‘लॉकडाउन नकोच’ या मताशी सर्वजण सहमत आहोत, पण अगदी चहाच्या टपरीपासून फर्ग्युसन रस्त्यावरील फूटपाथपर्यंत होणारी गर्दी कमी कशी होणार, यावर गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. पुण्यात कोरोनाची दुसरी लाट अगदी ‘उसळली’ आहे, ती रोखण्यासाठी प्रशासनासोबत नागरिकांनाही बचावाची शस्त्र हाती घ्यावी लागतील. पुण्यात बरोबर एक वर्षांपूर्वी म्हणजेच २१ मार्च २०२० ला कोरोनाचे वाढते संकट लक्षात घेऊन निर्बंध लादले होते. या वर्षभरात पुण्यात तब्बल पाच हजार निष्पाप व्यक्तींचा बळी गेला. एका महामारीने घेतलेल्या बळींची आत्तापर्यंतची ही सर्वांत मोठी संख्या आहे. एकट्या पुण्यात १३ लाख चाचण्या करण्यात आल्या. त्यात २ लाख ३० हजार पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. दोन लाखाहून अधिक रुग्ण उपचार घेऊन घरी परतले. या वर्षभराच्या काळात कोरोना महामारीचे भयंकर परिणाम आपण भोगले. आजही भोगत आहोत.
मात्र, एखादी गोष्ट नित्याची बनली की त्याकडे दुर्लक्ष होते, त्याच पद्धतीने कोरोनाचे संकट डोक्यावर असतानाही आपण त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले त्याचे परिणाम आज आपण भोगत आहोत. गेल्या तीन-चार दिवसांपासून पुण्यात दररोज सुमारे दोन हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळत आहेत. त्याच मुळे एकट्या पुण्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यापेक्षा जास्त म्हणजे १९ हजारांच्या घरात गेली आहे. हा आकडा निश्चितच चिंताजनक आणि भविष्यातील धोका अधिक गडद करणारा आहे.
रुग्णसंख्या वाढली की लॉकडाउन करा, हा राज्य सरकारचा फंडा होता. त्याचा काही वेळा फायदाही झाला. मात्र, कोरोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी लॉकडाउन नव्हे तर स्वयंशिस्त आणि संयमच आवश्यक असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. पुण्यात गेल्या आठवड्यात ‘आयसर’ आणि ‘टीसीएस’ या दोन संस्थांकडून शास्त्रशुद्ध अभ्यास करण्यात आला. त्यातही लॉकडाउनची गरज नाही. मात्र, गर्दीच्या ठिकाणी नियम पाळलेच पाहिजेत हे अधोरेखित करण्यात आले. सध्या प्रत्येक पुणेकराला मास्क, सॅनिटायझेशन आणि सुरक्षित अंतराचे नियम दुसऱ्याने पाळायला हवेत असे वाटते. इतरांनी नियम मोडू नयेत असा सल्ला देणारे पुणेकर स्वतः मात्र मास्क वापरत नाहीत, हॉटेलमध्ये गर्दी करतात. हे चित्र बदलले नाही तर लॉकडाउन शिवाय पुण्यातही पर्याय राहणार नाही, ही बाब प्रत्येकानेच लक्षात घ्यायला हवी.
पुण्यात आज कोणत्याही रुग्णालयात बेड उपलब्ध नाहीत. एकदा तुम्ही रुग्णालयात दाखल झाला की किमान ३० ते ४० हजार रुपयांच्या खाली तुमचे बिल येत नाही, इतर व्याधीग्रस्त असणाऱ्या रुग्णांना मृत्यूचा धोका कायम आहे. अशा परिस्थितीत स्वतःची अधिकाधिक काळजी घेण्याशिवाय पर्याय नाही.
पुण्यात आत्तापर्यंत दाट लोकवस्ती, झोपडपट्टी परिसरामध्ये रुग्णांची संख्या सर्वाधिक होती. यावेळी मात्र परिस्थिती उलटी आहे. शहरातल्या मोठ्या गृहनिर्माण सोसायट्या, अपार्टमेंट, उच्च मध्यमवर्गीय वस्तीचा भाग या ठिकाणी कोरोनाची संख्या वाढत आहे. शहरातील चाचण्यांचे प्रमाण सध्या वाढवले असले तरी, लक्षणे दिसूनही चाचण्या न करणाऱ्यांचे प्रमाणही मोठे आहे. स्वतःला झालेला कोरोना लपवणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. लागण झालेल्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी (ट्रेसिंग) करण्याची यंत्रणा कमी पडत आहे. वर्षभरानंतर एक बाजू जमेची आहे ती म्हणजे रुग्णांवर नेमके काय उपचार करायचे याचा अंदाज आरोग्य व्यवस्थेला आला आहे. ऑक्सिजनपासून इतर आवश्यक सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहेत.
परिस्थिती हाताळणारी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे. आता जबाबदारी नागरिकांची आहे. त्यांनी स्वतःच्या बचावासाठी योग्य ती काळजी घ्यायलाच हवी. लक्षणे आढळताच औषध उपचार करणे, योग्य विश्रांती घेणे, गर्दीची ठिकाणे टाळणे, तातडीने लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. लॉकडाउन नको असेल तर काही पथ्य पाळावीच लागतील. नंतर केवळ यंत्रणांना दोष देऊन चालणार नाही. ‘मी जबाबदार’ हे केवळ जाहिराती पुरते नव्हे तर प्रत्यक्ष वागण्याची वेळ आली आहे हे नक्की.
हे तातडीने करा
Edited By - Prashant Patil
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.