नुकताच लोकसभा निवडणुकीचा निकाल समोर आला. या निवडणुकीत काही महत्त्वाच्या जागांवर देशासह जगाचं लक्ष लागलं होतं. त्यापैकी एक म्हणजे बारामती. बारामतीत एकाच कुटुंबातील व्यकी एकमेकांविरोधात उभे ठाकले होते. दरम्यान या निवडणुकीत सुप्रिया सुळेंनी अजित पवार यांच्या पत्नी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. त्यानंतर देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. अशातच सातासमुद्रापार अमेरिकेतही सुळेंच्या विजयाच्या शुभेच्छांचा बॅनर झळकल्याचे चित्र आहे. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
सुप्रिया सुळे यांनी १ लाख ५८ हजार ३३३ मतांच्या मोठ्या फरकाने सुनेत्रा पवार यांचा पराभव केला होता. सुळे यांच्या लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर न्यूयॉर्कमधील टाईम्स स्क्वेअरवर त्यांचे अभिनंदन करणारा मोठा बॅनर लावण्यात आला आहे. बॅनरचा व्हिडिओ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह सुप्रिया सुळेंनी त्यांच्या सोशल मिडीयावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे.
संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी चौथ्यांदा विजय प्राप्त करत बाजी मारली. अत्यंत चुरशीची निवडणूक होईल, असा अंदाज वर्तविला गेला होता.
मात्र, अपवाद वगळता बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, भोर व खडकवासला या सहाही विधानसभा मतदारसंघांत सुप्रिया सुळे यांनी पहिल्यापासूनच घेतलेली आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत कायम राखली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा करिष्मा आणि सुप्रिया सुळे यांची मेहनत याला जनतेने कौल दिला आहे.
निवडणुकीअगोदर मांडलेली अनेक गणिते चुकीची ठरवत, आमदार, पदाधिकारी जरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बाजूने असले, तरी मतदारांनी मात्र सुप्रिया सुळे यांच्याच पारड्यात मते टाकून आपला विश्वास व्यक्त केल्याचे दिसते.
अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना रिंगणात उतरविले तेव्हापासूनच या लढतीकडे देशाचे लक्ष लागले होते. पवार कुटुंबातच लढत होत असल्याने ‘बारामतीवर वर्चस्व कोणाचे?’ हा प्रश्न उपस्थित झाला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.