अजितदादा विरुद्ध चंद्रकांतदादा अशी लढाई

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जिल्हा म्हणून पुणे हा नेहमीच राजकारण याचा केंद्रबिंदू राहिला आहे
अजितदादा विरुद्ध चंद्रकांतदादा अशी लढाई
अजितदादा विरुद्ध चंद्रकांतदादा अशी लढाईsakal media
Updated on

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जिल्हा म्हणून पुणे हा नेहमीच राजकारण याचा केंद्रबिंदू राहिला आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत हा किल्ला उद्ध्वस्त करण्यात भाजपला यश मिळाले होते, मात्र २०१९ च्या निवडणुकीत ढासळलेला हा गड राष्ट्रवादीने बऱ्याच अंशी पुन्हा सांधला. राज्यात सत्ता आल्यानंतर ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसने आपली पाळेमुळे घट्ट केली आहेत मात्र, पुणे आणि पिंपरी-चिंचवड या शहरी भागात वर्चस्वासाठी त्यांच्यासमोर भाजपचे कडवे आव्हान राहील. आगामी महापालिका निवडणुकीत अजितदादा विरुद्ध भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा अशी लढत होणार असून, आगामी विधानसभा निवडणुकीची ती लिटमस टेस्ट असेल.

अजितदादा विरुद्ध चंद्रकांतदादा अशी लढाई
महासर्वेक्षण: जनतेच्या मनातील मुख्यमंत्री कोण? काय म्हणतो सर्व्हे?

राष्ट्रवादी काँग्रेसला खिळखिळी करायची असेल तर पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र ताब्यात घ्यावा लागेल, हेच धोरण ठेवून भाजपने विस्तार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचा धसका २०१४ च्या निवडणुकीत अनेकांनी घेतला. २०१९ मध्ये हीच परिस्थिती राहणार या भीतीतून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह अनेकांनी कमळ हातात धरले. पण २०१९ च्या निवडणुकीत शरद पवार यांनी स्वतः खिंड लढवली आणि पश्चिम महाराष्ट्र सावरला. या सर्वात मोठे योगदान पुणे जिल्ह्याचे राहिले. एकट्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दहा तर काँग्रेसच्या दोन अशा बारा जागा आल्याने राष्ट्रवादीचा आत्मविश्वास वाढला. २०१४ च्या तुलनेत भाजप ११ वरुन ९ जागांपर्यंत खाली आली. शिवसेना, मनसे आणि रासप हे २०१९ च्या निवडणुकीत हद्दपार झाले. महाविकास आघाडी सत्तेवर आल्याने पुणे जिल्ह्यात सहाजिकच राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक फायदा झाला. अजित पवार, दिलीप वळसे पाटील आणि दत्तात्रेय भरणे या तिघांना मंत्रीपद मिळाले. या तिघांकडे महत्त्वाची खाती असल्याने सहाजिकच राज्याच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचा जिल्ह्यात सर्वाधिक फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला झाला.

भोर मध्ये संग्राम थोपटे तर पुरंदर मध्ये संजय जगताप विजयी झाले. थोपटे सलग तिसऱ्यांदा विजयी झाले, त्यामुळे काँग्रेसच्या वाट्याला मंत्रीपद येईल अशी अपेक्षा होती. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावामुळेच थोपटे यांची संधी हुकल्याची भावना काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आजही आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच काँग्रेसचा केवळ वापर करून घेते, पण सत्ता देताना आमचा विचार होत नाही, नेहमीच काँग्रेसला दुय्यम वागणूक मिळते, हीच खदखद काँग्रेसचे कार्यकर्ते व्यक्त करतात. 'पीएमआरडीए'च्या निवडणुकीत उभा असलेला काँग्रेसचा उमेदवार एकमेव उमेदवार पडला. त्यावरुन या दोन्ही पक्षांतील दुरावा आणखी वाढला आहे. पुण्यात महापालिकेच्या अनेक ठरावांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस भाजप एकत्र येतात, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे काँग्रेस नेते, कार्यकर्ते यांची नाराजी महाविकास आघाडीत बिघाडी आणण्यास जबाबदार ठरली आहे. याच वागणुकीमुळे काँग्रेस आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा नारा देत आहे.

अजितदादा विरुद्ध चंद्रकांतदादा अशी लढाई
महिला मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत पंकजा मुंडेंपेक्षा 'या' नेत्या वरचढ

महापालिका निवडणूक ठरणार लिटमस टेस्ट

राज्याच्या राजकारणात महत्त्वाच्या असणाऱ्या महापालिका निवडणुका येत्या फेब्रुवारीमध्ये होत आहेत. पुणे जिल्ह्यातील पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महापालिका सध्या भाजपच्या ताब्यात आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका ताब्यात नाही हे शल्य नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेसला राहिले आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत काहीही करून तेथे राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येईल, यासाठी पक्षाचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांनी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक गांभीर्याने घेतली आहे, त्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातही भाजप मध्ये गेलेल्या नगरसेवकांना स्वगृही परत येण्याची गळ घालण्यात येत आहे त्याला कितपत यश येते हे प्रभागरचना निश्चित झाल्यानंतर स्पष्ट होईल. पिंपरी-चिंचवड मध्ये भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांची ताकद महापालिका निवडणुकीत पणाला लागणार आहे.

भाजपने या दोन्ही नेत्यांना मोकळीक दिली आहे, त्याचा फायदा किती होतो आणि भाजप आपली सत्ता राखतो का, यावर आगामी विधानसभा निवडणुकीची अनेक गणिते अवलंबून राहणार आहेत. शिवसेनेची भूमिका येथे महत्त्वाची ठरणार आहे.

खरा कस पुण्यातच

पुण्यात भाजपला शह देण्यासाठी २३ गावे महापालिका हद्दीत समाविष्ट करण्याचा निर्णय झाला. प्रभाग रचनेत मोठे फेरबदल होतील, शिवाय महाविकास आघाडीतील तीनही पक्ष एकत्र येऊन महापालिका निवडणूक लढवतील अशी राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षा आहे जर हे तीनही पक्ष एकत्र आले तर पुण्यात भाजपसमोर खरे आव्हान असेल. भाजपनेही कोणत्याही परिस्थितीत पुणे हातातून जाणार नाही याची दक्षता घेतली आहे. स्वतः प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे महापालिका निवडणुकीची सूत्रे आहेत. चंद्रकांतदादा यांच्यासमोर पक्षातील गटबाजी रोखणे हेच खरे आव्हान असेल. विद्यमान आमदारांसोबतच खासदार गिरीश बापट यांना महापालिका निवडणुकीत किती विश्‍वासात घेतले जाते, हाही मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार आहेत. खडकवासला विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातून अत्यंत थोड्या मतांनी गेला. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा आत्मविश्‍वास वाढला आहे. भाजपने आपले नगरसेवक फुटणार नाहीत याची दक्षता घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिकांची निवडणूक ही राजकीय दृष्ट्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोघांच्याही प्रतिष्ठेची ठरणार आहे. पुण्यात नवमतदारांची संख्या मोठी आहे या मतदारांवर आजही मोदींचा प्रभाव आहे. हा प्रभाव राष्ट्रवादी काँग्रेस कसा दूर करणार? काँग्रेसला कितपत विश्वासात घेतले जाणार? मनसेला भाजप सामावून घेणार का? हे सर्व घटक महापालिका निवडणुक महत्त्वाचे ठरणार आहेत. आजही शहरी मतदारांवर भाजपचा प्रभाव आहे. महापालिकेची निवडणूक त्रिसदस्यीय पद्धतीने होणार असल्याने एका प्रभागात ५० ते ६० हजार मतदार असणार आहेत, अशावेळी उमेदवारापेक्षा ही पक्ष महत्त्वाचा ठरणार आहे त्यामुळे महाविकास आघाडी शिवाय दोन्ही काँग्रेस पुढे सध्या पर्याय दिसत नाही.

जिल्ह्यात राष्ट्रवादीचा विस्तार

जिल्ह्यातील दहा जागांपैकी सात ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजयी झाले आहेत. दौंडचा एकमेव अपवाद वगळता भाजपला रोखण्यात राष्ट्रवादीला यश आले आहे. भोर मध्ये संग्राम थोपटे यांनी आपला बालेकिल्ला अधिक मजबूत ठेवला आहे. पुरंदर मध्येही संजय जगताप यांनी दोन्ही काँग्रेसमध्ये चांगला समन्वय ठेवला आहे. पालकमंत्री अजित पवार यांनी संपूर्ण जिल्ह्यावर पुन्हा एकदा चांगली पकड ठेवली आहे. त्यामुळेच नुकत्याच झालेल्या साखर कारखान्यांच्या निवडणुकांतही राष्ट्रवादी काँग्रेसला चांगले यश मिळाले. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसला फारसा धक्का बसेल असे पुणे जिल्ह्यात आजतरी तरी चित्र नाही. भाजप या सर्वांचा सामना कसा करणार हे महत्त्वाचे ठरेल. देवेंद्र फडणवीस यांचे वैयक्तिक या जिल्ह्यावर लक्ष आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला आपला संघर्ष कायम ठेवावा लागेल असेच आजचे चित्र आहे.

अजितदादा विरुद्ध चंद्रकांतदादा अशी लढाई
Sakal Survey : काँग्रेसची साथ महाविकास आघाडीसाठी फायद्याची की तोट्याची?

पुणे जिल्ह्यातील प्रमुख प्रश्न

  • पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणी

  • पुणे शहराभोवती रिंग रोड ची निर्मिती

  • मोठ्या प्रमाणावर होणारे नागरीकरण; त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा.

  • शहरासोबतच कमी होणारा शेतीसाठीचा पाणीपुरवठा

  • जिल्ह्यात ठिकठिकाणी होणारी वाहतुकीची कोंडी

पुणे जिल्हा विधानसभेतील पक्षीय बलाबल (एकूण जागा २१)

२०१९

१. राष्ट्रवादी काँग्रेस : १०

२. भाजप : ९

३. काँग्रेस : २

२०१४

१. भाजप : ११

२. राष्ट्रवादी काँग्रेस : ३

३. शिवसेना : ३

४. काँग्रेस :१

५. मनसे : १

६. रासप : १

७. अपक्ष : १

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.