Panchnama : उन्हाचा आणि रागाचा वाढतोय पारा!

‘बाप रे ! पुण्यात ऊन किती वाढलंय. आमच्या लहानपणी एवढं कडक ऊन नसायचं. आता सगळंच बदललंय. पूर्वीचं पुणं आता राहिलं नाही.’
Panchnama
PanchnamaSakal
Updated on
Summary

‘बाप रे ! पुण्यात ऊन किती वाढलंय. आमच्या लहानपणी एवढं कडक ऊन नसायचं. आता सगळंच बदललंय. पूर्वीचं पुणं आता राहिलं नाही.’

‘बाप रे ! पुण्यात ऊन किती वाढलंय. आमच्या लहानपणी एवढं कडक ऊन नसायचं. आता सगळंच बदललंय. पूर्वीचं पुणं आता राहिलं नाही.’ सुधाकररावांनी चुकचुकत जनूभाऊंना म्हटले.

‘पण मला हे तुम्ही का सांगताय? तुमची काही तक्रार असेल तर सूर्याकडे करा. माझ्याकडे तक्रार करून काही उपयोग होणार नाही.’ जनूभाऊंनी फटकारले.

टिळकरोडवर बसची वाट पहात बराचवेळ जनूभाऊ उभे होते. कडकडीत ऊन व बराचवेळ ताटकळत उभे राहावे लागल्यामुळे त्यांची चिडचिड वाढली होती. त्यातच सुधाकररावांनी आगुंतकासारखे हवा- पाण्याच्या गप्पा मारायला सुरवात केल्याने ते वैतागून गेले होते.

‘अहो, आम्ही लहान असताना उन्हाळ्यात भर दुपारीही कोवळं ऊन पडायचं. ते कोवळं ऊन अंगावर घेतल्यामुळेच आजही आमची कांती तुकतुकीत आणि प्रकृती ठणठणीत आहे. आजही मी दोनशे सूर्यनमस्कार घालतो. तुम्ही घालता की नाही?’ सुधाकररावांनी विचारले.

‘मी सूर्यनमस्कार घालतो की नाही, याच्याशी तुम्हाला काय करायचंय? सूर्यनमस्कार घालणाऱ्यांची मोजदाद करायचं कंत्राट सूर्याने तुम्हाला दिलंय का? एकूणच मी कोणाला नमस्कार घालायचा आणि कोणाला नाही, हा माझा वैयक्तिक प्रश्‍न आहे. त्यात तुम्ही लुडबूड करू नका. जर तुम्ही रोज सूर्यनमस्कार घालत असाल, तर एखाद्यादिवशी नमस्कार घालता घालता सूर्याला ऊन कमी करायला सांगा.’ जनूभाऊंनी म्हटले.

‘मी आपलं सहज विचारलं, तर तुम्ही किती तापताय? सूर्य वर तापतोय, तुम्ही खाली तापताय अशाने या पृथ्वीचे कसं व्हायचं.’ सुधाकररावांनी म्हटलं.

‘तुम्ही माझ्याशी हवा- पाण्याच्या गप्पा मारू नका.’ जनूभाऊंनी इशारा दिला.

‘अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या युद्धविषयक धोरणाचा रशियावर कितपत परिणाम होईल. तसेच भारताला त्याचा किती फायदा होईल?’ सुधाकररावांनी विचारले.

‘हवापाण्याच्या गप्पा नकोत, याचा अर्थ आंतरराष्ट्रीय राजकारणावर गप्पा मारा, असा होत नाही. एक तर प्रचंड ऊन असताना तुम्हाला वाट्टेल त्या विषयावर गप्पा माराव्यात, असं का वाटतं.?’ जनूभाऊंनी इशारा दिला.

‘तुमचं बरोबर आहे. सध्या या उन्हाचा फार त्रास होतोय. पूर्वी असं होत नव्हतं. पुणे आता खूपच बदललंय. सगळं बदलत असताना किमान पूर्वीचं कोवळं ऊनतरी ठेवायला हवं होतं.’ सुधाकररावांनी हळहळत म्हटले.

‘कोवळं ऊन ठेवायला हवं होतं म्हणजे? कोणी ठेवायला हवं होतं? देश सोडून जाताना इंग्रजांनी पुण्यातील कोवळं ऊनही बरोबर नेले, असं तुम्हाला म्हणायचं का? किती अतार्किक बोलता. तुमच्या लहानपणी तर्कसंगत, मुद्देसूद बोलायला कोणी शिकवलं नाही का?’ जनूभाऊंनी सुधाकररावांना धारेवर धरले.

‘उन्हामुळे माणसाचा चिडचिडपणा वाढतोय, हेच खरं. मघापासून तुम्ही माझ्याशी एकही वाक्य सरळ बोलला नाहीत, यावरूनच ते सिद्ध होतंय. तुमचा हा चिडचिडेपणा जन्मजात आहे की आताच्या कडक उन्हामुळे आहे?’ सुधाकररावांनी विचारले.

‘तुम्हाला काय करायच्यात नस्त्या उठाठेवी? तुम्हाला काय कामधंदा नाही वाटतं?’ जनूभाऊंनी विचारले.

‘मी काय तुम्हाला रिकामटेकडा वाटलो का? ‘पुण्यातील वाढते ऊन आणि चिडचिडेपणा याचा अन्योन्य संबंध’ या विषयावर मी संशोधन करतोय. गेल्या दोन तासांपासून मी या बसथांब्यावर ४५ लोकांशी या विषयावर बोललोय. त्यातील ४३ लोकं माझ्यावरच तापली तर दोघांनी ‘आम्ही पुण्यात नवीन आहोत’ असे म्हणून त्यांनी पुण्यातील उनावर बोलण्याचे टाळले.’ सुधाकररावांनी म्हटले.

‘पुण्यात हल्ली कोठल्याही विषयावर संशोधन होतंय. काही ताळतंत्रच राहिला नाही. पूर्वीचं पुणे आता राहिलं नाही.’ असे चुकचुकत जनूभाऊ आलेल्या बसमध्ये शिरले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()