अर्धा लिटर दूध खराब; तरीही जनुभाऊंचाच रुबाब

‘हा काय प्रकार आहे? तासाभरापूर्वी तुमच्या दुकानातून नेलेले दूध कसं काय खराब झालं? निकृष्ट दर्जाचं दूध ग्राहकांच्या माथी मारता काय?
Panchnama
PanchnamaSakal
Updated on
Summary

‘हा काय प्रकार आहे? तासाभरापूर्वी तुमच्या दुकानातून नेलेले दूध कसं काय खराब झालं? निकृष्ट दर्जाचं दूध ग्राहकांच्या माथी मारता काय?

‘हा काय प्रकार आहे? तासाभरापूर्वी तुमच्या दुकानातून नेलेले दूध कसं काय खराब झालं? निकृष्ट दर्जाचं दूध ग्राहकांच्या माथी मारता काय? दुग्धविकासमंत्र्यांना पत्र पाठवून मी तुमची तक्रार करणार आहे; पण एवढ्यावरच न थांबता मी तुम्हाला कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही." जनुभाऊंनी साईनाथ किराणा मालाच्या दुकानदाराला खडे बोल सुनावले.

‘तुम्ही आधी शांत व्हा. काय झालं ते सविस्तर सांगा.’’ दुकानदाराने संयम ठेवत म्हटले. ‘‘आज सकाळी सहा वाजता मी उठलो. त्यानंतर अंघोळ करून. .. ’’ जनुभाऊंना मध्येच थांबवत दुकानदार म्हणाले, ‘‘एवढंही सविस्तर सांगू नका. काय घडलं ते नेमकं सांगा.’’ मग जनुभाऊंनी नेमकं काय झालं ते सांगितलं. ‘‘अहो, यात तुमचाच दोष आहे. दूध तापवण्यापूर्वी ते भांडं स्वच्छ असलं पाहिजे, एवढी साधी गोष्ट तुमच्या लक्षात येऊ नये म्हणजे जरा आश्चर्यच आहे.’’ दुकानदाराने म्हटले. त्यावर जनुभाऊ एकदम कडाडले. ‘‘स्वच्छ- अस्वच्छतेच्या गोष्टी तुम्ही मला शिकवू नका. बायको माहेरी गेली असली तरी मी घर आरशासारखं लख्ख ठेवलंय. हे फोटो पहा.’’ असे म्हणून जनुभाऊंनी मोबाईलमधील फोटो दाखवले. मात्र, दुकानदाराने त्यात काडीचंही स्वारस्य दाखवलं नाही.

‘आज सकाळी सिलिंडरची नवीन टाकी मी जोडली. त्या सिलिंडरमुळेच दूध खराब झाले असावे, असा अंदाज बांधून मी गॅस एजन्सीवाल्यांनाच धारेवर धरले. मात्र, दुधातच काहीतरी प्रॉब्लेम होता, असे त्यांनी मला समजावून सांगितले. त्यामुळे मी तुमच्याकडे आलो आहे.’’ जनुभाऊंनी घटनाक्रम सांगितला.

‘पण दुधात मुळी दोष नव्हताच. तसं असतं तर किमान दहा-वीस तक्रारी तरी आल्या असत्या. तुमच्या भांड्यातच दोष होता.’’ दुकानदाराने खुलासा केला.

‘मग मी काय आता भांडीवाल्याबरोबर वाद घालत बसू काय? उद्या म्हणाल तुमच्या वास्तूतच काहीतरी दोष आहे म्हणून मी काय बिल्डरबरोबर भांडण करत बसू काय?’’ जनुभाऊंनी पलटवार केला. ‘‘हे बघा, दूध खराब नव्हतं, एवढंच माझं म्हणणं आहे.’’ दुकानदाराने ठामपणे सांगितले. त्यावर जनुभाऊ आणखी चिडले. ‘‘मी दुधाची तक्रार करण्यासाठी येथपर्यंत रिक्षाने आलो आहे. त्यामुळे दोन्ही बाजूचे रिक्षाभाडे व दुधाचे पैसे असे एकूण १५० रुपये मला मिळालेच पाहिजेत.’ त्यावर दुकानदार चिडून म्हणाले, ‘‘तुम्ही गॅस एजन्सीकडे तक्रार करायला गेला होतात, त्याचे रिक्षाभाडेही तुम्ही माझ्याकडून वसूल करत आहात, ही कोठली पद्धत? अशानं आमचं दिवाळं वाजेल.’’ त्यावर जनुभाऊ म्हणाले, ‘वाट्टेल ते बोलू नका. गॅस एजन्सीवाल्यांकडून मी ५० रुपये रिक्षाभाडे आधीच वसूल केले आहे.’’ दुकानदारानेही आवाज चढवत म्हटले, ‘‘तुम्ही रिक्षाने या, असं मी म्हटलं नव्हतं. त्यामुळं रिक्षाभाडं द्यायचा प्रश्नच नाही.

अर्धा लिटर दूध खराब झालं म्हणून मी त्याचे २५ रुपये नाईलाजानं द्यायला तयार आहे.’’ दुकानदाराने असं म्हटल्यावर जनुभाऊंच्या जीवात जीव आला. ‘‘ठीक आहे. एवढ्यावेळेस मी तुम्हाला माफ करतो. पण पुढच्यावेळीस रिक्षाभाडेही वसूल करील.’’ जनुभाऊंनी म्हटले.

त्यावर दुकानदार म्हणाले, ‘‘पण २५ रुपये मी तुम्हाला आता देऊ शकत नाही. आमचे दुकान एक ते चार बंद असते. आता एक वाजून दोन मिनिटे झाली आहेत. २५ रुपये न्यायला तुम्ही चार वाजता या. चालत यायचं की रिक्षानं यायचं, तुमचं तुम्ही ठरवा.’’ असे म्हणून दुकानदाराने दुकानाला कुलूप लावूनही टाकलं. जनुभाऊ मात्र त्या कुलुपाकडे बघतच राहिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()