पुणे : ‘‘भारतातील प्राचीन वैद्यकशास्त्र असलेले आयुर्वेद हे मानवी शरीरातील व्याधींबरोबरच मानसिक दोषांवरही उपचार करते. मानसिक उपचार करत असतानाच आध्यात्मिक अविष्काराची अनुभूती येते. त्यामुळे संपूर्ण जग आता वेद, आयुर्वेद आणि योगशास्त्राच्या मार्गाने वाटचाल करत आहे. जगाला हा अध्यात्म आणि आयुर्वेदाचा मार्ग दाखविण्यात श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांचे मोठे योगदान आहे,” असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गुरुवारी केले.
श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या पुतळ्याचे अनावरण कोश्यारी यांच्या हस्ते झाले. ‘संतुलन आयुर्वेद'' व ‘बालाजी तांबे फाउंडेशन''तर्फे आयोजित हा कार्यक्रम कार्ला येथील आत्मसंतुलन व्हिलेज येथे झाला. त्या वेळी कोश्यारी बोलत होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, सुनील तटकरे, श्रीरंग बारणे, ‘बालाजी तांबे फाउंडेशन’च्या अध्यक्षा वीणा तांबे, ‘बालाजी तांबे हेल्थकेअर’च्या व्यवस्थापकीय संचालिका डॉ. मालविका तांबे, ‘संतुलन आयुर्वेद’चे भारतातील व्यवस्थापकीय संचालक सुनील तांबे, ‘संतुलन आयुर्वेद’चे जर्मनीतील व्यवस्थापकीय संचालक संजय तांबे उपस्थित होते.
कोश्यारी म्हणाले, “मानवी शरीर हे फक्त भौतिक नाही. त्यात आत्मा आहे. त्यामुळे भारतीय संस्कृतीत १६ संस्कारांना महत्त्व दिले आहे. आपल्या प्राचीन संस्कृतीमध्ये शरीरापेक्षाही अध्यात्माला जास्त महत्त्व दिले आहे. आयुर्वेदाचा थेट संबंध अध्यात्माशी आहे. हे सूत्र श्रीगुरू तांबे यांनी जाणले होते.”
श्रीगुरू तांबे यांनी भारतीय प्राचीन ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घातली. त्या माध्यमातून भारताचे आयुर्वेद हे प्राचीन वैद्यकशास्त्राचे महत्त्व जगभरात पोहोचविले. त्यांनी आयुष्यभर केलेल्या या कार्याबद्दल भारतीय समाज नेहमी त्यांचा ऋणी राहील. आयुर्वेद शरीरासोबत माणसाचा मानसिक आणि आध्यात्मिक विकास साधणारा असल्याचा संदेश डॉ. तांबे यांनी आपल्याला दिला आहे, असेही कोश्यारी यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट केले.
आत्मसंतुलनाचे महत्त्व
कार्ला येथील ‘आत्मसंतुलन व्हिलेज’बद्दल बोलताना कोश्यारी यांनी आत्मसंतुलनाचे महत्त्व विशद केले. ते म्हणाले, “जीवनात आत्मसंतुलन महत्त्वाचे असते. चरक, सुश्रुत अशा ऋषींनी तपश्चर्या करून आयुर्वेद विकसित केले. हे ज्ञान समाजापर्यंत पोचविण्याचा संकल्प करणे, हाच खऱ्याअर्थाने श्रीगुरू तांबे यांचा वारसा पुढे घेऊन जाणे आहे. त्यासाठी संतुलन महत्त्वाचे ठरते. आपल्या दिवसापासून रात्रीपर्यंत प्रत्येक वेळी काय करावे, हे आपल्या शास्त्रात नमूद केले आहे. त्यानुसार आपली दिनचर्या ठेवल्यास आपले जीवन संतुलित होईल. आज धकाधकीच्या जीवनात हे समजून घ्यायला कोणाकडेच वेळ नाही. पण, यादृष्टीने प्रयत्न करायला सुरवात केली पाहिजे. योग, अध्यात्म, ध्यानधारणा हे आत्मसंतुलनाची साधने आहेत.”
हिमालयातील ऋषीकेशसारख्या ठिकाणी असलेल्या आश्रमांमधून परदेशी नागरिकांची संख्या वाढत आहे. ते तेथे चार-चार तास ध्यानधारणा करतात. स्वित्झर्लंड, युक्रेन, रशिया अशा वेगवेगळ्या देशांमधून आलेले स्त्री-पुरुष ध्यान करताना दिसतात. मानसिक शांततेसाठी आत्मसंतुलन हा एकच मार्ग आहे, असेही त्यांनी सांगितले.
परदेशात वाढतोय आयुर्वेद
“आयुर्वेदाचे महत्त्व परदेशांमध्ये वाढत आहे. भारतातील अनेक वैद्य ही उपचार पद्धती शिकून परदेशात प्रभावीपणे ती वापरत आहेत. आत्मशांतीसाठी सांगण्यात आलेल्या योग, ध्यानधारणा यांचा अंगीकार परदेशी नागरिक करत आहेत. मात्र, आपल्याच देशात या उपचार पद्धतीकडे म्हणावे तसे महत्त्व दिले जात नाही. संतुलित आणि सुदृढ जीवनशैलीसाठी आयुर्वेद, योग, ध्यान, अध्यात्म हे अतिशय महत्त्वाचे आहेत,’’ असेही कोश्यारी यांनी नमूद केले.आयुर्वेद उपचार पद्धतीला घराघरांत नेण्याचे काम श्रीगुरू तांबे यांनी केले. त्यांचा हा वारसा तांबे कुटुंबीय आणि त्यांचे सहकारी सक्षमपणे पुढे चालवतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. संजय तांबे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. मालविका तांबे यांनी केले तर, सुनील तांबे यांनी आभार मानले.
श्री गुरू डॉ. बालाजी तांबे यांनी मागील ४० वर्षांपासून योग, अध्यात्म, आयुर्वेद, पंचकर्म, वेद, आध्यात्मिक संगीत, संतुलन जीवन पद्धती आणि भारतीय संस्कृतीच्या संकल्पनेस देश-विदेशात पोहोचवले आहे. आयुर्वेद या शास्त्राला प्रतिष्ठा प्रस्थापित करण्याचे ध्येय त्यांनी आयुष्यभर डोळ्यासमोर ठेवून कार्य केले. त्यांनी शारीरिक स्वास्थ्यासोबतच आध्यात्मिक व मानसिक स्वास्थ्याला खूप महत्त्व दिले. आधुनिक विज्ञानाच्या बाबतीतही डॉ. तांबे स्वागतशील होते.
आयुर्वेद हे आर्थिकदृष्ट्या सक्षम असावे, परंतु त्याचे व्यापारीकरण होऊ नये यासाठी ते प्रयत्नशील असत. या शिकवणीनुसारच ‘संतुलन आयुर्वेद’ आणि ‘आत्मसंतुलन व्हिलेज’ या परिवारातील प्रत्येक सदस्य कार्यरत आहे. आयुर्वेदिक औषधे ही शास्त्रोक्त पद्धतीनेच बनवली जावी त्यासोबतच त्याचे परीक्षण, संशोधन आणि परिणाम यावर काम व्हावे, याकडे आमचा कटाक्ष असतो. आजपर्यंत लाखो लोकांना याचा उपयोग झाला आहे. आमच्या स्वतःच्या दोन आयुर्वेदिक उत्पादनांच्या फार्मसी आहेत. सुनील तांबे यांनी नवनवीन तंत्रज्ञान या फार्मसीमध्ये आणून त्या अद्ययावत केल्या आहेत. त्यांनी दाखवलेल्या या मार्गावर आम्ही त्यांचे हे कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत.
- डॉ. मालविका तांबे (एमडी आयुर्वेद) संचालक, बालाजी तांबे हेल्थकेअर
श्रीगुरू तांबे यांनी देशापुरता मर्यादित आयुर्वेदाचा ठेवा जगाच्या कानाकोपऱ्यात नेण्याचेच फक्त कार्य केले नाही, तर आयुर्वेद ही जगातील एक महान उपचार पद्धती असल्याचे सिद्ध करून दाखविले. त्यांनी नवीन पिढीला चांगले संस्कार दिले. इतकेच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार आणि शिवसेना पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे या तर दोन भिन्न विचारधारा असलेल्या राजकीय पक्ष प्रमुखांनी याठिकाणी उपचार घेतले होते. वैद्यकशास्राला आव्हान देणारे भविष्यात निर्माण होणाऱ्या नवीन आजारांवर उपचार शोधण्याचे काम बालाजी तांबे फाउंडेशनच्या माध्यमातून निश्चित होईल, असा मला विश्वास आहे.
- सुनील तटकरे, खासदार
श्रीगुरू तांबे हे व्यवसायाने आयुर्वेद तज्ज्ञ होते. ते शिक्षणाने अभियंता होते. त्यांचे वर्तन हे सामाजिक कार्यकर्त्याचे होते. इंद्रायणीकाठी असलेल्या या आत्मसंतुलन व्हिलेजमध्ये पाण्याची मोठी कमतरता होती. मात्र, डॉ. तांबे यांच्या कार्यामुळे नंतरच्या काळात या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांच्या डोळ्यात आनंदाश्रू येत. यामुळेच इंद्रायणी काठीचे हे स्थळ म्हणजे ‘बालाजीची आळंदी’ असे म्हटले, तर वावगे ठरणार नाही.
- श्रीनिवास पाटील, खासदार
घरचं नातं म्हणून मी श्रीगुरू तांबे यांच्या परिवारात वावरलो. त्यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमातही सहभागी झालो होतो. त्यांनी ४० वर्षे आयुर्वेदाच्या माध्यमातून माणसांना घडविण्याचे काम केले. लोणावळा या पर्यटन स्थळाला आयुर्वेदिक उपचाराचे केंद्र बनविण्याचे महान कार्य श्रीगुरू तांबे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी केले आहे.
- श्रीरंग बारणे, खासदार
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.