किरकटवाडी - सिंहगड रस्त्यावरील खडकवासला गावच्या हद्दीत कोल्हेवाडी येथे सराईत गुन्हेगाराने हॉटेलची तोडफोड करून कामगारांना मारहाण करत पैसे लुटल्याची घटना काल रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
धक्कादायक म्हणजे याबाबत माहिती मिळाल्यानंतर कारवाईसाठी आलेले हवेली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम यांनाही या गुन्हेगाराने मारहाण केली आहे. वैभव इक्कर (वय 22, रा. कोल्हेवाडी, खडकवासला) असे त्या सराईत गुन्हेगाराचे नाव असून पोलीसच सुरक्षित नसतील तर सामान्य नागरिकांचे काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
सराईत गुन्हेगार वैभव इक्कर व त्याचा एक साथीदार इंद्रप्रस्थ हॉटेल मध्ये गेले असता तेथील कर्मचाऱ्यांसोबत त्यांनी अगोदर हुज्जत घालून दारुच्या बाटल्या फोडल्या. याबाबत माहिती मिळताच हवेली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम व इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
त्यावेळी वैभव इक्कर याने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम यांना मारहाण केली. त्यावेळी पोलीस तेथून निघून गेले.
काही वेळानंतर त्या सराईत गुन्हेगाराने हॉटेलमधील कामगारांना मारहाण करत फ्रीज, काचेचे दरवाजे, दारुच्या बाटल्या यांसह इतर वस्तूंची तोडफोड करत सुमारे एक ते दिड लाखाचे नुकसान करुन गल्ल्यातील पंचवीस ते तीस हजार रुपये काढून घेतले. ही सर्व घटना हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून याबाबत हॉटेल चालकाने हवेली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
आतापर्यंत तीन वेळा पोलीसांना मारहाण
वैभव इक्कर या सराईत गुन्हेगाराने आत्तापर्यंत तीन वेळा हवेली पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मारहाण केलेली आहे. तसेच पोलीसांना अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत आपण कोणाच्या बापाला घाबरत नाही असे म्हणत त्याने अनेक वेळा कोल्हेवाडी परिसरात गोंधळ घातलेला आहे. त्याच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचे तब्बल तीन गुन्हे दाखल असून इतरही अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सर्वसामान्य नागरिक व व्यावसायिकांमध्ये दहशत
आपण पोलीसांनाही मारलं आहे, पोलीस अधिकारीही आपल्या नावाला घाबरतात असे हा गुन्हेगार जाहिरपणे सांगून दहशत माजवित असल्याने सर्वसामान्य नागरिक व परिसरातील व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
त्याच्या दहशतीमुळे उघडपणे बोलायला नागरिक घाबरत आहेत. किमान यावेळी तरी या गुन्हेगारावर कठोर कारवाई होते का? की आणखी काही पोलीसांना मारहाण होण्याची वाट पाहिली जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
'संबंधित आरोपी आणि त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतले असून तपशीलांची पडताळणी सुरू आहे. हे प्रकरण शक्य तितक्या कठोर मार्गाने हाताळले जाईल. आम्ही त्यांच्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करू शकू असे शोधण्यासाठी आम्ही एक टीम तयार केली आहे. कायद्याची अशी उघड अवहेलना, पोलिसांचा अनादर खपवून घेतला जाणार नाही.'
- आयपीएस अनमोल मित्तल, प्रभारी अधिकारी, हवेली पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.