शिवसेना म्हणतेय 'तहसिलदार हटवा, मुळशी वाचवा'

शिवसेना म्हणतेय 'तहसिलदार हटवा, मुळशी वाचवा'
Updated on

पौड : मुळशी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीसाठी विविध गावात बोगस मतदार नोंदणी झाली. याबाबत महसूल खात्याकडे पुराव्यासह पाठपुरावा करूनही ती नावे कमी केली गेली नाहीत. अनेकवेळा भेटून, निवेदने देवूनही कार्यवाही न झाल्याने शिवसेना आणि युवासेनेच्यावतीने तहसिलदार अभय चव्हाण यांच्या विरोधात तहसिल कचेरीवर निषेध मोर्चा काढला. तालुक्याच्या इतिहासात प्रथमच तहसिलदारांविरोधात आंदोलन झाले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बारामती लोकसभा मतदार संघाचे संपर्कप्रमुख सत्यवान उभे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. यावेळी बाळासाहेब चांदेरे, रमेश कोंडे, स्वाती ढमाले, संगीता पवळे, अविनाश बलकवडे, संतोष मोहोळ, संतोष तोंडे, राम गायकवाड, ज्योती चांदेरे, ज्ञानेश्वर ढफळ, वैभव शितोळे, अमोल मोकाशी, शिवाजी बलकवडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी उभे म्हणाले की महसूल शासन लोकशाहीचे अधःपतन करू पाहत आहे. बोगस मतदार नोंदणीचा प्रश्न अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्याद्वारे मांडला जाणार आहे. निवडणूक आयोगापेक्षा स्वतःचे आदेश अधिकारी देतात. प्रशासनाने सरकारी नियम पायदळी तुडवू नका. बोगस मतदारांचे नाव कमी करा अन्यथा आंदोलन पेटवू. चांदेरे म्हणाले की तालुक्याच्या महसूल प्रशासनाकडून सध्या वेगळे काम चालू आहे. काही ग्रामपंचायतीत नवऱ्याचे नाव एका प्रभागात बायकोचे नाव दुसऱ्या प्रभागात नोंदविले गेले आहे. शिवसेनेचा जन्म आंदोलनासाठी झाला आहे. सत्ता असो वा नसो मराठी माणसाला न्याय देण्यासाठी शिवसेना कुठेही कमी पडणार नाही.

कोंडे म्हणाले की मतदारांची ऑनलाईन नावनोंदणी केल्यानंतर त्याच्या प्रती महसूल खात्याकडे असतात. तर मग तक्रारदारांना त्या का दाखविल्या जात नाहीत. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम तहसिलदारांकडून होत आहे. मयताच्या वारसाची नोंद वेळेत होत नसल्याने पीककर्ज मिळण्यास अडचणी येतात. सर्वसामान्यांच्या कष्टाचा घामाचा पैसा तुम्हाला पगाराच्या रूपाने मिळतो, त्याची जाणीव ठेवा. बीएलओ प्रत्येक घरापर्यंत फिरला पाहीजे. बोगस मतदार रद्द केले पाहीजे. जीआरनुसार कार्यवाही करा.

यावेळी ढमाले, बलकवडे, पवळे, मोहोळ, गायकवाड यांचीही भाषणे झाली. यावेळी तहसिलदार हटवा, मुळशी वाचवा अशा घोषणा दिल्या. त्यानंतर तहसिलदारांच्या दालनात जावून निवेदन देण्यात आले. यावेळी भोरचे प्रांत राजेंद्रकुमार जाधव, तहसिलदार चव्हाण, निवासी नायब तहसिलदार भगवान पाटील उपस्थित होते. डफळ यांनी आभार मानले. यावेळी पौड पोलिसांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

याबाबत तहसिलदार चव्हाण म्हणाले की शिवसेनेने दिलेली बोगस मतदारांची नावे मोघम स्वरूपाची आहे. मतदार नाव नोंदणीबाबत पुराव्यासह वैयक्तिक आलेल्या तक्रारींची सोडवणूक यापूर्वी केली आहे. आयोगाने दिलेल्या सूचनांनुसारच मतदार नोंदणीचे काम केले गेले आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी किंवा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे रितसर तक्रार करावी. 

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.