School Van Parking : शाळांसमोरील कोंडी फुटणार! स्कूलव्हॅनला मिळणार पार्किंग

शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत परिसरात होणारी जीवघेणी वाहतूक कोंडी, हा नेहमीच कळीचा मुद्दा ठरतो.
School van
School vansakal
Updated on

पुणे - शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत परिसरात होणारी जीवघेणी वाहतूक कोंडी, हा नेहमीच कळीचा मुद्दा ठरतो. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी शहरातील नामांकित शिक्षण संस्थांनी होकार दर्शविला आहे.

शाळेभोवती होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक आणि संबंधित वाहन चालकांच्या सामंजस्यातून व्यवस्था उभारण्यासाठी गरज अधोरेखित झाली आहे. अशातच आता शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांशी बोलून तोडगा काढण्याचा निर्णय घेतला आहे.

‘सकाळ’च्या वतीने स्कूल रिक्षा, स्कूल व्हॅन, स्कूल बस चालक आणि शालेय विद्यार्थी वाहतूक करणारे व्यावसायिक आणि संबंधित संघटनांची बैठक १४ ऑक्टोबरला आयोजित केली होती. शाळांच्या आवारात वाहने उभी करण्यासाठी जागा असतानाही शिक्षण संस्था विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या वाहनांना आवारात थांबू देत नाहीत, परिणामी शाळांभोवती वाहतूक कोंडी होते, त्याचे सर्व खापर चालकांवर फोडले जाते.

त्यामुळे शाळांनी स्कूल बस, रिक्षा, व्हॅन यांना शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या कालावधीत शाळेच्या आवारात पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी चालकांनी या बैठकीत केली होती. या पार्श्वभूमीवर काही शिक्षण संस्थांशी संपर्क साधला असता, त्यांनी मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती आणि वाहन चालकांच्या समन्वयातून या प्रश्नावर तोडगा काढण्याची तयारी दर्शविली आहे.

शिस्तीने वाहने लावणे गरजेचे

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे म्हणाले, ‘विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या वाहनांना शाळेच्या मैदानात थांबण्याची परवानगी दिल्यास या वाहनांमुळे मैदाने खराब होतील. परिणामी मुलांच्या खेळावर परिणाम होईल. रिक्षावाल्या काकांनी समन्वय साधून शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ शिस्तीने वाहने लावल्यास वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. शिस्त पाळल्यास शाळेच्या आवारात तीन-चार रिक्षांना आळी-पाळीने जागा देणे शक्य होईल.’

शाळांनी मार्ग काढणे गरजेचे

‘शहरात मध्यवर्ती भागात असणाऱ्या अनेक शाळांना मैदाने आणि अनेक ठिकाणी मैदानांशिवाय वाहनांच्या पार्किंगसाठी जागा उपलब्ध आहे. तरीही सुरक्षेचे कारण सांगून विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या वाहनांना शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेपुरते पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. शाळांनी वाहन चालकांसमवेत बैठक घेऊन यातून मार्ग काढणे उचित ठरेल’, असे पुणे बस ओनर असोसिएशनचे स्कूल बस प्रमुख रोहिदास दगडे यांनी सांगितले.

शाळांचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती आणि विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या वाहन चालकांमध्ये समन्वयातून दिवाळीची सुटी लागण्यापूर्वी ही बैठक होईल. यात शाळेशी संबंधित स्कूल रिक्षा, स्कूल व्हॅन, स्कूल बस चालकांशी संवाद साधण्यात येईल. यावेळी चालकांचे प्रश्न जाणून घेऊन, मार्ग काढण्याच्या दृष्टीने असलेल्या पर्यायांवर कार्यवाही करून शाळा परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यात येईल.

- डॉ. गजानन एकबोटे,कार्याध्यक्ष, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी

स्कूल रिक्षा, बस, व्हॅन चालकांनी शिस्त पाळल्यास वाहतूक कोंडी होणार नाही. त्यासाठी मुख्याध्यापक आणि विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या वाहन चालकांनी सामंजस्यातून तोडगा काढून सुयोग्य व्यवस्था उभी करावी. सर्व चालकांनी संबंधित मुख्याध्यापकांशी बोलून वाहनांची आणि विद्यार्थ्यांची संख्या पाहून त्यांना शाळेत सोडण्याचे आणि पुन्हा शाळेतून घरी सोडण्याचे वेळापत्रक तयार केले जावे.

- ॲड. एस. के. जैन, अध्यक्ष, नियामक मंडळ, शिक्षण प्रसारक मंडळी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.