‘माधुरी, लसीकरणाची या आठवड्यातील तारीख घेऊ का?’ मंदारने विचारले. ‘अहो. इतक्यात नको. दहा दिवसांनंतरची घ्या.’ माधुरीने म्हटले. ‘दहा दिवसानंतरची कशाला? लसीकरणाचा मुहूर्त काढलाय का?’ मंदारने रागात विचारले. ‘अहो, लसीकरणासाठी मी कांजीवरमची साडी घेतलीय ना, त्याचा मॅचिंग ब्लाऊज टेलर दहा दिवसांनी देणार आहे. तो मिळाल्यानंतरच मी लस घेणार आहे.’ माधुरीने लाजत म्हटले. ‘काऽ ऽय? लसीकरणाला जायचंय आपल्याला. कोणाच्या लग्नाला वा रिसेप्शनला नाही निघालो.’ मंदारने म्हटले.
‘तुम्हाला काहीच कसं कळत नाही हो. आपल्या सोसायटीतील सोनलवहिनींनी कालच बनारसी शालू नेसून लस घेतली आणि तो फोटो फेसबुकवर टाकला. दोनशे लाइक आणि शंभर कमेंट मिळाल्यात. आता मी देखील त्यांच्या नाकावर टिच्चून कांजीवरमची साडी नेसून ऐटीत फोटो काढते आणि तो फोटो फेसबुकवर टाकून त्यांची चांगलीच जिरवते का नाही ते बघा.’ माधुरीने असं म्हटल्यावर मंदारने कपाळावर हात मारला तरी पण बायकोच्या आदेशापुढे त्याचे काही चालले नाही. त्याने निमूटपणे दहा दिवसांनंतरची तारीख नोंदवली. अखेर लसीकरणाचा दिवस उजाडला. त्यादिवशी नेहमीपेक्षा माधुरी लवकर उठली. मेकअप व साडी नेसण्यातच तिचे तीन तास कसे गेले ते कळलेच नाही. ‘अगं उरक लवकर’ हे वाक्य बोलून-बोलून मंदार दमून गेला. तयार झाल्यानंतर दाराला माधुरीने कुलूप लावले व जाता-जाता साडी दाखवण्याच्या हेतूने ती सोनलवहिनींकडे गेली.
‘आम्ही लस घ्यायला चाललोय. तेवढं घराकडे लक्ष असू द्या,’ असं तिने पदर सावरत म्हटले. ‘अय्या ! नवी साडी? कोठून घेतली? कितीला घेतली?’ अशा प्रश्नांची सरबत्ती सोनलवहिनींनी केल्याने आपल्या कष्टाचं चीज झालं, असं माधुरीला वाटलं. मग तिने पहिल्या मजल्यावरील संगीताकाकूंची बेल वाजवली. ‘लस घ्यायला निघालेय. घराकडं लक्ष असू द्या.’ माधुरीने म्हटले. त्यावर संगीताकाकूंनीही साडीचे कौतुक केले. खाली उतरून आल्यानंतर सोसायटीतील किती बायका आपल्याकडे बघत आहेत, हे पहाण्यासाठी माधुरीने वर पाहिले. तीन- चार बायका तरी तिच्याकडे बघत होत्या. ते पाहून नवी साडी नेसल्याचं सार्थक झालं, असं माधुरीला वाटलं. लसीकरण केंद्रावर दोघे पोचताच लस संपल्याचे तेथील कर्मचाऱ्याने सांगितले. ते ऐकून मात्र माधुरी चिडली. तिने मंदारची चांगलीच खरडपट्टी काढली.
‘आपण येथे पोचण्याआधीच लस कशी संपली? अशी कशी अपॉइंटमेंट घेतली होती? तुमच्या मोबाईलमध्येच काहीतरी दोष असेल?’ त्यावर मंदार फक्त कान पकडून 'सॉरी सॉरी' म्हणत होता. माधुरी आत गेली व तेथील सिस्टरला लस देण्याची विनंती केली. ‘तुम्ही फक्त लस टोचल्यासारखं करा. आमचे हे फोटो काढतील. नाहीतर एवढा मेकअप वाया जाईल हो. त्यात ही कांजीवरमची साडी मला आता एका वर्षांनंतरच पुन्हा नेसता येईल. नाहीतर सोसायटीतील बायका मला सारखी एकच साडी नेसते म्हणून हसतील.’ मग मात्र माधुरीच्या मनासारखं सगळं घडलं. ‘लस घेतल्याचा’ फोटो माधुरीने आता फेसबुकवर टाकला असून, दर पाच मिनिटांनी ती किती लाइक आणि कमेंटस मिळाल्या, हे ती चेक करत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.