शिरूर कृषीपंप चोरणाऱ्या चौघांच्या टोळीला केले जेरबंद

मोटार चोरीच्या ठिकाणी पाळत ठेवली
pune
punesakal
Updated on

शिरूर : शेतीला पाणी पुरवण्यासाठी ओढे, तलाव व नदीकिनारी लावलेले कृषीपंप (मोटारी) चोरून, ते फोडून त्यातील तांब्याच्या तारा चोरून नेण्याचे प्रकार वाढले असताना आणि चोरट्यांनी तालुक्याच्या सर्वच भागात मोटारी टार्गेट केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरूर पोलिसांनी मोटारी चोरणाऱ्या चौघांच्या टोळीला जेरबंद केले. त्यांच्याकडून तालुक्यातील तब्बल दहा मोटारचोरीचे गुन्हे उघडकीस आले असून, १७ कृषीपंप व चोरीत वापरलेली वाहनेही पोलिसांनी जप्त केली आहेत.

पांडुरंग शिवाजी बोडरे (वय २०), कुलदीप उर्फ मोन्या बबन बोडरे (वय २०, दोघे रा. रावडेवाडी, ता. शिरूर, जि. पुणे), अजर हुसेन खान (वय २२, रा. सिन्नर, जि. नाशिक) व अख्तर उर्फ कुलू हुसेन खान (वय २७, रा. आमदाबाद फाटा, ता. शिरूर, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या चोरांची नावे असून, त्यांच्याकडून चोरीच्या १७ मोटारी तसेच चोरी करण्यासाठी वापरलेली एक मोटारसायकल व चोरलेल्या मोटारी वाहून नेण्यासाठी वापरलेला टेम्पो पोलिसांनी जप्त केला.

गेल्या काही दिवसांत शेतीकामासाठीच्या मोटारी चोरीचे अनेक गुन्हे तालुक्याच्या विविध भागात घडले होते. आमदाबाद येथून एकाच वेळी आठ तर वडनेर येथून १७ मोटारी चोरीला गेल्या होत्या. रांजणगाव एमआयडीसीतील एका कंपनीतून व बाभुळसर येथूनही एका शेतकऱ्याची मोटार चोरीला गेली होती. या सर्व ठिकाणी चोरट्यांनी प्रामुख्याने मोटारी फोडून त्यातील तांब्याच्या तारा चोरून नेल्या होत्या. शेतीच्या ऐन हंगामात मोटारी चोरीला गेल्याने पाणी असूनही ते पिकांना देता येत नसल्याने शेतकरी वर्ग हतबल झाला होता.

दरम्यान, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी कृषीपंप चोरीच्या वाढत्या घटनांची गंभीर दखल घेत शिरूर पोलिसांना कसून तपासाच्या सूचना दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर शिरूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी, पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, सहायक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर, उपनिरीक्षक सुनिल उगले यांच्या मार्गदर्शनाखाली धनंजय थेऊरकर, नजिम पठाण, सुरेश नागलोत, विशाल पालवे, दीपक पवार, राजेंद्र गोपाळे, विनोद काळे या पोलिस पथकाने आकाश येवले व बिपीन खामकर या होमगार्डच्या मदतीने स्वतंत्र पथके तयार करून सातत्यपूर्ण तपास करून मोटार चोरीच्या घटनांवर लक्ष केंद्रीत केले.

मोटार चोरीच्या ठिकाणी पाळत ठेवली. तपासादरम्यान, स्त्रोतांकडून मिळालेल्या माहितीनूसार प्रथम पांडुरंग बोडरे व मोन्या बोडरे यांना ताब्यात घेतले. त्यांनी मोटारी चोरल्याचे कबूल करीत त्या अजर हुसेन खान याच्या टेम्पोतून नेऊन कुलू खान या भंगार व्यावसायिकाला विकल्याचे सांगितले. त्याच्याही पोलिसांनी मुसक्या आवळल्या. या भंगार व्यावसायिकाच्या आमदाबाद फाटा येथील गोदामातून १७ मोटारी जप्त करण्यात आल्या.

ऐन शेतीच्या हंगामात पाणी उपलब्ध असूनही ते मोटारींअभावी शेतीला देत येत नसल्याने शेतकऱ्यांत हतबलता निर्माण झाली होती. मोटारींचा शोध लावण्यासाठी शेतकरी बांधव पोलिसांकडे हेलपाटे मारत होती. या पार्श्वभूमीवर एक - दोन नव्हे तर तब्बल १७ मोटारींचा शोध लागल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. या मोटारी तातडीने ताब्यात मिळाव्यात अशी मागणी आता शेतकरी वर्गातून होऊ लागली आहे.

शेतीला पाणी देण्यासाठीच्या मोटारी उघड्यावर बसविण्याशिवाय शेतकरी वर्गाकडे पर्याय नसला तरी काही बाबींची खबरदारी बाळगणे गरजेचे आहे. आम्ही पोलिस पेट्रोलिंग वाढवूच पण संबंधित शेतकऱ्यांनीही आळीपाळीने मोटारींकडे चकरा मारल्या पाहिजेत. शक्य असल्यास मोटारींभोवती छोटे लोखंडी कंपाऊंड करावे किंवा साखळदंडाने त्या बांधता येतील का हे पाहावे.

सुरेशकुमार राऊत पोलिस निरीक्षक, शिरूर पोलिस स्टेशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.