'एटीएम' चोरीच्या टोळीचा पर्दाफाश; शिक्रापूर पोलिसांनी सहाजणांना पकडले

'एटीएम' चोरीच्या टोळीचा पर्दाफाश; शिक्रापूर पोलिसांनी सहाजणांना पकडले
Updated on

शिक्रापूर : महिनाभरापूर्वी एटीएम सेंटर फोडून २२ लाखांची रोकड पळविणारी आंतराज्य टोळीतील सहा जण पकडण्यात शिक्रापूर पोलिसांना नुकतेच यश आले. या गुन्ह्यात सहभागी आरोपी हरियाणा, मध्यप्रदेश आणि राजस्थान येथील असतानाही एकेक करुन सर्वांना त्या-त्या राज्यात जावून हे सहाही चोरटे शिक्रापूर पोलिसांनी जेरबंद केले असून या टोळक्यामुळे जिल्हा व राज्यातील असंख्य एटीएम चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांनी व्यक्त केली.

महिनाभरापूर्वी ५ नोव्हेंबर रोजी चाकण-शिक्रापूर रस्त्यावरील चौफुल्यावर असलेल्या भाजपाचे तालुकाध्यक्ष भगवानराव शेळके यांच्या बिल्डींगमधील आयडीबीआय कंपनीचे एटीएम फोडून पहाटे चारचे सुमारास त्यातील २१ लाख ७४ हजारांची रक्कम चोरट्यांनी पळविली होती. यात चोरट्यांनी एटीएममधील सीसीटिव्हीवर काळा रंग मारुन एका पांढ-या रंगाच्या चारचाकीमधून संपूर्ण रोकड पळविली होती.

केवळ चारचाकी अस्पष्ट दिसत असलेल्या सीसीटिव्ही फुटेजवरुन चोरट्यांपर्यंत पोहचणेही तसे अवघड होते. या प्रकरणी जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख, अतिरिक्त अधिक्षक मिलींद मोहिते व उपअधिक्षक राहूल धस यांच्या मार्गदर्शनाखाली एक तपास पथक तात्काळ नेमून या प्रकरणाचा शोध पोलिस निरीक्षक उमेश तावसकर स्वत: घेत होते. यात चोरट्यांचे परराज्यातील कनेक्षन लक्षात येताच फौजदार राजेश माळी, पोलीस नाईक योगेश नागरगोजे, निखिल रावडे, जयकुमार देवकर, अमोल नलगे, प्रतीक जगताप यांचे एक पथक थेट भोपाळ (मध्यप्रदेश) येथे पोहचले व त्यांनी मासिऊलाह अख्तर (वय २१, रा.रायपुरी, तहसील नुहू, हरियाणा), शहाजात उर्फ शहादात हजर खान (वय २५ रा.मुळ पिनगुवा, तहसील पुनाहाना, जिल्हा नुहू, हरियाणा), समशेर उर्फ दलशेर फजरू मेवाती (वय ४०, रा.गंगोरा, ता. पहाडी, जि.भरतपूर, राजस्थान), असमोह फजरुद्दीन (वय ३४, रा.नगली, पठान, पो.लागडवास, ता.किसनगडवास, जि.अलवर, राजस्थान) मुनशरीफखान उर्फ शरीफ कमरुद्दीन खान (वय २७, रा.सरसवास, पुनहाना, जि. नुहू मेवात, हरियाणा), शाकीर फजरू मेवाती (वय ३३, रा.मूळ गंगोरा, ता.पहाडी, जि.भरतपूर, राजस्थान, हल्ली रा.निशादपूर, जि.भोपाळ, मध्यप्रदेश.) आदींना एकेक करुन ताब्यात घेतले. 

दरम्यान, वरील सहाही आरोपींवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना शिरुर न्यायालयात हजर केले असता त्यांना पुढील चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती तपास अधिकारी राजेश माळी यांनी दिली.

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.