मंचर : मंचर ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर होऊन मंचर शहर नगर पंचायत स्थापन करण्याच्या प्रस्तावावर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सही करून मंजुरी दिली आहे. येत्या तीन ते चार दिवसात मंत्री महोदयांच्या उपस्थितीत मुंबई येथे मंचर नगर परिषदेची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना उपनेते, संपर्कप्रमुख, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.
यासंदर्भात आढळराव पाटील म्हणाले, मंचर शहराचा विस्तार झपाट्याने वाढत असून लोकसंख्या अंदाजे ९०३५७ इतकी आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर व्हावे अशी ग्रामस्थांची व मंचर ग्रामपंचायतीची सन २०१३ पासूनची मागणी सुरु होती. याकामी आपण शिवसेना शिष्ठमंडळासमवेत मंत्रालय, मुंबई येथे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांची वेळोवेळी भेट घेऊन सातत्यपूर्ण पाठपुरावा केला.
मागील आठवड्यामध्ये मंत्री महोदयांच्या उपस्थितीत माझ्यासह जिल्हा परिषदेचे गटनेते देविदास दरेकर, मंचरचे माजी सरपंच दत्ता गांजाळे, उपजिल्हाप्रमुख सुनील बाणखेले आदींसह संबंधित खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली.
यावेळी मंचर नगर पंचायतीचा प्रस्ताव दोन दिवसात मंजुरीसाठी सादर करण्याच्या सूचना मंत्री महोदयांनी या खात्याचे उपसचिव सतीश मोघे यांना दिल्या. त्यानुसार सदर प्रस्तावावर बुधवारी (ता 2 )मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वाक्षरी करून तसेच याबाबत स्वतःहून मला दूरध्वनी करून मंचरकरांसाठी आनंदाची बातमी कळविली. पुढील तीन ते चार दिवसातील सोयीची वेळ निश्चित करून मुंबई येथे पत्रकार परिषदेद्वारे मंचर नगर पंचायतीची घोषणा करणार असल्याचेही मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटल्याचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी संगितले.
आढळराव पाटील म्हणाले कि, मंचर नगर पंचायत प्रस्तावातील त्रुटींची पूर्तता करून परिपूर्ण अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर झाल्यानंतर मी जानेवारी २०२० मध्ये तत्कालीन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर व जिल्हाधिकारी सौरभ राव यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. याठिकाणी नगर पंचायत आवश्यक होणे गरजेचे आहे याचे महत्व त्यांना पटवून दिले. त्यानंतर सदर प्रस्तावास जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांनी अनुकूलता दर्शवत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ३० जानेवारी २०२० रोजी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यात आला. सदर प्रस्तावावर मा. विभागीय आयुक्त यांनीहि तात्काळ सहमती दर्शवत हा प्रस्ताव राज्याचे नगरविकास प्रधान सचिव यांच्याकडे १७ फेब्रुवारी २०२० रोजी मंजुरीसाठी सादर केला. त्यानंतर मी शिवसेना पदाधिकाऱ्यांसमवेत नगर विकास खात्याच्या प्रधान सचिवांची भेट घेतली असता केंद्र शासनाने २०२१ च्या जनगणनेपर्यंत नगरपंचायत व नगर परिषद स्थापन करण्याबाबतच्या प्रस्तावांना स्थगिती दिल्याची माहिती दिली. मात्र पुढील काही महिन्यांतच ही स्थगिती उठल्यानंतर मी पुन्हा मंत्री एकनाथ शिंदे यांची ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात भेट घेतली. या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश येऊन नगरपंचायतीचा प्रस्ताव तात्काळ सादर करण्याच्या सूचना मंत्री महोदयांनी दिल्या.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
मंचर नगरपंचायत स्थापन करण्यास मंजुरी मिळाल्याने व्यक्तिशः मला अतिशय आनंद झाला असून नगरपंचायतीच्या माध्यमातून यापुढील काळात शहराच्या पायाभूत व सर्वांगीण विकासाला चालना मिळून नागरिकांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होईल. मंचर नगरपंचायतीला मंजुरी मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे तसेच मंचर ग्रामस्थ व ग्रामपंचायतीचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अभिनंदन केले.
(संपादन : सागर डी. शेलार)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.