Ashadhi Wari 2024 : इंदापूरच्या अंगणी, वैष्णव धावले रिंगणी;संत तुकाराम पालखी सोहळा,इंदापूरमध्ये मुक्काम

वारकरी संप्रदायात प्रदक्षिणेला अनन्य साधारण महत्त्व आहे. प्रदक्षिणा म्हणजेच रिंगण आणि टाळ, मृदंग, वीणेचा झंकार. अशा नादब्रह्माची अनुभूती घेण्यासाठी प्रत्यक्ष सूर्यनारायणाची प्रखर किरणांसह बुधवारी हजेरी होती. ‘
Ashadhi Wari 2024
Ashadhi Wari 2024sakal
Updated on

इंदापूर : वारकरी संप्रदायात प्रदक्षिणेला अनन्य साधारण महत्त्व आहे. प्रदक्षिणा म्हणजेच रिंगण आणि टाळ, मृदंग, वीणेचा झंकार. अशा नादब्रह्माची अनुभूती घेण्यासाठी प्रत्यक्ष सूर्यनारायणाची प्रखर किरणांसह बुधवारी हजेरी होती. ‘तुकाराम तुकाराम’चा जयघोष अवकाश व्यापून टाकत होता. वैष्णवांचा उत्साह शिगेला पोचला होता. निमित्त होते इंदापूरमध्ये सव्वातास रंगलेल्या रिंगण सोहळ्याचे. त्यातील अश्वांच्या नेत्रदीपक दौडीचे आणि विठुरायाच्या नामस्मरणाचे.

देहू देवस्थान आणि निमगाव केतकी ग्रामस्थांनी बुधवारी सकाळी पादुकांना अभिषेक केला. काकडआरतीचे अभंग आळवीत सोहळा सहा वाजता इंदापूरकडे मार्गस्थ झाला. तरंगवाडी कालवा आणि गोकुळीचा ओढा येथे विसावा झाल्यानंतर साडेअकरा वाजता नगारखाना‌ अश्व रिंगणात पोचला. ‘पूर आला आनंदाचा। लाटा उसळती प्रेमाच्या॥ बांधू विठ्ठलसांगडी। पोहुनि जाऊं पैल थडी।। अवघे जन गडी। घाला उडी भाई नो॥ हें तों नाहीं सर्वकाळ। अमुप अमृतांचें जळ।। तुका म्हणे थोरा पुण्यें। ओघ आला पंथें येणें॥’ अशी अनुभूती आजच्या रिंगण सोहळ्यात होती. रिंगणातील वैष्णव प्रत्येक क्षणाचा आनंद घेत विठुरायाच्या नामाचा गजर‌ करीत होते. त्यानंतर दोन अब्दागिरी, एक गरुडटका‌ अशी ओळख असलेली देहुकर दिंडी थेट रिंगणाच्या आतील बाजूला आली.

रिंगणाच्या सूचना सुनील मोरे, अभिजित मोरे देत होते. जरी पटका असलेली पताका आणि ‌रथ पावणेबारा वाजता पोचला. यावेळी देहू संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, पालखी सोहळाप्रमुख माणिक मोरे, विशाल मोरे, संतोष मोरे, विश्वस्त संजय मोरे, भानुदास मोरे, अजित मोरे आदी उपस्थित होते.

पालखी रथातून रिंगणात बारा वाजता स्थानापन्न झाली. सुरवातीला पताकाधारी, हंडा, तुळस घेतलेल्या महिला, विणेकरी, सेवेकरी, टाळकरी, मृदंगवादक यांची प्रदक्षिणा झाली. त्यानंतर दोन्ही अश्वांना रिंगण दाखविण्याची एक प्रदक्षिणा झाली. त्यानंतर, बाबुळगावकरांचा देवाचा अश्व आणि अकलूज येथील मोहिते पाटलांचा स्वाराचा अश्व रिंगणात धावले. दोन्ही अश्वांनी नेत्रदीपक तीन दौड पूर्ण केल्या. रिंगणात मोठा जल्लोष सुरू झाला. मालकांच्या सूचनेनुसार, नामदेव चोपदार यांनी उडीच्या खेळासाठी टाळकऱ्यांना बोलविले. पुंडलिक महाराज देहूकर, कान्होबा महाराज देहूकर, चैतन्य महाराज देहूकर, सोहम महाराज देहूकर यांनी ‘भाग्याचा उदय। ते हे जोडी संतपाय॥’ हा अभंग घेतला आणि संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांची आरती झाली. त्यानंतर पालखी रथात ठेवण्यात आली आणि सोहळा इंदापूर येथील आयटीआय मैदानावर विसावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.