नद्या काही तुमच्या गुलाम नाहीत...नंदकुमार वडनेरे
यंदा राज्यात काही भागांत पुरांमुळे नागरी वसाहतींना तडाखा बसला. पूरस्थिती अतिपावसामुळे होतेय, की धरणांमधून सोडलेल्या पाण्यामुळे होतेय, की नदीपात्रात झालेली अतिक्रमणे पुराला जबाबदार ठरत आहेत, याविषयी चर्चांचे बांध फुटले आहेत. याबाबत ‘कृष्णा व भीमा खोरे पूरस्थितीविषयक कारणे व उपाय अभ्यास समिती’चे अध्यक्ष नंदकुमार वडनेरे यांच्याशी साधलेला हा संवाद...
- मनोज कापडे
राज्यात यंदा उद्भवलेली पूरस्थिती मानवनिर्मित म्हणावी लागेल की यंत्रणांचा दोष?
मला जलसंपदा विभागाचा मुख्य अभियंता म्हणून क्षेत्रीय पातळीवर काम करता आले. जलसंपदा विभागाचा सचिव म्हणून प्रशासकीय, धोरणात्मक कामाचा अनुभव मिळाला. कृष्णा पाणी तंटा लवादात महाराष्ट्राची बाजू मांडणाऱ्या समितीचा सदस्य म्हणूनही मी काम केले आहे. निवृत्तीनंतरही कृष्णा व भीमा खोरे पूरस्थितीविषयक कारणे व उपाय अभ्यास समितीचे नेतृत्व माझ्याकडे होते. या प्रवासात मला एका गोष्टीचे खूप वाईट वाटते, ती बाब म्हणजे पावसाळ्यात पूर आल्यानंतरच साऱ्या व्यवस्थेला नद्यांची आठवण होते. एरवी आठ महिने नद्यांची अवस्था
अडगळीत टाकलेल्या आजी-आजोबांसारखी असते. मानवी ज्ञात इतिहासाच्या वाटचालीत नद्या उगम पावल्या, लुप्त झाल्या, संथ वाहिल्या, नद्यांना पूर आले आणि गेले आहेत. पूर हे नदीचे व्यवच्छेदक लक्षण आहे. अतिपाऊस होणे, नदीने दुथडी भरून वाहणे, पूर येणे हे साऱ्या नद्यांच्या खोऱ्यांमध्ये कधी ना कधी होत आलेले आहे. इथून पुढेही होईल.
पूरप्रक्रियेतील मानवी हस्तक्षेप आपण थांबवणार आहोत की नाही, हा प्रश्न आहे. पूर आलेली नदी मोकळी वाहिली पाहिजे, तिला अडवायला नको, ती संथ असताना तिचा संकोच करायला नको, तिच्या जागेत अतिक्रमणे व्हायला नकोत, नदीचे मूळ स्वच्छ व सुंदर रूप जतन करायला हवे. सध्याच्या आधुनिक व्यवस्थेत, शहरीकरणात किंवा ‘कॉस्मोपॉलिटन कल्चर’मध्ये नद्या नासवल्या. त्यांना गुलाम बनवले. त्यामुळेच आता आपल्याला पूर हे नैसर्गिक न वाटता एक संकट वाटू लागले. आता हे सर्व सांगून झाल्यानंतर तुम्हाला जाणीव होईल, की पूरस्थितीची ‘समस्या’ होण्यास मानवनिर्मित व्यवस्थाच कारणीभूत आहे.