Shirur Loksabha Election 2024 : विकासाचे मुद्दे राहिले बाजूला आणि एकमेकांच्या टिकावर टीकाच

शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यात दुरंगी लढत होत आहे.
shivajirao adhalrao patil vs amol kolhe
shivajirao adhalrao patil vs amol kolheSakal
Updated on

चाकण - शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यात दुरंगी लढत होत आहे. हे दोघे उमेदवार आपापल्या परीने शिरूर लोकसभा मतदारसंघातील विविध गावात प्रचार दौरे करत आहेत.

दौऱ्या दरम्यान दोघाही उमेदवारांची एकमेकांवर टीका टिप्पणी होत आहे. टिका टिप्पणी पेक्षा शिरूर लोकसभा मतदार संघातील प्रलंबित विकास कामे, विकास कामे पुढे काय होणार यावर मात्र कोणी भाष्य करत नाही. त्यामुळे मतदार मात्र गोंधळला आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये दोन्ही उमेदवारांनी अजून उमेदवारी अर्ज दाखल केलेले नाहीत. महायुतीचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व महायुतीतले घटक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते जोमाने प्रचार करत आहेत तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे व घटक पक्षातील पदाधिकारी,कार्यकर्ते जोमाने प्रचार करत आहेत.

टिका, टिप्पणी चा जोर मात्र दोन्ही बाजूकडून जोरात सुरु आहे. माजी खासदार आढळराव पाटील हे कोल्हे यांनी पाच वर्षात काय केले ते कोणत्याही मतदाराला भेटले नाही.कोणत्याही गावात गेले नाहीत असे सांगत आहेत. डॉ. कोल्हे माजी खासदार आढळराव पाटलांवर टीका करून पंधरा वर्षे खासदार म्हणून त्यांनी काय केले हे सांगत आहेत.

शिरूर मतदारसंघात एकमेकांवरील टिका टिप्पणी पेक्षा या मतदारसंघाची प्रलंबित विकास कामे पुर्ण करणे महत्त्वाचे आहे. पुढील पाच वर्षात कोण कोणती विकासकामे होणार हे मात्र कोणी सांगत नाही. शिरूर लोकसभा मतदारसंघात चाकण औद्योगिक वसाहत चाकण, आळंदी तसेच विविध मोठ्या गावांचा भोसरी, हडपसर या शहरांचा समावेश आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघात शिरूर तालुक्यातील समस्या, खेड,आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, शहरातील प्रश्न विविध विषय महत्त्वाचे आहेत, पण या प्रश्न, समस्यांना कोणता उमेदवार हात घालत नाही हे वास्तव आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघ हा शहरी व ग्रामीण असा आहे. मतदारसंघात शेतकरी, कामगार, मजूर, महिला असे अनेकांचे प्रश्न आहेत.

चाकण शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न हा मागच्या निवडणुकीत वापरला गेला होता.त्या प्रश्नावर खासदार अमोल कोल्हे यांनी मोठे भांडवल केले त्यामुळे माजी खासदार आढळराव पाटील यांचा पराभव झाला. खेड तालुक्यातील गेलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ इतर अनेक प्रश्न धरणग्रस्त शेतकऱ्यांचे पुनर्वसनाचे प्रश्न, धरण प्रकल्पाचे प्रश्न अनेक प्रश्न आहेत. हे दोघेही उमेदवार या प्रश्नाकडे काय केले, काय करणार हे सांगताना दिसत नाही.

बैलगाडा शर्यतीचे श्रेय दोघे उमेदवार घेतात. शर्यत कोणी सुरू केली कोण बैलगाडा शर्यतीसाठी झटले हे नागरिकांना, मतदारांना माहित आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात अनेक प्रश्न समस्या आवासून उभ्या आहेत त्या समस्यांचा जागर होणे गरजेचे आहे. गावात येऊन प्रचार सभा घ्यायची, भाषणे करायची, एकमेकावर टीकाटिप्पणी करायची याला मतदार कंटाळले आहेत. सोशल मीडियावर दोघे उमेदवार सोशल वॉर खेळत आहेत.

दोघे उमेदवार एकमेकासाठी टीकाटिप्पणी करत सोशल मीडियावर गुंतले आहेत असे दिसते. सोशल मीडियाला मतदार मात्र हलक्यात घेत आहे. सोशल मीडियाला मतदार कोणी गंभीर्याने घेताना दिसत नाही हे वास्तव आहे. त्यामुळे सोशल मीडियावर चा प्रचार किती प्रभावीपणे आहे हे मात्र समजून येते. कामगार वर्ग, मजूर, महिला यांना निवडणुकीचे काही देणे-घेणे नाही.

जो आपले प्रश्न सोडविल आपल्याला मदतीचा हात देतील त्यालाच ते मतदान करतील असे चित्र आहे. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर विविध राजकीय नेत्यांच्या सभा झाल्यानंतर या मतदारसंघातील चित्र कोणाकडे झुकले आहे हे कळणार आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या प्रत्येक आमदाराची काय भूमिका आहे. त्यांचा प्रचार किती जोरात आहे यावर दोन्ही उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.

महायुतीतील घटक पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते किती झटतात तसेच महाविकास आघाडीचे घटक पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते किती झटतात यावर दोन्ही उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे. एकमेकांवरील टीकाटिप्पणीला मतदार महत्त्व देत नाहीत. सोशल मीडियावरील बातम्या, टीकाटिप्पणी याकडे मतदारही प्रामुख्याने पाहत नाही असे चित्र आहे.

दोन्ही उमेदवारांचा विकासाचा दृष्टिकोन काय यावर या दोन्ही उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे अशी मतदारांची चर्चा आहे. मतदारसंघात मोदीची हवा चालते की शरद पवारांची, अजित पवारांची हवा चालते हेही पाहणे महत्त्वाचे आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा, शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. या मतदारसंघात यावेळी मोदीची हवा चालते की शरद पवारांची, अजित पवारांची हवा चालते हे पाहणे महत्वाचे आहे.

कोण निवडून येणार यासाठी अनेकांच्या पैंजा लागत आहेत. माजी खासदार आढळराव पाटील यावेळी निवडून येणार तर काहीजण खासदार अमोल कोल्हे दुसऱ्यांदा खासदार होणार अशाही वल्गना करत आहेत. सर्वसामान्य मतदार मात्र अजूनही शांत आहे त्याचा कल कोणाकडे आहे हे मात्र सांगता येत नाही.

मतदार संघात शेतकरी,कामगार वर्ग, मजूर वर्ग, महिला वर्ग मोठा असल्याने कल कोणाकडे राहील यावरच त्या उमेदवाराचे भवितव्य अवलंबून राहणार आहे हे मात्र स्पष्ट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.