आज सकाळपासून सुधीर साक्षीची नजर चुकवून समोरच्या खिडकीत सतत पाहत होता. गेल्या आठवड्यापासून एक कुटुंब तिथं राहायला आलं होतं आणि तेथील तिशीतील महिला आपल्याकडं सतत पाहत असते, अधून-मधून हात हलवत असते, याचा त्याला संशय होता. आपण प्रतिसाद दिला नाही तर तिचे मन दुखावेल, याची चिंता त्याला वाटायची. त्यामुळे साक्षीचं लक्ष नसलं किंवा ती बाहेर गेली तर खिडकीकडे पाहण्याची संधी तो सोडत नव्हता. मात्र, साक्षीनं ही बाब बरोबर ओळखली.
‘काय हो, सारखं काय पाहताय त्या खिडकीकडे?’’ तिने विचारलं.
‘अगं काही नाही. समोरच्या टेरेसमध्ये चिमणीनं बघ किती मस्त घरटं बांधलंय. तिची चिवचिव ऐकावीशी वाटतेय. पक्ष्यांचं जीवन किती छान असतं ना?’’ सुधीरनं सहजतेने म्हटलं. ‘‘मग त्या चिमणीला आपल्याकडे चहालाच बोलवा आणि घ्या ओळख करून.’’ भांडी आपटत साक्षी म्हणाली. त्यावर सुधीर म्हणाला, ‘‘अगं किती पराचा कावळा करतेस? तुझा काहीतरी गैरसमज होतोय. माझ्या मनी- ध्यानीही हा विषय नाही. त्या बाईने सकाळी माझ्याकडे बघून दोन-तीन वेळा हात हलवला पण मी ढुंकूनही पाहिले नाही.’’ सुधीरने फुशारकी मारत म्हटले.
‘अहो ती सकाळी खिडकी पुसत होती अन् तुम्हाला वाटलं, की आपल्यालाच हात करतेय. काय बाई! स्वतःविषयी एकेक गैरसमज.’’ साक्षीचं हे बोलणं ऐकून सुधीर ओशाळला.
‘तुझ्या मनात माझ्याविषयी काही संशय असेल तर तू आपल्या खिडकीला पडदे बसवून टाक म्हणजे विषयच मिटला.’’ सुधीरने पर्याय दिला पण त्याला थांबवत साक्षी म्हणाली, ‘‘अहो, त्यापेक्षा तुमचं हे ढेरपोट असलेलं शरीर व कायम बस चुकल्याचे चेहऱ्यावरील भाव तिला एकदा स्पष्ट दिसू द्या मग तीच कायमस्वरूपी खिडक्यांना पडदे लावेल. स्वतःचा चेहरा एकदा आरशात बघा म्हणजे स्वतःविषयीचे गैरसमज दूर होतील.’’ साक्षीचा हा अपमान सुधीरच्या मनाला चांगलाच झोंबला. आपण खरंच इतके वाईट दिसतो? असा प्रश्न विचारत त्याने स्वतःला कपाटातील आरशात हळूच पाहून घेतलं. संध्याकाळीही सुधीर काही बोलला नाही. त्याला असं हिरमुसलेलं पाहून साक्षीनं त्याला बोलतं करायचा प्रयत्न केला. मग दोघेही बाल्कनीत चहाचे घुटके घेत बसले.
‘तुम्ही माझ्यासाठी काय आणू शकता?’’ बिस्कीटच्या पुड्याकडे लक्ष देत साक्षी म्हणाली. त्यावर सुधीरने सहज आकाशाकडे पाहिले. ‘‘ओऽऽ तुम्ही मला चंद्र आणून देणार आहात? किती छान! खरोखरच मला चंद्र आणून द्या.’’ साक्षी लाडात येत म्हणाली. त्यावर सुधीर तेथून उठला व हॉलमध्ये जाऊन त्याने छोटा आरसा आणला.
‘साक्षी, एक सरप्राईज आहे. आधी डोळे बंद कर’’, सुधीरने असं म्हणताच साक्षीने तसं केलं. तिने डोळे उघडल्यानंतर तिच्या हातात आरसा होता व त्यात तिचे प्रतिबिंब स्पष्ट दिसत होते. ‘याचा अर्थ तुम्ही मला चंद्र समजता,’ असे म्हणून तिचे डोळे प्रेमाने डबडबले. आपण नवऱ्याचा अनेकदा अपमान करतो पण त्याचे आपल्यावर किती प्रेम आहे, हे तिला समजले.
‘खरंच ! मी तुमच्याशी खूप वाईट वागते. तरीही तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता! मला चंद्र समजता.’’ साक्षीने डोळे पुसत म्हटले.
‘अगं नाही ! तुझा काहीतरी गैरसमज होतोय. ज्या तोंडाने तू मला चंद्र आणायला सांगतेस. तो चेहरा एकदा नीट आरशात बघ, असं मला म्हणायचंय,’’ असं म्हणून सुधीर जोरात हसला. सकाळच्या अपमानाचा बदला घेतल्याने तो फारच खूष झाला. फक्त या खुशीपोटी त्याला पुढचे तीन दिवस हॉटेलमध्ये जेवायला लागले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.