सिंगापूर (ता. पुरंदर) येथील प्रगतशील शेतकरी अभिजित गोपाळ लवांडे यांनी केवळ ३० गुंठ्यांत नियोजनबद्ध तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर अंजिराचे विक्रमी १४ टन उत्पादन घेतले.
गराडे - सिंगापूर (ता. पुरंदर) येथील प्रगतशील शेतकरी अभिजित गोपाळ लवांडे यांनी केवळ ३० गुंठ्यांत नियोजनबद्ध तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर अंजिराचे विक्रमी १४ टन उत्पादन घेतले व त्यातून १० लाख रुपयांचा नफा मिळवला. सासवड, पुणे, मुंबई, कोल्हापूर, हैद्राबाद, गुजरात, दिल्ली येथे लवांडे यांच्या खट्टा आणि मीठा बहारातील अंजिराची गोडी लागली आहे. यामुळे ते मालामाल बनले आहेत.
लवांडे हे सासवड येथील किर्लोस्कर न्यूमॅनिटिक कंपनीत नोकरी होते. मात्र, कोरोना महामारीच्या काळात त्यांची नोकरी गेली. त्यामुळे त्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली. शेतकरी शास्त्रज्ञ मंच जाधववाडी, पुरंदर हायलॅंड फार्मर प्रोड्युसर कंपनी सिंगापूर संस्थेचे ते सदस्य आहेत. त्यांनी कृषी विभाग, आत्मा, कृषी विज्ञान केंद्र, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, अंजीर सीताफळ संशोधन केंद्र जाधववाडी यांच्या मार्गदर्शन घेतले व अंजिराचे भरघोस उत्पादन घेतले.
उत्पादन वाढीसाठी वडील व काका तसेच समीर डोंबे व मोठे बंधू मंगेश लवांडे तसेच कुटुंबीयांचे सहकार्य लाभल्याचे लवांडे सांगतात. अंजीर बागेचा प्रकल्प यशस्वीपणे राबवण्यापाठीमागे उपविभागीय कृषी अधिकारी, बारामती वैभव तांबे, तालुका कृषी अधिकारी पुरंदर सूरज जाधव यांचे लवांडे यांना मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले. पिसर्वेचे मंडळ कृषी अधिकारी जी. डी.वाघमारे, कृषी पर्यवेक्षक सचिन जगताप, कृषी सहायक कृष्णात खोमणे यांचे शासकीय योजनांसाठी वेळोवेळी खूप सहकार्य मिळाल्याचे लवांडे ''सकाळ''शी बोलताना सांगतात.
सेंद्रिय खतांमुळे असे वाढविले उत्पादन
सेंद्रिय खतांचा वापर केल्या फळांना चमक, गोडवा वाढला
जिवामृत, घण जिवामृत, दशपर्णी अर्क, निमास्त्र यांचा वापर
गांडूळ खत, शेणखत, कंपोस्ट खत, भूशक्ती (कोंबडी खत )व पाचटांचा वापर करून जिवाणूंची संख्या वाढवली,
झाडांच्या भोवती पाचटांचे अच्छादन करून कमी पाण्यात अधिक उत्पन्न
तोडलेला माल बागेतून बाहेर आणि फवारणीसाठी आधुनिक यंत्रणांचा वापर
एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन
लवांडे यांनी एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी विविध प्रकारच्या सापळ्यांचा गरजेनुसार वापर केला. किडीबद्दल माहिती समजावून घेऊन त्यानुसार तज्ज्ञ मंडळींचे वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यानुसार विविध प्रशिक्षणे व मार्गदर्शन याचा अभ्यास करून नियोजन केले. अंजीर, सीताफळ संशोधन केंद्र जाधववाडी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि कृषी विज्ञान केंद्रे येथील विविध प्रशिक्षणे, प्रदर्शने आणि भेटी घेऊन लवांडे यांनी शेतीत एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन सोबत सिंचन सुविधांत बदल केला. तुषार सिंचन पद्धतीमध्ये बदल केला.
शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती न करता आधुनिक शेतीकडे वळावे. कृषी विभागामार्फत अनेक योजना राबविल्या जातात. त्या संधीचा लाभ घ्यावा. कृषी विद्यापीठाने तयार केलेले अंजिराचे आधुनिक वाण खरेदी करून लागवड करावी. शेतकऱ्यांनी रासायनिक शेतीकडे न वळता जैविक आणि सेंद्रिय शेती करावी. यामुळे उत्पादन अधिक येते.
- अभिजित लवांडे, अंजीर उत्पादक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.