पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणाच्या तपासात पोलिसांच्या हाती मोठी माहिती आली आहे. गुंड शरद मोहोळच्या खूनप्रकरणात गुन्हे शाखेने आणखी तीन जणांना अटक केली आहे. या आरोपींनी खून करण्यासाठी वापरलेले शस्त्र खरेदी करण्यासाठी हल्लेखोरांना पैसे पुरविल्याचे पोलिस तपासातून पुढे आले आहे.
नितीन अनंता खैरे (वय ३४, रा. गादी स्टेट, कोथरूड), आदित्य विजय गोळे (वय २४) आणि संतोष दामोदर कुरपे (रा. कोथरूड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. संतोष कुरपे हा ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) या केंद्र सरकारच्या संस्थेत ऑफिस असिस्टंट या पदावर कार्यरत आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत १३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यातील दोन वकील असून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते, त्या वेळी या गुन्ह्याचे तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांनी न्यायालयात सांगितले की, मोहोळचा खून करण्यापूर्वी मुन्ना पोळेकर आणि त्याच्या साथीदारांनी हाडशी गावात गोळीबाराचा सराव केला होता. त्यात आरोपी नितीन खैरे आणि आदित्य गोळे हे सहभागी झाले होते. तसेच खैरे आणि गोळे यांनी आरोपीला शस्त्र खरेदीसाठी आर्थिक मदत केली आहे.
तसेच खुनाच्या कटात त्याचा सहभाग आहे. त्याने इतर आरोपींकडून तयारी करून घेतली. खैरे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तसेच मोहोळचा खून होण्यापूर्वी आरोपींची बैठक झाली होती. त्यात गोळे उपस्थित होता. मोहोळचा खून केल्यानंतर पोळेकरसह इतर आरोपी हे कोल्हापूरच्या दिशेने पळून जात होते. आरोपी खेड शिवापूर टोल नाक्याच्या पुढे थांबले असता त्यांचे नातेवाईक त्यांना भेटायला आले होते. त्या वेळी आरोपीला एक नवीन सिम कार्ड देण्यात आले. आरोपीने पहिले सिमकार्ड काढून नवीन सिम कार्ड मोबाईलमध्ये टाकले आणि पहिला फोन संतोष कुरपेला केला होता. शरद मोहोळचा गेम केला असून ही गोष्ट मास्टरमाइंडला सांगा, असे संभाषण त्यांच्यात झाले होते.
आरोपीच्या वतीने लोकअभिरक्षक कार्यालयाच्या वतीने ॲड. मयूर दोडके यांनी बाजू मांडली. कुरपे यांनी अनोळखी क्रमांकावरून फोन आल्याने उचलला. याबाबतची माहिती त्यांनी पोलिसांना दिली आहे. त्यामुळे कमीत कमी पोलिस कोठडी देण्यात यावी, असा युक्तिवाद ॲड. दोडके यांनी केला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपींना १७ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
हाडशी येथे गोळीबाराचा सराव
मोहोळचा खून करण्यासाठी एकूण चार पिस्तूल आणण्यात आले होते. त्यातील तीन पिस्तूल जप्त करण्यात आले आहेत. उर्वरित एका पिस्तुलाची माहिती खैरे आणि गोळे यांच्याकडे आहे. आरोपींनी हाडशी येथे गोळीबाराचा सराव केला होता. त्या वेळी आणखी काही आरोपी तेथे उपस्थित होते. पोळेकर आणि इतर आरोपींचा सोबत तपास करायचा असल्याने त्यांना दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. या गुन्ह्यात आतापर्यंत १३ आरोपींना अटक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.