voter registration
voter registrationsakal

Voter Registration : पुणे जिल्ह्यातील भटक्या, विमुक्तांसाठी होणार खास मतदार नोंदणी मोहीम

पुणे शहर व जिल्ह्यात सध्या मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम सुरु आहे. यानुसार जिल्हा प्रशासनाकडून अधिकाधिक मतदार नोंदणी करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.
Published on

पुणे - जिल्ह्यातील भटक्या जाती, विमुक्त जमाती (व्ही. जे. एन. टी.) प्रवर्गातील नागरिक मतदार नोंदणीपासून वंचित राहू नयेत, यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय भटक्या-विमुक्त समाजातील नागरिकांसाठी विशेष मतदार नोंदणी मोहीम राबविण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना दिला आहे.

पुणे शहर व जिल्ह्यात सध्या मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम सुरु आहे. यानुसार जिल्हा प्रशासनाकडून अधिकाधिक मतदार नोंदणी करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून ही खास मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात येणार आहे. या खास मोहिमेमुळे जिल्ह्यातील भटक्या जाती, विमुक्त जमातींमधील नागरिकांची मतदार नोंदणीची टक्केवारी वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने येत्या १ जानेवारीपर्यंत वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या तरुण-तरुणींच्या मतदार नोंदणीसाठी छायाचित्रासह मतदार यादी अद्ययावत करण्यासाठीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. या कार्यक्रमानुसार मतदारांचा एकूण सहभाग वाढविण्यासाठीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

यानुसार विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. मतदानाच्या टक्केवारीत लक्षणीय वाढ करणे, हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. याआधी म्हणजेच गेल्या वर्षी ५ जानेवारी २०२३ रोजी जिल्ह्यातील मतदारांची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या यादीनुसार जिल्ह्यात एकूण ७९ लाख ५१ हजार ४२० मतदार आहेत.

पुणे जिल्ह्याची एकूण लोकसंख्या सुमारे १ कोटी ८ लाखांच्या आसपास आहे. त्यामुळे मतदार नोंदणी न झालेल्या व्यक्तींपर्यंत पोहाचणे हे निवडणूक विभागाचे कर्तव्य आहे. त्याअनुषंगाने हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या आदेशात नमूद केले आहे.

... आता वर्षातून चार वेळा मतदार नोंदणी

केंद्रीय निवडणूक आयोगाने १९५० च्या लोकप्रतिनिधित्व अधिनियमात सुधारणा केली आहे. या सुधारणेमुळे आता दरवर्षी वर्षातून चार विविध अर्हता तारखांवर आधारित मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात येणार आहे. यानुसार दरवर्षी १ जानेवारी, १ एप्रिल, १ जुलै आणि १ ऑक्टोंबर या तारखांपर्यंत वयाची अठरा वर्षे पूर्ण करणाऱ्या तरुण-तरुणींना त्यांची मतदार नोंदणी करता येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.