विरोधात कोण आहे त्याची आम्हाला देणे घेणे नाही. फक्त विकास हाच आमचा मुद्दा असणार आहे. आणि विकासाचा मुद्दाच आम्हाला जिंकून देणार आहे. कुणीही उभं राहिले तरी ही निवडणूक आता जनतेने हातात घेतली आहे. जनतेनेच ठरवले त्यांना आमदार कोण पाहिजे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत आमचा विजय पक्का आहे, असे म्हणत वडगाव शेरी विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांनी विश्वास व्यक्त केला.
वडगाव शेरी मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांनी सोमवारी जोरदार शक्तीप्रदर्शनकरत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. वडगाव शेरी गावातून त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रॅलीला सुरुवात केली. यावेळी मतदार संघातील तरुण महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले होते. जागोजागी बापू पठारे यांचे औक्षण करून आणि पुष्पहार घालून स्वागत केले जात होते.