किरकटवाडी: सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी फाटा येथील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर होत असून रविवारच्या सुट्टीमुळे खडकवासला बाजूकडे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
अरुंद रस्ता व त्या तुलनेत किरकटवाडी व खडकवासला बाजूकडून मोठ्या प्रमाणात येणाऱ्या वाहनांमुळे किरकटवाडी फाट्याजवळ वाहतूक सुरळीत करताना पोलीस कर्मचारी हतबल झाल्याचे दिसून आले.
रविवारची सुटी व संततधार पाऊस सुरू असल्याने तयार झालेले निसर्गरम्य वातावरण यामुळे खडकवासला,सिंहगड व पानशेत परिसरात पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. हॉटेल, फार्महाऊस व रिसॉर्ट हाऊसफुल्ल झाले होते.
सायंकाळी पाच नंतर खडकवासला धरण चौक व किरकटवाडी फाटा येथे परतीच्या प्रवासाला निघालेल्या पर्यटकांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्यास सुरुवात झाली होती. त्यातच सणसनगर येथे मनन आश्रमात गुरुपौर्णिमेनिमित्त मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नागरिक आल्याने किरकटवाडी फाट्याजवळील अरुंद रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती.
किरकटवाडी फाट्यापासून किरकटवाडी गावापर्यंत व पश्चिमेकडे खडकवासला गावापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यात पर्यटकांसह स्थानिकांनाही मनःस्ताप सहन करावा लागला. दिवसेंदिवस किरकटवाडी फाट्याजवळील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत चालल्याने याबाबत आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.
"स्थानिकांना घराच्या बाहेर पडणे अवघड झाले आहे. एखाद्या दिवशी ठिक आहे परंतु सातत्याने असे होत असेल तर याबाबत प्रशासनाने योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे."
- अनिकेत मते, नागरिक खडकवासला.
"किरकटवाडी फाट्यापासून गावापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सणसनगर येथील कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत त्यांनी परिस्थितीचा अंदाज घेणे आवश्यक आहे. अप्रत्यक्षपणे स्थानिकांना वेठीस धरल्यासारखे होत आहे."
- हरेश मंडले, नागरिक, किरकटवाडी.
"किरकटवाडी फाट्याजवळ वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले होते. अरुंद रस्ता व त्या तुलनेत असलेली मोठी वाहनांची संख्या यांमुळे वाहतूक सुरळीत करण्यात मर्यादा येत आहेत."
- आयपीएस अनमोल मित्तल, प्रभारी अधिकारी, हवेली पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.