Pune : भ्रष्ट यंत्रणेमुळे ‘ससून’ची लक्तरे चव्हाट्यावर! मद्यपार्टी, राजकीय हस्तक्षेप, लागेबांधे, वशील्याने व्यवस्था पोखरली

राजकीय हस्तक्षेप, लागेबांधे, वशीला आदींमुळे या रुग्णालयाची प्रशाकीय व्यवस्था पुरती पोखरली असून, रुग्णांसाठी ससूनचा आधार हरवत चालला आहे.
sassoon hospital controversy be in social trend of tamper evidence politics influence illegal activity
sassoon hospital controversy be in social trend of tamper evidence politics influence illegal activitySakal
Updated on

Pune News : ज्या रुग्णालयावर रोज हजारो रुग्ण अवलंबून आहेत, त्या ससूनमध्ये सध्या काय सुरू आहे.... तर रक्ताचे सॅम्पल बदलले जातात, पैसे घेऊन हवे तसे पेपर रंगविले जातात, अटकेत असलेल्या रुग्णांना उपचारांच्या नावाखाली हव्या असलेल्या सगळ्या सुविधा मिळतात. इतकेच नाही, तर डॉक्टरच रुग्णालयात मद्यपार्टी करतात !

राजकीय हस्तक्षेप, लागेबांधे, वशीला आदींमुळे या रुग्णालयाची प्रशाकीय व्यवस्था पुरती पोखरली असून, रुग्णांसाठी ससूनचा आधार हरवत चालला आहे. या रुग्णालयात सलग घडलेल्या घटनांमुळे येथील कारभाराची लक्तरे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहेत.

गोरगरीब रुग्णांना उपचार मिळावेत, म्हणून १८६७ मध्ये ब्रिटिशांनी स्थापन केलेल्या या रुग्णालयातील प्रशासकीय कारभार कायमच चर्चेत राहिला आहे. कधी अधिकाऱ्यांतील गटबाजी, तर ‘सीएसआर’मधून मिळालेल्या वस्तूंचा अपहार, औषधांचा गैरव्यवहार, मृतदेहाची अदलाबदली, कर्मचाऱ्यांची मुजोरी, अतिदक्षता विभागात कुत्री, मांजरे आणि उंदरांचा संचार आदी अनेक प्रकार रुग्णांनी या रुग्णालयात अनुभवले आहेत.

बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचा लौकीक आजही देशात मोठा आहे. परंतु त्याला संलग्न असलेल्या या रुग्णालयाचा कारभार गेल्या काही वर्षांपासून ढासळता आहे. एकेकाळी या रुग्णालयात नियुक्ती मिळविणे, प्रतिष्ठेचे लक्षण समजले जायचे.

परंतु, आता सरळमार्गी अधिकारी येथे येण्यास धजावत नाही. तरीही या रुग्णालयावर पुणे जिल्ह्यासह सोलापूर, लातूर, बीड, उस्मानाबाद, सातारा, सांगली, नगर आदी भागांतील रुग्ण अजूनही अवंलबून आहेत.

म्हणूनच येथे रोज सुमारे ३ हजार रुग्ण येथील ओपीडीत येतात. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरही आहेत. परंतु, अधिष्ठाता, अधीक्षक, प्रशासक आदी पदांसाठीची स्पर्धा इतकी तीव्र आहे की, तेथे नियुक्तीसाठी थेट मंत्रालयातच वशीला लावावा लागतो.

देशभर गाजत असलेल्या कल्याणीनगरमधील अपघाताच्या प्रकारणातही येथील डॉ. श्रीहरी हाळनोर आणि डॉ. अजय तावरे यांनी रक्ताचे सॅम्पल बदलण्याचे धारिष्ट्य दाखविले, यातूनच रुग्णालयाच्या कारभारावर ‘उजेड’ पडला. याबाबत ससूनचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध झाले नाहीत.

असा आहे ससूनचा प्रताप

  • २७ मे : रक्ताच्या चाचणीसाठीचे सॅम्पल बदलल्याने डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर यांना अटक

  • २२ एप्रिल : अक्षीक्षकपदाचा कार्यभार स्वीकारण्यावरून डॉ. यल्लप्पा जाधव आणि डॉ. अजय तावरे यांच्यात वाद

  • ३ एप्रिल : अतिदक्षता विभागात उंदिर चावल्याने रुग्णाचा मृत्यू

  • २ जानेवारी : रुग्णालयातच ३१ डिसेंबरला मद्यपार्टी - ९ डॉक्टरांचा सहभाग - प्रत्येकी फक्त ३०० रुपये दंड

  • २७ डिसेंबर २३ : वैद्यकीय बिल मंजूर करण्यासाठी ३ हजारांची लाच स्वीकारणारा कर्मचारी जालिंदर कुंभार याच्यावर गुन्हा

  • ६ डिसेंबर : ललित पाटीलला मदत केल्याबद्दल वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण देवकाते यांना अटक

  • ११ नोव्हेंबर : ललित पाटील प्रकरणावरून अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना न्यायालयाच्या आदेशाने हटविले

  • ३ ऑक्टोबर : अमली पदार्थ रॅकेटचा सूत्रधार ललित पाटीलचे ससूनमधून पलायन

  • ७ एप्रिल : दिव्यांग प्रमाणपत्र देण्यासाठी ६० हजारांची लाच घेतल्याबद्दल डॉ. पवन शिरसाठ यांना अटक

आमदार टिंगरेच डॉ. तावरे यांच्यासाठी आग्रही !

डॉ. अजय तावरे यांच्याकडे वैद्यकीय अधीक्षकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात यावा, अशी मागणी आमदार सुनील टिंगरे यांनी अगदी सहा महिन्यांपूर्वीच वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे एका पत्राद्वारे केली होती.

मंत्री आणि आमदार एकाच पक्षाचे असल्यामुळे मुश्रीफ यांनीही तत्काळ टिंगरे यांची मागणी मान्य करीत डॉ. तावरे यांच्याकडे ‘मलईदार’ अधीक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्याचा आदेश दिला. डॉ. तावरे यांना अटक झाल्यावर टिंगरे यांचे पत्र सोशल मीडियावर ‘व्हायरल’ झाले.

रक्ताचे सॅम्पल बदलल्याच्या आरोपावरून पोलिसांनी अटक केलेले ससून रुग्णालयातील डॉ. श्रीहरी हाळनोर आणि डॉ. अजय तावरे यांना नोटीस पाठवून स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करून आवश्यक ती कारवाई केली जाईल.

- डॉ. विंकी रुघवाणी, प्रशासक, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल, मुंबई.

मी लोकप्रतिनिधी असल्याने अनेक जण माझ्याकडे शाळा प्रवेश, वैद्यकीय उपचार, विनंती बदलीसाठी शिफारसपत्र घेण्यासाठी येतात. तसेच प्रत्येक शिफारस पत्राच्या खाली कायदेशीर बाबींची पूर्तता करून योग्य ती कार्यवाही करावी, असा उल्लेख असतो. त्यामुळे या विषयाला वेगळे वळण देणे योग्य नाही. माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून, चौकशीअंती ही बाब स्पष्ट होईल.

- सुनिल टिंगरे, आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.