारीरिक आरोग्याच्या समस्यांमुळे आलेले नैराश्य या संदर्भात प्रश्नांचा समावेश होता.
चला तर मग आपण ही आमच्याशी बोलू शकता. ‘सकाळ सोबत बोलूया’ ०२०- ७११७१६६९ या क्रमांकावर फोन करून आमच्याशी मनमोकळेपणाने बोला. आपली व्यक्तिगत माहिती गोपनीय ठेवण्यात येईल.
ऑनलाइन अपॉइंटमेंट
काही लोकांना सातत्याने समुपदेशन व मार्गदर्शन सेशन्सची गरज असते. हे लक्षात घेऊन चिंता, काळजी, एकटेपणा, नातेसंबंधातील ताणतणाव व वैवाहिक सहजीवनातील समस्यांमुळे येणारा मानसिक ताण व नैराश्यामुळे उद्भवणाऱ्या मानसिक समस्यांवर सर्व वयोगटातील नागरिकांसाठी नाममात्र सशुल्क दरात तज्ज्ञ समुपदेशकांचे मार्गदर्शन घेण्याकरिता we are in this together या वेबसाईटद्वारे ऑनलाइन अपॉइंटमेंट बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. वेबसाईटद्वारे आपल्या सोयीनुसार, वेळेनुसार तज्ज्ञ समुपदेशकांची अपॉइंटमेंट नागरिकांना बुक करता येईल.
हेल्पलाईन : ०२० - ७११७१६६९
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.