सोमेश्वरनगर - सरकारमध्ये गेल्यामुळेच मी करोडो रूपयांचा निधी आणू शकलो. आता आपल्याच विचारांचा खासदार केला तर दहा-बारा पट मोठ्या योजना आणता येतील. त्यासाठी तुम्ही मला साथ द्या मी तुम्हाला साथ देतो.
काहीजण भावनिक करायचा प्रयत्न करतील. असा प्रसंग बारामतीकरांवर कधी ओढवला नव्हता आणि तो येऊ नये अशी मनोमन भावना होती. पण शेवटी एका हातानं टाळी वाजत नाही समोरूनही प्रतिसाद मिळावा लागतो, अशी व्यथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जवळच्या लोकांसमोर बोलून दाखविली.
करंजेपूल (ता. बारामती) येथे आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप होते. याप्रसंगी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, छत्रपतीचे अध्यक्ष प्रशांत काटे, शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे, सोमेश्वरचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे, राजवर्धन शिंदे, दिलीप फरांदे, संग्राम सोरटे, राहुल काकडे, लक्ष्मण गोफणे, प्रणिता खोमणे, रामकांत गायकवाड, सुनिल भोसले, विक्रम भोसले, अभिजित काकडे, ऋषिकेश गायकवाड, सरपंच पूजा गायकवाड, सरपंच हेमंत गायकवाड उपस्थित होते.
आम्ही पन्नासेक जणांनी सरकारमध्ये सामिल होण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनीही मानसन्मान राखला. तिजोरीची चावी माझ्याकडे आली. बारामतीत कधी नव्हे इतका पैसा मी आणू शकलो. राज्य धरण तर केंद्र म्हणजे तर योजनांचा समुद्र आहे. तेथील योजना आणून बारामती लोकसभा मतदारसंघात विकास करण्यासाठी आम्ही घड्याळाचं चिन्हा देऊन एनडीएचा उमेदवार देणार आहे. भावनिक बनू नका विकासाला साथ द्या, असे आवाहन पवार यांनी केले.
तसेच मोदींमुळे ऐंशी कोटी लोकांना धान्य मिळत आहे. महिला धोरण आले. दलित, आदीवासींना तर घरकुले हवीच पण मराठा, ओबीसी, भटक्या समाजातील गरीबांनाही ती हवीत हे केंद्राला पटवून दिले आणि तशी योजना आली, असेही ते म्हणाले. सोमेश्वरचे उपाध्यक्ष बाळासाहेब कामथे यांनी आभार मानले.
अल्पसंख्यांकाना जगण्याचा अधिकार
अल्पसंख्यांक समाजासाठी ७५ वर्षात झालं नाही ते सरकारनं केलं आहे. मौलाना आझाद महामंडळ काढले आणि त्याची तरतूद तीस कोटींहून सातशे कोटी केली. मुस्लीम युवकांना युनानी शिक्षण देण्यासाठी रायगड येथे कॉलेज मंजूर केलं आहे. या पंधरा-वीस टक्के समाजालाही जगण्याचा, राहण्याचा, व्यवसायाचा अधिकार आहे. शिवरायांनी जसं अठरापगड जातीच्या लोकांना घेऊन राज्य उभं केलं तसं सलोख्यानं काम करायचं आहे, अशी अल्पसंख्यांकांबाबत अजित पवार यांनी भूमिका मांडली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.