प्रत्येक वैश्विक साथीमध्ये मानवी जीवन एका वेगळ्या पातळीवर नेऊन ठेवले आहे. अगदी १७९६ मध्ये पहिल्या लसीचा अर्थात देवीच्या लसीचा शोध लावणाऱ्या एडवर्ट जेन्नरपासून, ते अगदी कोरोनाच्या वेगवेगळ्या लसी शोधणाऱ्या संशोधन संस्थांपर्यंत. मानवी इतिहास आणि वर्तमान प्रत्येक वळणावर अधिक प्रगल्भ होत गेले. निश्चितच आजची कोरोनाची वैश्विक साथ सर्वार्थाने वेगळी आहे. कोणतीही विषाणुजन्य आजारांची साथ आटोक्यात येते ती लसीकरणाने. देशात आज कोरोनाची दुसरी लाट हैदोस घालत आहे. अशा वेळी यातून बाहेर पडण्याचा रामबाण उपाय म्हणजे ‘लसीकरण’! लसीकरणाचे महत्त्व, तसेच अल्पावधीतच बाजारात आलेल्या लशींची परिणामकारकता आणि त्यांच्या ‘साइड इफेक्ट्स’बद्दल अजूनही जनसामान्यांच्या मनात संभ्रम आहे. जगभरात नक्की कोणत्या लसी दिल्या जात आहेत? भारतातील लस सुरक्षित आहेत का? आपण स्वतः ती लस टोचण्याची गरज आहे का? याचा घेतलेला हा आढावा...
मानवी इतिहासात प्रथमच लसीकरणाला एक जागतिक स्तरावरील ‘ग्लॅमर’ प्राप्त झाल्याचे दिसते. शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञांपासून ते लाभार्थी असलेल्या ‘फ्रंटलाइन वर्कर’पर्यंत सर्वच आता माध्यमांच्या मुख्य अजेंड्यावर आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार जगभरात २००हून अधिक कोरोना लसींवर संशोधन चालू असून, त्यातील ६० लसी क्लिनिकल ट्रायलच्या प्रक्रियेत आहेत. मोजक्या ११ लशींना विविध देशांनी लसीकरणासाठी परवानगी दिली आहे. आपण स्वतः लस टोचून घेण्यापूर्वी खरं तर लस का घेतात, हे समजून घेणे आवश्यक आहे. कोणत्याही रोगाची वैश्विक ‘साथ’ निर्माण झाली आणि त्यात मोठ्या प्रमाणावर मानवी जीवनाला धोका पोहचत असेल, तर अशा साथीविरुद्ध लढण्यासाठीचे प्रभावी अस्त्र म्हणजे लसीकरण! कारण लस घेतल्यामुळे व्यक्तीच्या शरिरात त्या आजाराविरुद्ध लढण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती विकसित होते. एकदा बहुतांश लोकांमध्ये अशी रोगप्रतिकारशक्ती विकसित झाली तर तो आजार हळूहळू समाजातून हद्दपार होतो. प्लेग, पोलिओ, स्पॅनिश फ्ल्यू असे आजार दीर्घकालीन लसीकरणामुळेच हद्दपार झाले आहेत. आजाराला कारणीभूत विषाणू, जिवाणू अथवा सूक्ष्मजीवाने शरिरात प्रवेश केला तर, त्या विरुद्ध लढण्यासाठी पेशींची रंगीत तालीम करून घेण्याचे काम लस करते.
कोरोना लसीचे वेगळेपण
ब्रिटिश डॉक्टर एडवर्ड जेन्नर यांनी १७९६ मध्ये लसीचा शोध लावला. डॉ. जेन्नर यांनी शोधलेली ‘देवी’अथवा कांजण्यांवरील लस ही जगातील पहिलीच लस होती. तेेव्हापासून तर आजपर्यंत लसीच्या शास्त्रात अनेक बदल झाले आहे. कोरोनाची लसही याला अपवाद नाही. उलट कोरोना अर्थात् कोवीड-१९ आजाराविरुद्धची लस शोधताना जगात प्रथमच आरएनए, प्रोटिन बेस्ड आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर झाला. ज्यामुळे लसीच्या संशोधनाला अधिक गती तर मिळालीच, त्याचबरोबर तिच्या वैद्यकीय चाचण्यांनाही जलदगतीने करता आल्या. लसीच्या पारंपरिक पद्धतीमध्ये आजाराला कारणीभूत विषाणू, जिवाणू अथवा सूक्ष्मजीवाला अर्धमेले करून मानवी शरीरात सोडले जाते. मानवी शरीराला धोका पोहचविणाऱ्या या शक्तीहीन सूक्ष्मजीवाला नष्ट करणे, रोगप्रतिकार करणाऱ्या पेशींना सोपे जाते. पर्यायाने पुन्हा शरीरात असा अपायकारक सूक्ष्मजीवाने शिरकाव केल्यास त्या विरुद्ध कसे लढायचे यासंबंधीचा अभ्यास त्या पेशींचा होतो आणि आपली रोगप्रतिकारशक्ती विकसित होते.
कोरोनाची लस तयार करताना फायझर आणि मॉडर्ना बायोटेकने आधुनिक प्रोटिन बेस्ड तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठ व ॲस्ट्राझेनेकाने ‘रिकाँबिनन्ट डीएनए’ तंत्रज्ञानाचा, तर भारत वैद्यक संशोधन संस्था (आयसीएमआर), राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था (एनआयव्ही) आणि भारत बायोटेक या गटाने पारंपरिक निष्क्रिय केलेल्या कोरोना विषाणूंचा वापर करत कोव्हॅक्सिन लसीची निर्मिती केली आहे. फायझरच्या लसीच्या दीर्घकालीन साठवणुकीसाठी उणे ७० अंश सेल्सिअस, तर मॉडर्नाच्या लसीसाठी उणे २० अंश सेल्सिअस तापमानाची गरज आहे. मात्र, ऑक्सफर्ड-ॲस्ट्राझेनेकाची ‘कोव्हिशिल्ड’ लस जिचे उत्पादन सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया करत आहे, तसेच ‘भारत बायोटेक’ची स्वदेशी ‘कोव्हॅक्सिन’ लसीसाठी दोन ते पाच अंश सेल्सिअस तापमानाची गरज आहे. उणे तापमानाची आवश्यकता असणाऱ्या लशींची साठवणूक आणि वाहतूक करणे खर्चिक आहे. अशा पार्श्वभूमीवर दोन अंश सेल्सिअस तापमानाच्या पुढे टिकणाऱ्या लशींचे महत्त्व अधिकच वाढते.
भारतातील लसीकरण
केंद्र सरकारने ऑक्सफर्ड-सीरमच्या ‘कोव्हिशिल्ड’, भारत बायोटेकच्या स्वदेशी ‘कोव्हॅक्सिन’ आणि रशियाच्या स्पुतनिक-५ लसीला आपत्कालीन वितरणासाठी परवानगी दिली आहे. सुरवातीच्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्याना, नंतर ज्येष्ठ नागरिकांना आणि आता ४५ वर्षे वयोगटावरील नागरिकांना ही लस दिली जात आहे. या तिन्ही लशींसाठी दोन ते आठ अंश सेल्सिअस तापमानाची गरज आहे. भारतात आधीपासूनच लसीकरणाची परंपरा आहे. म्हणजे पोलिओ लसीकरणाचा मोठा अनुभव आणि व्यवस्थापनाचे कौशल्य सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेकडे आहे. त्यामुळे या लसीकरणासाठी लशींचा पुरवठा सोडून व्यवस्थेकडे कोणतेच मोठे आव्हान नाही. भारत सरकारकडून लसीचे सुमारे ३० कोटी डोस खरेदी केले जाणार असल्याचे सुरवातीच्या माहितीतून स्पष्ट झाले आहे. प्रामुख्याने सर्वच फ्रंटलाईन लस वर्कर आणि ज्येष्ठ नागरिकांना या लशी दिल्या जातील.
लसीच्या दुसऱ्या मात्रेची आवश्यकता का?
लसीची पहिली मात्रा शरीरात रोगप्रतिकारशकक्ती विकसित करण्यास सुरवात करते. तर दुसरी मात्रा तयार झालेला रोगप्रतिकारशक्तीला ‘बूस्ट’ देते. काही कारणाने पहिल्या मात्रेत रोगप्रतिकारशक्ती कमी विकसित झाली, तर दुसऱ्या मात्रेने ती कमी भरून निघते. तसेच दीर्घकाळ रोगप्रतिकारशक्ती टिकविण्यासाठी दुसऱ्या मात्रेची गरज आहे, असे तज्ज्ञ सांगतात.
लसीकरणावेळी काय काळजी घ्याल?
सरकारने परवानगी दिलेल्या नागरिकांना अधिकृत लसीकरण केंद्रात लसीची मात्रा मिळेल. त्यासाठी आधारकार्डची आवश्यकता आहे. तुम्हाला जर दुर्धर व्याधी, सहव्याधी आणि आजार असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने लस घ्यावी. तसेच कोरोना होऊन गेला असेल तर आपल्याला एकच मात्रा घेण्याची गरज आहे. बहुतेक जणांना लस घेतल्यानंतर अंगदुखी, ताप येणे, कणकण भासणे, लस घेतलेल्या जागी सूज किंवा आग होणे, अशा तक्रारी जाणवू शकता. अशा वेळी डॉक्टरांशी चर्चा करून योग्य खबरदारी घ्यावी.
लसीचा फायदा काय?
देशाची सर्वोच्च संशोधन संस्था समजल्या जाणाऱ्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे (‘सीएसआयआर’चे) महासंचालक डॉ. शेखर मांडे म्हणतात, ‘सध्या उपलब्ध लशींमुळे कोरोना विषाणूची तीव्रता कमी करण्यासाठी उपयुक्त असल्याबद्दल वैज्ञानिक समुदायात ठाम मत तयार झाले आहे. लसीकरणानंतरही जर कोरोना झाला, तर त्यामुळे रुग्ण अत्यवस्थ (क्रिटिकल) अवस्थेत जाण्याचे प्रमाण जवळजवळ नसल्यात जमा आहे. लसीकरणामुळे केवळ मृत्युदर कमी होणार नाही, तर हॉस्पिटलायझेशन कमी होईल. मागील दोन महिन्यांत प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधांच्या आधारे जवळ जवळ सर्वच म्युटेशनवर कोरोनाच्या लशी प्रभावी ठरत असल्याचे दिसत आहे.’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.