“केंद्रातील भाजप सरकार व राज्यातील शिंदे, फडणवीस सरकार शेतकऱ्यांचे भर दिवसा खिसे कापण्याचे काम करत आहे.''
मंचर : “दुधाची पावडर आयात केली जाते. पाच रुपये बाजार भाव वाढून दिला जातो, पण बारा टक्के जीएसटी लावली जाते. दुधाचे बाजारभाव परवडत (Milk Rate) नसल्याने दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांच्या दुधाला प्रति लिटर ४० रुपये हमीभाव द्या, अन्यथा गाई-म्हशी घेऊन मुंबई येथे मंत्रालयासमोर (Ministry of Mumbai) आंदोलन करावे लागेल”, असा इशारा शिवसेना (Shiv Sena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुणे जिल्हाप्रमुख सुरेश भोर यांनी दिला.
मंचर (ता. आंबेगाव) येथे शनिवारी (ता. ६) छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षाच्या वतीने दूध दर वाढीसाठी आंदोलन करण्यात आले. त्यावेळी भोर बोलत होते. यावेळी जिल्हासंघटक राजाराम बाणखेले, उपजिल्हाप्रमुख दिलीप पवळे, जुन्नर तालुका प्रमुख माऊली खंडागळे, शिरूर तालुका प्रमुख गणेश जामदार, माजी सदस्य प्रज्ञा भोर, विकास जाधव, बबनराव गव्हाणे, दत्तात्रय खानदेशे, अरुण बाणखेले, भरत मोरे, हेमंत एरंडे, नितीन भालेराव, रोहन कानडे, गणपत घोडेकर, मयुरी भोर यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
मंचर बसस्थानकापासून गोमातेची पूजा केल्यानंतर मोर्चाला सुरुवात झाली. लक्ष्मी रस्त्याने छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलकांनी घेतलेल्या सभेत भोर यांनी राज्य व केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, “राज्यातील जवळपास सर्व शेतकरी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करतात. पण, गेल्या सात-आठ वर्षात पशुखाद्याचे दर मात्र तीन पटीने वाढले. दुधाचे दर मात्र दिवसेंदिवस कमी होत चालले आहेत. दूध व्यवसाय परवडत नसल्याने अनेक शेतकऱ्यांना संकरित गाई विकण्याच्या प्रसंगाला सामोरे जावे लागत आहे. शेतकऱ्यांचा दूध व्यवसाय आर्थिक अडचणीत सापडला आहे. दुधाला तातडीने ४० रुपये हमीचा बाजारभाव द्या, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करावे लागेल. याची नोंद राज्य सरकारने घ्यावी.
राजाराम बाणखेले म्हणाले, “केंद्रातील भाजप सरकार व राज्यातील शिंदे, फडणवीस सरकार शेतकऱ्यांचे भर दिवसा खिसे कापण्याचे काम करत आहे. दहा वर्षांपूर्वी दुधाला ३० ते ३२ रुपये बाजारभाव होता. तोच बाजार भाव कमी होऊन आता शेतकऱ्याला २३ ते २५ रुपये बाजार भाव मिळत आहे. शेतकऱ्यांनी कसा दूध व्यवसाय करावा हा मोठा प्रश्न निर्माण झाला. दूध उत्पादकांच्या भावनांचा अंत न पाहता दूध बाजार भाव वाढीचा निर्णय त्वरित जाहीर करावा."
दूध दरवाढीसाठी आंदोलन व भाषणे झाल्यानंतर निवेदन स्वीकारण्यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांना थोडा उशीर झाला होता. त्यामुळे मुख्य चौकात शिवसैनिकांनी ठिय्या आंदोलन करून राज्यसरकार विरोधात घोषणाबाजी केली. आंबेगाव तालुक्याचे नायब तहसीलदार सचिन वाघ व पोलीस उपनिरीक्षक सोमशेखर शेटे यांनी आंदोलक शिवसैनिकांसमवेत सकारात्मक चर्चा केली. आंदोलन मागे घेण्याची विनंती केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, आंदोलन प्रसंगी शिवसैनिकांनी रस्त्यावर दूध ओतले नाही. मसाला दूध करून उपस्थित नागरिक, दुकानदार व आंदोलकांना पिण्यासाठी दिले. शिवसैनिकांच्या या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.