आई, मला आज तीन-चार मुली फार आवडल्या. एक-दोन दिवसांत त्यांच्या घरी फोन करून, माझ्या लग्नाचे फायनल करून टाक. दिवस फार थोडे आहेत.
‘‘माझा मुलगा टवाळक्या करत हिंडतो काय? तो गुंडप्रवृत्तीचा आहे काय? त्याला एक रूपया कमवायची अक्कल नाही काय? असे हिणवणाऱ्या प्राचीच्या वडिलांना तू चांगला धडा शिकव. चेक नाक्यावर त्यांची किंवा त्यांच्या मुलीची गाडी मुद्दाम अडवून त्यांना हिसका दाखव. काठीचे एक-दोन फटकेही दे. अगदी रडकुंडीला येऊ दे. पाया पडेपर्यंत सोडू नकोस. तुला लग्नाला नकार देतात म्हणजे काय?’’ सुलोचनाबाईंनी आपल्या मुलाचे प्रमोदचे कान भरले. गेल्या दोन-तीन आठवड्यापासून प्रमोदची विशेष पोलिस अधिकारी (एसपीओ) म्हणून निवड झाली. तेव्हापासून त्याची कॉलर ताठ झाली आणि सुलोचनाबाईंचा रुबाब वाढला आहे.
गेल्या चार-पाच वर्षांपासून प्रमोदला अनेक स्थळांनी नकार कळवला आहे. काहीही कमवत नाही आणि गुंडप्रवृत्तीचा आहे, हे नकारामागील कारण दिले जात आहे. मात्र, कडक निर्बंधाच्या काळात विशेष पोलिस अधिकारी म्हणून त्याची नियुक्ती झाल्याने त्याचे भाग्य उजाडले.
ड्यूटीवर जाण्यापूर्वी प्रमोदने काठीला तेलपाणी केले. ‘एसपीओ’ असे लिहिलेला पिवळा टी-शर्ट घालून तो दहा-बारा सहकाऱ्यांसमवेत ड्युटीवर जॉईन झाला. ड्युटीवरील पोलिस आणि इतर ‘एसपीओं’चे काम नियमानुसार व्यवस्थित चालू होते. मात्र, मिळालेल्या संधीचा गैरफायदा घेत प्रमोदचं ‘लक्ष्य’ वेगळंच होतं.
‘‘साहेब, गेल्या दोन तासांपासून मला थांबवलंय. मला दवाखान्यात जायचंय.’’ एका साठीच्या गृहस्थाने काकुळतीला येत प्रमोदला सांगितलं.
‘‘मुकाट्याने थांबा तिथे. आम्ही काय निवांत बसलोय का? कामच चाललंय ना?’’ असे म्हणत प्रमोदने त्यांना धमकावले.
तेवढ्यात दोन तरुणी गाडीवरून जाताना त्याला दिसल्या. त्यांना गाडी बाजूला घ्यायला प्रमोदने सांगितले.
‘‘लायसन बघू’’? असे विचारल्यावर त्या तरुणीने पर्समधून लायसन दाखवले. मात्र, त्याकडे ढुंकूनही न बघता, ‘‘हे असलं लायसन नको. दुसरं दाखवा.’’ असे म्हणून तो गालातल्या गालात हसला. ‘दुसरं लायसन दाखवा,’ असं तीन-चार वेळा त्याने विचारल्यानंतर त्यातील एका मुलीची ट्यूब पेटली. ती दुसरीच्या कानात लागत म्हणाली, ‘‘अगं ते मंगळसूत्राविषयी बोलतायत.’’ प्रमोदच्या विचारण्याचा रोख लक्षात आल्यानंतर तरुणीला प्रचंड राग आला. मात्र, तरीही ती गप्प बसली. आमच्या दोघींचेही लग्न झाले नसल्याचे तिने सांगितले. त्यावर प्रमोदची कळी खुलली. मग त्याने आधारकार्डवरील माहिती टिपून घेतली व फेसबुकवर जाऊन लगेच खात्री केली.
दोघींचेही मोबाईल नंबर घेतल्यानंतर त्यांना सोडले. तेवढ्यात मघाचे ते आजोबा प्रमोदजवळ आले. ‘‘साहेब, मला जाऊ द्या.’’ अशी त्यांनी विनवणी केली.
‘‘असं कसं फुकट जाणार? आम्ही दिवसभर उन्हातान्हात उभे राहतोय. आम्हाला काही चहापाणी करा की’’? प्रमोदने असे म्हटल्यावर त्याने दहाची नोट काढून त्याच्या हातात दिली. ‘‘यात दोन कटिंग चहा येतील.’’ असे त्याने म्हटले. दहाची नोट बघून प्रमोदची सटकली. ‘‘आम्हाला काय भिकारी समजता काय?’’ असे म्हणत आजोबांना धमकावले. शेवटी चिरीमिरीवर तडजोड झाली. इतर ‘एसपीओं’ना प्रमोदचं असलं वागणं अजिबात आवडत नव्हतं. त्याच्या एकट्यामुळं आपण बदनाम होतो, असं त्यांचं म्हणणं होतं. मात्र, असली संधी आपल्याला परत मिळणार नाही, याची खात्री प्रमोदला असल्याने तो बेछुट वागत होता.
प्रमोदने आज दिवसभरात पंधरा मुलींची माहिती जमा केली. रात्री नऊच्या सुमारास घरी गेल्यानंतर त्याने मुलींची सगळी माहिती आईच्या हवाली केली व प्रसन्न मुद्रेने म्हणाला,
‘‘आई, मला आज तीन-चार मुली फार आवडल्या. एक-दोन दिवसांत त्यांच्या घरी फोन करून, माझ्या लग्नाचे फायनल करून टाक. दिवस फार थोडे आहेत. संचारबंदी उठल्यानंतर विशेष पोलिस अधिकारी हे माझं पद जाणार आहे. त्याच्या आत जुळवून टाक.’’
पुण्यातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.