पुणे - 'डॉक्टरांनी तातडीने मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा सल्ला दिला आहे. त्या बाबतचा प्रस्ताव ससून रुग्णालयाकडे दाखलही केला. मात्र, वैद्यकीय अधिक्षक सातत्याने बदलत असल्याने अवयव प्रत्यारोपणाची एकही बैठक झाली नाही. त्यामुळे आमच्या रुग्णाचे एकेक श्वास मोजण्याची वेळ आमच्यावर आली आहे,' अशा शब्दात रुग्णाच्या नातेवाइकांनी संताप व्यक्त केला.
अवयव दानाबाबत निर्णय घेणाऱ्या समितीचे अध्यक्ष असलेले वैद्यकीय अधीक्षक नाहीत. त्यामुळे याची बैठक तर होत नाहीच, परंतु, अपंगत्वाची प्रमाणपत्र, वैद्यकीय प्रतिपूर्ती अशी नागरिकांशी संबंधित महत्त्वाची कामे रखडली आहेत. कारण, गेल्या वर्षभरात ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक पदावर एकही अधिकारी टिकला नाही.
आतापर्यंत वर्षभरात पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. नव्याने सूत्र हाती घेतलेले अधिकारीही रजेवर गेले आहेत. त्यामुळे वैद्यकीय अधीक्षक कार्यालयाचे कामकाज विस्कळित झाले असल्याच्या तक्रारी आता पुढे येऊ लागल्या आहेत. या पार्श्वभूमिवर अवयव दानाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णाचे नातेवाईक बोलत होते.
ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक हे अवयव प्रत्यारोपण समितीचे अध्यक्ष असतात. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होते. मात्र, या अध्यक्षपद स्थिर नसल्याने बाबतचे प्रस्ताव मांडता येत नाहीत. त्यामुळे त्यावर निर्णय होऊ शकत नाही. याचा थेट फटका रुग्णाला बसत आहे. अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांचे प्राण अक्षरशः कंठाशी आले असल्याचे नातेवाइकांनी स्पष्ट केले.
वैद्यकीय अधिक्षक पदावर दृष्टीक्षेप
डॉ. विजय जाधव यांनी गेल्या वर्षी १३ एप्रिल रोजी वैद्यकीय अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर अवघ्या अडीच महिन्यांमध्ये हे पदाचा कार्यभार डॉ. भारती दासवाणी यांच्याकडे सोपविण्यात आला. त्यांनी सर्वाधिक म्हणजे आठ महिने वैद्यकीय अधीक्षक कार्यालयाचा कारभार सांभाळला.
मार्च २०२३ मध्ये परत डॉ. विजय जाधव यांच्याकडे या पदाची सूत्रे दिली. डॉ. जाधव यांना राज्य लोकसेवा आयोगातून पदोन्नती मिळाल्याने त्यांनी मार्चमध्ये या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे मेमध्ये डॉ. यल्लपा जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. अवघ्या तीन महिन्यांमध्ये त्यांना या पदावरून हटवून डॉ. सुनील भामरे यांच्याकडे जबाबदारी सोपविली. मात्र, तेही गेल्या काही दिवसांपासून वैद्यकीय रजेवर आहेत.
'अवयव दानाचे प्रस्ताव प्रलंबित असल्याचे माहिती या निमित्ताने समोर आली आहे. रुग्णांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्यामुळे अवयव दान समितीची बैठक तातडीने घेण्याच्या सूचना देण्यात येतील. त्याचा पाठपुरावा करण्यात येईल.'
- डॉ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.