आळंदी - ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष...देहभान विसरून नाचणारे वैष्णव...टाळ मृदंगाचा टिपेला पोचलेला गजर....अशा चैतन्यमय वातावरणात माऊली माऊली अशा जयघोषात माऊलींच्या पादुकांना शुक्रवारी सायंकाळी सव्वा सहा वाजता पंढरपूरकडे (Pandharpur) प्रस्थान ठेवले. टाळ-मृदुंगाच्या गजराने अवघा देऊळवाडा भक्तिरसात न्हाऊन निघाला. मंदिर प्रदक्षिणा करून माऊलींच्या पादुका (Mauli Paduka) आजोळघरी सतरा दिवसांसाठी मुक्कामी विसावल्या. (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala Alandi)
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सरकारने लागू केलेल्या निर्बंधांमुळे सलग दुसऱ्या वर्षी पायी वारी रद्द करण्यात आली आहे. तसेच प्रस्थान सोहळ्याला शंभर वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली होती. तसेच दर्शनासाठी साडेतीनशे दिंड्यांच्या प्रतिनिधींना परवानगी दिली. दरम्यान शुक्रवारी पहाटे घंटानाद, काकडा, पवमान अभिषेक या नैमित्यिक कार्यक्रमानंतर दुपारी साडे बाराला माऊलींना नैवेद्य दाखविण्यात आला. समाधी दर्शन पूर्णतः बंद होते. दुपारी प्रस्थान सोहळ्यास सुरूवात झाली. समाधी मंदिरात अकरा ब्रम्हवंदांनी माऊलींच्या समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवला. ऊन गळ्यात तुळशीहार आणि गुलाबपुष्पाचा हार घालून डोक्यावर चांदीचा मुकुट ठेवून सजविली. ब्रम्हवृंदांच्या मंत्रघोष सुरू होता. माऊलींचे लोभस रूप डोळ्यात साठवीत भाविकांनी हरिनामाचा गजर केला. आकर्षक फुलांची सजावट आणि रांगोळ्यांच्या पायघड्या होत्या. चार वाजता दिंड्यांतील प्रतिनिधींना मंदिरात सोडण्यास सुरूवात झाली. चोपदार बंधूंच्या मदतीने पोलिस वारकऱ्यांना मंदिरात प्रवेश देत होते. मानाच्या अश्वांचा पाच वाजता मंदिरात प्रवेश केला.
मुख्य गाभाऱ्यात हैबतबाबा यांच्या वतीने मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या वतीने आणि देवस्थानच्या वतीने मानाची आरती झाली. देवस्थानच्या वतीने मानकऱ्यांना नारळ प्रसाद देण्यात आला. पालखी सोहळा प्रमुख अॅड. विकास ढगे, प्रमुख विश्वस्त डॉ. अभय टिळक, योगेश देसाई, खासदार संजय जाधव, जिल्हा न्यायाधीश नीरज धोटे आदी उपस्थित होते. आरफळकर आणि देवस्थानच्या वतीने दिंडीप्रमुख आणि मानकऱ्यांना नारळ प्रसाद देण्यात आला. त्यानंतर संस्थानच्या वतीने दिंडीकरी, फडकऱ्यांना पागोटे वाटप केले.
ऊर्जितसिंह शितोळे सरकार, राजाभाऊ आरफळकर, राजाभाऊ चोपदार, बाळासाहेब चोपदार, रामभाऊ चोपदार उपस्थित होते. दरम्यान सोहळाप्रमुख अॅड ढगे यांनी पालखी सोहळा मालक आरफळकर यांच्या हातात माऊलींच्या पादुका दिल्या आणि माऊली-माऊलीच्या गजराने देऊळवाडा दणाणून गेला. सव्वा सहाला आरफळकर मंदिर प्रदक्षिणासाठी बाहेर पडले. पुंडलिकवरदा हरी विठ्ठल’चा जयघोष करीत पादुका आजोळघरी मुक्कामी विसावल्या. त्यानंतर समाजआरती आणि जागर झाला. दरम्यान पादुका सतरा दिवस आळंदीत मुक्कामी राहणार असून, १९ जुलैला पंढरपूरकडे रवाना होतील.
पादुका १९ जुलैपर्यंत आजोळघरीच
माऊलींचे मानाचे अश्व आणि ऊर्जितसिंह शितोळे सरकार आणि त्यांचे कर्मचाऱ्यांचा मुक्काम १९ जुलैपर्यंत आळंदीत असणार आहे. तर माऊलींच्या चल पादुकाही आजोळघरात मुक्कामी आहेत. वारीच्या वाटेवरील कीर्तन, प्रवचन, जागराच्या सेवा आजोळघरी प्रतिनिधिक स्वरूपात केल्या जातील. याचे सर्व लाइव्ह प्रक्षेपण सोशल मीडियावर प्रसारित केले जाणार असल्याची माहिती पालखी सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे यांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.