जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्‍वर...

‘सावळ्या विठ्ठला, आता सगळा तुझ्यावर भार’ असे म्हणून दत्तात्रेयबुवा वारीच्या वाटेवर चालू लागले.
Panchnama
PanchnamaSakal
Updated on
Summary

‘सावळ्या विठ्ठला, आता सगळा तुझ्यावर भार’ असे म्हणून दत्तात्रेयबुवा वारीच्या वाटेवर चालू लागले.

‘सावळ्या विठ्ठला, आता सगळा तुझ्यावर भार’ असे म्हणून दत्तात्रेयबुवा वारीच्या वाटेवर चालू लागले. ‘यंदा खूप अडचणी आहेत, वारीला जाऊ नका’ बायकोनं अशी आर्जव केल्यानंतर त्यांच्या डोळ्यांत पाणी तरळलं होतं. ‘अगं गेली दोन वर्षे कोरोनामुळं वारी करता आली नाही, पंढरीरायाला डोळे भरून पाहता आले नाही. यंदा मला अडवू नकोस.’’ त्यांनी विनंती केली.

‘बाबा, कुसूमचे दिवस भरत आले आहेत. बाळंतपण फार जोखमीचं आहे. कदाचित ते जीवावरही बेतेल, असं डॉक्टरांनी सांगितलंय.’ दिनेशने वडिलांना समजावून सांगितले.

‘लेकरा, कुसुमचं बाळंतपण व्यवस्थित पार पडेल. प्रत्यक्ष विठ्ठलच तिची काळजी घेईल.’ असं म्हणून आभाळाकडं पाहत दत्तात्रेयबुवांनी हात जोडले. दोन दिवसांनी दिनेश तोंड बारीक करीत आला.

‘बाबा, कुसुमचं सिझर करून, बाळाला ‘एनआयसीयू’मध्ये ठेवावं लागेल, असं डॉक्टरांनी सांगितलंय. सगळा खर्च दोन ते तीन लाख रुपये होईल. माझ्याकडे चाळीस हजार रुपयेच आहेत.’ डोळ्यातील पाणी लपवत दिनेश म्हणाला. त्यावर दत्तात्रेयबुवांनी ‘विठ्ठल! विठ्ठल’ एवढंच म्हटलं. आधीच डोक्यावर तीन लाखांचं कर्जं आहे. त्यात बाळंतपणासाठीचे दोन लाख कोठून आणायचे, या प्रश्‍नाने ते कासावीस झाले. मात्र, पंढरपूरची आस त्यांना गप्प बसवेना. आपल्या काळजीचा सगळा भार विठ्ठलावर सोपवून ते दिंडीत सहभागी झाले. आळंदीवरून वारी पुण्यात दाखल झाली. शनिपाराजवळ विठ्ठलाचे नामस्मरण करीत, दत्तात्रेयबुवा बसले होते. जवळच त्यांना पिशवी दिसली. त्यात शंभर आणि पाचशेच्या नोटांचे बंडल पाहून, त्यांना आश्‍चर्याचा धक्का बसला. किमान दोन लाख रुपये त्यात असावेत, असा अंदाज त्यांना बंडलांवरून बांधला. पैसे पाहून त्यांचा चेहरा उजळला. ‘विठुरायाने आपली अडचण ओळखून, आपल्याला मदत केली’ असं समजून त्यांच्या डोळ्यांत पाणी तरळलं. ‘विठ्ठला, तुझी लीला अगाध आहे.’ असं म्हणत त्यांनी पिशवी पुन्हा तपासली. त्यात त्यांना दवाखान्याची फाईल सापडली. ‘‘बाप रे! कोणीतरी दवाखान्याच्या उपचारासाठी पैसे जमा केलेले दिसतायत. मी हे पैसे घेणे म्हणजे फार मोठे पाप होईल,’ असे म्हणत त्यांनी पोलिस चौकी गाठली. पोलिसांनीही तत्परतेने पिशवीतील कागदपत्रे तपासून, फोन नंबर मिळवला व मोबाईलवरून संबंधित व्यक्तीशी संपर्क साधला. पोलिसांचा फोन आल्याचे समजताच समोरचा माणूस रडायला लागला.

‘साहेब, मी उद्ध्वस्त झालोय. माझ्या बायकोचं उद्या हृदयाचं ऑपरेशन आहे आणि माझे दोन लाख रुपये हरवले आहेत. मला वेड लागायची पाळी आलीय.’ असं म्हणून ती व्यक्ती हमसून रडू लागली. पोलिसांनी त्याला चौकीवर बोलावले. समोर आपली बॅग पाहून, त्याच्या जीवात जीव आला. पोलिसांनी बॅगेची ओळख पटवून, त्यांच्या ताब्यात ती दिली. त्या माणसानं दत्तात्रेयबुवांच्या पायावर डोकं ठेवून अश्रूंचा अभिषेक घातला. ‘तुमच्या रूपात मला विठ्ठलच भेटला. तुमचं हे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही.’ असं म्हणत साश्रुनयनांनी ती व्यक्ती निघून गेली. तासाभरात दत्तात्रेयबुवांना मोबाईलवर घरून फोन आला. ‘बाबा, कुसूमला मुलगी झाली. आपल्या घरी लक्ष्मी आली. बाळंतपण नॉर्मल पार पडलं असून, कुसुम आणि बाळ सुखरूप आहे. डॉक्टरांच्या रूपात परमेश्‍वरच भेटला. विठ्ठलाच्या कृपेने आपल्यावरील संकट टळलं. तुम्ही आता निर्धास्तपणे वारी करा.’

दिनेशनं आनंदाश्रूंना मोकळी वाट करून देत म्हटलं. ‘दवाखान्याचं बिल भरून, दहा हजार रुपये उरलेत. त्या पैशांतून आपण वारकऱ्यांना जेवण घालू.’ दिनेशनं असं म्हटल्यावर दत्तात्रेयबुवांचे डोळे पाणावले. ‘विठ्ठलाऽऽऽऽ’ आकाशाकडं पाहत, त्यांनी अश्रूंना मोकळी वाट करून दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.