Semiconductor : सेमीकंडक्टर सप्टेंबरमध्ये कार्यान्वित; राज्यातील पहिला प्रकल्प

राज्यातील पहिला सेमीकंडक्टर चिप उत्पादन कारखाना १६ सप्टेंबरला कार्यान्वित होईल.
rajendra-chodankar
rajendra-chodankarsakal
Updated on

पुणे - राज्यातील पहिला सेमीकंडक्टर चिप उत्पादन कारखाना १६ सप्टेंबरला कार्यान्वित होईल, असा विश्वास आरआरपी इलेक्ट्रॉनिक्सचे अध्यक्ष राजेंद्र चोडणकर यांनी व्यक्त केला आहे. आउटसोर्स सेमीकंडक्टर असेम्बली अँड टेस्टिंग (ओसॅट) प्रणालीतील राज्यातील हा पहिलाच उद्योग असून, मार्च महिन्यात नवी मुंबईत याचे उद्घाटन करण्यात आले होते.

पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर (एमसीसीआयए) येथे आयोजित सेमीकंडक्टर इको-सिस्टीम परिषदेत चोडणकर बोलत होते. इलेक्ट्रॉनिक्समधील महत्त्वपूर्ण घटक असलेली सेमीकंडक्टर चिप आजही तैवान आणि दक्षिण कोरियातून आयात करावी लागते. भारतात सेमीकंडक्टर चिपच्या उत्पादनासाठी प्रयत्न केले जात असून, ओसॅट प्रणालीतील राज्यातील पहिलाच उद्योग सप्टेंबरमध्ये पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होत आहे.

‘सकाळ’शी बोलताना चोडणकर म्हणाले, ‘देशात चेन्नई आणि गुजरात राज्यात ओसॅट प्रणालीद्वारे सेमीकंडक्टरचे उत्पादन करणारे कारखाने आहेत. राज्यातील हा पहिलाच प्रकल्प असेल. राज्य सरकारने मोठे अनुदान दिले असून, ४५ हजार स्क्वेअर फूट जागेत हा प्रकल्प उभारला जात आहे.

प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील असून, सप्टेंबरपर्यंत तो कार्यान्वित होईल.’ यात स्वित्झर्लंड येथील एचएमटी मायक्रो इलेक्ट्रॉनिक्सचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. त्यांच्याकडून सेमीकंडक्टर वेफर्सचा पुरवठा करण्यात येणार आहे. राज्यात यामुळे स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास चोडणकर यांनी व्यक्त केला.

काय आहे ओसॅट तंत्रज्ञान

  • सेमीकंडक्टर चिप विकसित करण्यासाठी सेमीकंडक्टर वेफर्स हा कच्चा माल आहे.

  • सेमीकंडक्टर वेफर्स तयार करण्यासाठी अत्यंत क्लिष्ट आणि अत्याधुनिक फाउंड्रीजची (धातू ओतण्याचा कारखाना) गरज असते.

  • सध्या अशा फाउंड्रीज भारतात उपलब्ध नाहीत. काही मोठ्या कंपन्या अशा फाउंड्रीज उभारण्यासाठी एकत्र येत आहेत.

  • तोपर्यंत वेफर्सच्या मदतीने सेमीकंडक्टर चिप विकसित करणारे कारखाने देशातील महत्त्वाच्या शहरांत उभारले जात आहेत.

  • राज्यातही आता ही सुविधा उपलब्ध होणार आहे. यामुळे निदान २५ टक्के परदेशावरील अवलंबित्व कमी होईल.

  • भविष्यात यातूनच सेमीकंडक्टर फाउंड्रीज उभारण्याचे तंत्रज्ञान आणि आत्मविश्वास विकसित होईल. देशात रोजगाराच्या संधी वाढतील.

ओसॅट तंत्रज्ञानाच्या माध्यमातून राज्यातील पहिला सेमीकंडक्टर उत्पादन कारखाना सप्टेंबरमध्ये कार्यान्वित होईल. राज्य सरकार आम्हाला तळोद्याला जागा देत आहे. जेथे सेमीकंडक्टर वेफर्स विकसित करणारी फाउंड्री उभारण्याचा आमचा मानस आहे.

- राजेंद्र चोडणकर, अध्यक्ष आरआरपी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com