Election Results : पंधरा वर्षं जुनं स्वप्न पूर्ण; आढळराव हारले; वळसे पाटील आनंदी!

shirur_patil.jpg
shirur_patil.jpg
Updated on

पुणे : विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलिप वळसे पाटील यांचे शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना पराभूत करण्याचे स्वप्न तब्बल 15 वर्षांनंतर साकार झाले. आढळरावांच्या पराभवाचा आनंद हा राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांना झाला असेलच. पण त्या पेक्षा जास्त आनंद हा वळसे पाटील यांना झाला असेल.

वळसे पाटील आणि आढळराव हे एके काळचे दोस्त. वळसे पाटील यांनीच त्यांना आंबेगावच्या राजकारणात आणले आणि भीमशंकर कारखान्याचे अध्यक्ष केले. 2004 मध्ये आढळराव यांची राजकीय महत्त्वाकांक्षा जागृत झाली आणि खासदार होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. तेव्हा वळसे पाटील यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी त्यांना देण्यास विरोध केला. तेव्हा मोठ्या हिमकतीने शिवसेनेचे तिकिट आणून आणि ती निवडणूक जिंकून आढळराव हे पुणे जिल्ह्यातील `दादा` ठरले होते.

शरद पवारांच्या पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पराभूत करणे, ही मोठी कामगिरी बजावत आढळराव हे जायंट किलर ठरले. आढळराव हे खासदार झाले आणि वळसे पाटील यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. ज्या मंत्र्यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार पराभूत झाला, त्या मंत्र्याने राजीनामा देण्याचा निकष राष्ट्रवादीने तेव्हा लावला होता. त्याचा फटका वळसे यांना बसला.

त्यानंतर वळसे आणि आढळराव यांच्यातील राजकीय संघर्ष वाढतच गेला. वळसे यांना विधानसभा निवडणुकीत पाडण्यासाठी आढळरावांनी प्रयत्न केले. त्यासाठी 2009 च्या विधानसभा निवडणुकीत आढळरावांच्या पत्नी कल्पना यांनी वळसे पाटलांच्या विरोधात आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली. मात्र त्या पराभूत झाल्या. वळसेंना आढळरावांना लोकसभेला हरविणे जमत नव्हते आणि आढळरावांना वळसेंना विधानसभेत पराभूत करणे शक्य होत नव्हते. 

यावरून या दोघांत `सेटलमेंट`असल्याचीही चर्चा होत होती. मात्र आंबेगाव तालुक्यांतील दोन्ही नेत्यांच्या स्थानिक कार्यकर्त्यांत तीव्र संघर्ष होता. मात्र दोन्ही कधीही निवडणुकीत थेट आमनेसामने आले नाहीत.

2004 ते 2009 या कालावधीत वळसे पाटील मंत्री राहिले. मात्र पुन्हा 2009 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनाच उमेदवारी देण्याचा मनसुबा राष्ट्रवादीतील काही नेत्यांच्या होता. मात्र त्यांनी तो सफल होऊ दिला नाही. 2014 मध्येही वळसेंच्या नावाची चर्चा होती. मात्र तेव्हाही ते रिंगणात आले नाहीत. आढळरावांनी हॅट ट्रीक करत राष्ट्रवादीला अस्मान दाखविले.

आढळराव हे अजिंक्य असल्याचा समज पसरला होता. त्यामुळे त्यांच्याविरोधात उभे राहण्यास राष्ट्रवादीचे नेते कचरत होते. अखेरीस 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने अमोल कोल्हेंसारखा नवा आणि अभिनेता उमेदवार देत आढळरावांचा चौकार रोखला. आढळरावांनी कडवी झुंज दिली. मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांना या वेळी रोखले. या रोखण्यात वळसे यांची भूमिका महत्त्वाची होती. त्यांनी खेड, जुन्नर, आंबेगाव आणि शिरूर या चार विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी घेतली होती. भोसरी आणि हडपसरची जबाबदारी ही खुद्द अजित पवारांकडे होती.

या दोन नेत्यांत वळसे पाटलांना तालुक्यातील आपल्या कडव्या स्पर्धकाला रोखल्याचा आनंद वेगळाच असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.