दर मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजता कमला नेहरू उद्यानामधील विमानाशेजारी ‘मैत्री’चा मित्र परिवार एकत्र येतो.
‘मैत्री’ संस्थेच्या कामाला यंदा २५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त येत्या शनिवारी (ता. २५) संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या सभागृहात एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यानिमित्ताने....
दर मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजता कमला नेहरू उद्यानामधील विमानाशेजारी ‘मैत्री’चा मित्र परिवार एकत्र येतो. न चुकता, सातत्याने गेली २५ वर्षे. माझा ‘मैत्री’ बरोबरचा हा प्रवास इथूनच सुरु झाला. २०१२ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून पुणे मनपा शिक्षण मंडळ सदस्य विनिता ताटके यांची ओळख झाली. ‘मैत्री’बद्दल त्यांनीच मला सांगितले व मंगळवारच्या बैठकीत ये असे सुचवले. जून महिन्यातील मंगळवारी मी या बैठकीला उपस्थित राहिलो आणि ‘मैत्री’ बरोबर कायमचा जोडला गेलो.
त्याचदरम्यान ‘मैत्री’ची ‘धडकमोहीम’ सुरू होती. ‘मैत्री’चे मित्र दर पावसाळ्यात मेळघाटात जातात. तिथे १० ते १५ दिवस राहून मेळघाटामधील आदिवासी पाड्यात कुपोषणाबद्दल जनजागृती करतात आणि स्थानिक आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रथमोपचारात मदत करतात. मेळघाटामधील धारणी तालुक्यातील कासमार गावात आमची तुकडी ऑगस्ट २०१२ मध्ये पोचली. संघर्ष काय असू शकतो आणि तो फक्त दोन वेळचे जेवण मिळण्यासाठी हे इथल्या रहिवाशांना भेटल्यावर समजले. माझ्यासाठी तर स्वतः जेवण तयार करणे हे सुद्धा नवीनच. माझा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच इथे आल्यावर बदलला.
मेळघाटात स्थानिकांची मातृभाषा कोरकू, बोली भाषा हिंदी आणि शिक्षणाची भाषा मराठी. त्यामुळे इथले विद्यार्थी गोंधळून जातात. ‘मैत्री’ने काही शिक्षणतज्ज्ञ आणि स्थानिक शिक्षकांच्या मद्दतीने कोरकू- हिंदी- मराठी असा शब्दकोश तयार केला. व्यावहारिक शेती कशी करावी, यासाठी शेती तज्ज्ञांबरोबर ‘मैत्री’ने पुढाकार घेऊन प्रशिक्षण आयोजित केले. त्यामुळे स्थानिक नागरिक मजुरी करण्यासाठी न जाता शेतीकडे वळत आहेत.
‘रद्दीतून सद्दी’ उपक्रमात नागरिकांकडून रद्दी घेतो. ती विकून जो मोबदला येईल त्याचा वापर मेळघाटामधील उपक्रमात करतो. २ ऑक्टोबर रोजी आम्ही ही मोहीम शहरासाठी राबवतो. ‘मैत्री’चे ‘इंद्रधनू’ नावाचे नियतकालिक निघते. ‘मैत्री’ला मिळणाऱ्या देणगीची माहिती देणगीदाराला दिली जाते. अशा या ‘मैत्री’शी माझी ‘दोस्ती’ झाली हे मी माझे भाग्य समजतो. ‘मैत्री’ने माझे आयुष्य व्यापक केले, समृद्ध केले, हे नक्की. आपण समाजाप्रती काही देणे लागतो, याची जाणीव ‘मैत्री’ मुळेच झाली. ‘मैत्री’ने मला असंख्य नवीन मित्र दिले. समाजामध्ये एक नवीन ओळख दिली आणि सगळ्यात महत्त्वाचे, ‘मैत्री’ने मला स्वतःशी मैत्री करायला शिकवले.
‘मैत्री’ने राबविलेले उपक्रम...
उत्तराखंडमधील आपत्तीत धान्य व कपड्यांची मदत.
सांगली पुराच्या वेळी (२०१९) पोलिस यंत्रणेबरोबर काम.
सांगलीतील खंडोबाची वाडीत प्राथमिक मदत पुरवली.
सांगलीतील आलास गावात पुनर्वसनासाठी मदत.
दोन घरांच्या पुनर्बांधणीचे काम सुरू.
पुण्यात ‘सर्वात आधी शिक्षण’ या ‘उपक्रमात महापालिकेच्या शाळांमध्ये उत्तम इंग्रजी शिकवण्यासाठी शाळेतील शिक्षकांबरोबर काम.
भोर तालुक्यातील विद्यार्थी यांना सायकलवाटप.
पुण्यात ताडीवाला रोड येथील श्रमिकांना कोविडमधून सावरण्यासाठी वित्त.
मेळघाटातील तरुणींना प्रशिक्षण देऊन त्यांना ‘आरोग्य मैत्रीण’ बनवले.
मेळघाटामधील युवक व युवतींना शहरातील स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची संधी.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.