पुणे: देहरादून येथील राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेजच्या (आरआयएमसी) १९९ व्या तुकडीसाठी पुण्यातील सातवीच्या अनिरुद्ध उदय भोसले याची निवड झाली आहे. हचिंग्स हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच मध्ये शिक्षण घेणाऱ्या अनिरुद्धच्या या यशाने पुणेकरांच्या शिरपोचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
शिवाजीनगर येथील १२ वर्षीय अनिरुद्ध याने दुसऱ्या प्रयत्नांत हे यश मिळविले आहे. त्याचे वडील डॉ. उदय भोसले हे पशुसंवर्धन विभागात सहाय्यक आयुक्त पदावर कार्यरत आहेत. तर आई रोहिणी भोसले या माणगाव (जि. रायगड) येथे उप विभागीय कृषी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तर येत्या २० सप्टेंबर रोजी तो आरआयएमसी संस्थेत दाखल होणार असून ८ वी ते १२ वी पर्यंतच्या शिक्षणाबोरबर लष्करी प्रशिक्षण तो या संस्थेतून पूर्ण करेल.
याबाबत अनिरुद्ध म्हणाला, ‘‘लहानपणापासूनच मला लष्कराची आवड निर्माण झाली. बाबांचे मित्र कर्नल उमेश मरळ यांच्या माध्यमातून मला आरआयएमसीबाबत माहिती मिळाली होती. त्यांच्यामुळे मी एनडीएचा दिक्षान्त संचलन सोहळा, दिल्लीची प्रजासत्ताक दिनाचे संचलन सोहळा पाहिला. तसेच आरआयएमसी संस्था पाहिली. यामुळे मला लष्करात जाण्याची प्रेरणा मिळाली. त्यामुळे मी प्रवेश परिक्षेची तयारी सुरू केली. भविष्यात मला सैन्यदलात जाण्याची इच्छा आहे.’’
अनिरुद्धची आई रोहिणी म्हणाल्या, ‘‘अनिरुद्ध हा पाचवीत होता तेव्हा पासून या प्रवेश परिक्षेसाठी तयारी करत आहे. कोरोनामुळे सर्व विद्यार्थ्यांसाठी निर्माण झालेल्या मर्यादा व आव्हानांच्या पार्श्वभूमिवर राष्ट्रीय पातळीवरील ही परिक्षा उत्तीर्ण करून अनिरुद्धची महाराष्ट्रातून झालेली एकमेव निवड आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्याच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळेल.’’
आरआयएमसीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी अनिरुद्धला डॉ. रश्मी कुलकर्णी व राजेंद्र कुलकर्णी या दाम्पत्याने, कर्नल मरळ, लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) प्रदीप ब्राह्मणकर, अॅड. दशरथ घोरपडे आदींनी मार्गदर्शन केले.
आरआयएमसी बाबत
- आरआयएमसी ही भारताच्या संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारितील ‘अ’ वर्गीय संस्था
- या संस्थेतील विद्यार्थ्यांना खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीसाठी (एनडीए) ही तयार केले जाते
- संपूर्ण देशातून केवळ २५ विद्यार्थ्यांची निवड
- महाराष्ट्र - गोवा आणि उत्तर प्रदेश या राज्यातून प्रत्येकी दोन, संपूर्ण ईशान्य भारतातून एक आणि देशातील उर्वरित राज्यातून प्रत्येकी एक अशी निवड प्रणाली
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.