दोष पावसाचा नाही, पाणी वाटपातच!

पुणे शहर आणि परिसराचा ज्या वेगाने विस्तार होत आहे तो पाहता येत्या काही वर्षांत चारही धरणांमधील पाणी कमी पडणार आहे.
khadkwasla dam
khadkwasla damsakal media
Updated on
Summary

पुणे शहर आणि परिसराचा ज्या वेगाने विस्तार होत आहे तो पाहता येत्या काही वर्षांत चारही धरणांमधील पाणी कमी पडणार आहे.

पुणे शहर आणि परिसराचा ज्या वेगाने विस्तार होत आहे तो पाहता येत्या काही वर्षांत चारही धरणांमधील पाणी कमी पडणार आहे. ऐन पावसाळ्यात सोमवारपासून होणारी पाणी कपात ही त्याची सुरवात आहे, ही कपात केवळ नैसर्गिक नाही तर नियोजनाचा अभाव हे खरे कारण आहे.

संपूर्ण जून महिना कोरडा गेल्याने पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी खडकवासला प्रकल्पातील धरणे कोरडी पडली आहेत. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाला सुरवात होऊन जुलै अखेरीस धरणांमध्ये बऱ्यापैकी पाणीसाठा होतो. त्यामुळे पुण्यावर सहसा पाणीकपातीची वेळ येत नाही. पण यंदाची परिस्थिती वेगळी आहे. पाऊस लांबला हे जरी खरे असले तरी पिण्याच्या पाण्याचा पुरेसा साठा राखून न ठेवता बेजबाबदारपणे वापर केला गेला. त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. दुर्दैवाने पाऊस आणखी लांबला तर मात्र परिस्थिती आणखी गंभीर होईल. धरणातील पाणीसाठा एवढा कमी होईपर्यंत पाणी नियोजन का झाले नाही, हा खरा मुद्दा आहे.

पुणे हे राज्यात राहण्यासाठी सर्वात चांगले शहर का आहे, याचे उत्तर मुबलक पाणी हे आहे. टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला ही चार धरणे पुण्याच्या उशाशी आहेत. दरवर्षी न चुकता ती पूर्ण क्षमतेने भरतात. खडकवासला प्रकल्पातील २९ टीएमसी (अब्ज घनफूट) पाणीसाठ्यापैकी पुणे शहरासाठी साधारणपणे चौदा टीएमसी पाणी दरवर्षी वापरले जाते. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ऑगस्टनंतर या पाण्याचे वाटप होते. गेल्या पाच सहा वर्षांपासून शहराच्या पाणी वापरावरून महापालिका आणि जलसंपदा विभागात मतभेद आहेत. शहरासाठी वाढणारा पाणी वापर शेतीचे बागायती क्षेत्र कमी करणारा ठरत आहे. तरीही जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने पाणी वापराचा जो प्राधान्यक्रम ठरवून दिला आहे, त्यानुसार पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे सहाजिकच पुणे शहराच्या पिण्याच्या पाण्याला झुकते माप दिले जाते. पण पावसाचा न आलेला अंदाज, पाणीवाटपाचे चुकलेले नियोजन, महापालिकेच्या वाटपातील त्रुटी अशा अनेक कारणांमुळे पुण्याला एक दिवसाआड पाणी पुरवण्याची वेळ आली. पिण्याच्या आणि शेतीच्या पाणी वाटप आणि वापराचे सूक्ष्म नियोजन झाले नाही.

धरणांमध्ये २९ टीएमसी पाणी असताना आणि पुणे शहरासाठी त्यातील दररोज सरासरी साडेतेराशे ते सोळाशे एमएलडी पाणी पुरवठा होत असतानाही शहराच्या सर्व भागात योग्य प्रमाणावर पाणीपुरवठा होत नाही. नियमित पाणीपुरवठा होत असतानाही शहराच्या अनेक भागात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. शहरात दररोज टॅंकरची लाखो रुपयांची उलाढाल आहे. आता अधिकृतरीत्या एक दिवसाआड पाणीपुरवठा झाला तर शहरात काय गोंधळ उडेल याची कल्पना न केलेली बरी. दुरुस्तीसाठी म्हणून एक दिवस ज्या भागाचा पाणीपुरवठा बंद केला जातो, तो सुरळीत होण्यास पुढील तीन दिवस जातात मग दिवसाआड केल्यानंतर पुणेकरांना पाणी मिळणार का, ही भीती आहे. महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांची स्थिती तर आणखीच बिकट आहे.

मुळात ज्या धरणांवर ४० ते ४५ लाख शहरी लोकसंख्या अवलंबून आहे, तेथे पुरेसा पाणीसाठा राखून का ठेवला नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे. जलसंपदा विभागाने १५ जुलै पर्यंत नियोजन करून शेतीसाठी उन्हाळ्यात दोन आवर्तन सोडली. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत साडेपाच टीएमसी पाणी कमी झाले. दुसरे आवर्तन सोडताना जलसंपदा विभागाने १५ ऑगस्टपर्यंतच्या पाण्याचा अंदाज घेणे अपेक्षित होते. यापुढे तरी पाणी वाटपाचा योग्य समतोल राखला गेला पाहिजे. आता जे संकट आले आहे, त्यावर मार्ग काढण्यासाठी पुणेकरांनी काटकसरीने वापर केला पाहिजे. धरणात पाणी नाही म्हणून नाही तर वाढती मागणी लक्षात घेऊन पाण्याचे स्थानिक स्रोतही विकसित करावे लागतील. शहरातील तलाव, विहिरी यांचा वापर करावा लागेल. नळी लावून पिण्याच्या पाण्याने गाडी धुणारे, घराबाहेर पाणी शिंपडणारे यांना अटकाव करावा लागेल. समान पाणीपुरवठायोजना, जायका प्रकल्प सुरू करून प्रक्रिया केलेले पाणी शेतीसाठी द्यावे लागेल. तरच पाणीबाणीतून सुटका होईल.

पुण्यातील पाण्याची सद्यःस्थिती

  • खडकवासला प्रकल्पातील एकूण पाणीसाठा - २९. १५ टीएमसी

  • सध्याचा पाणीसाठा - २.५३ टीएमसी

  • गेल्यावर्षीचा याचकाळातील पाणीसाठा - ८.६१ टीएमसी

  • पुण्याची दररोजची पाण्याची गरज - १४०० एमएलडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()