इंदापूर - एस. टी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांप्रमाणेच सेवा जेष्ठता निश्चितकरून एसटी महामंडळाचे राज्यशासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीचा शासन दरबारी तातडीने पाठपुरावा केला जाईल अशी ग्वाही सामान्य प्रशासन राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
दि. ४ नोव्हेंबर मध्यरात्री पासून एसटी कर्मचारी संघटनेने घोषित केलेल्या बेमुदत संप आंदोलनात इंदापूर कर्मचारी सहभागी असून त्यांचे आंदोलन इंदापूर बस आगार येथे सुरू आहे. मंत्री भरणे यांनी आंदोलनठिकाणी भेट देऊन कर्मचाऱ्यांच्या मागण्या सरकार दरबारी पोचवण्याचे आश्वासन दिले. यावेळी कर्मचाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीरनाम्यात एस. टी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविले जातील या दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याचे आवाहन मंत्री भरणे यांना निवेदनाव्दारे केले.यावेळी प्रताप पाटील, नगरसेवक अमर गाडे व पोपट शिंदे, रमेश शिंदे उपस्थित होते.
यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त आहेत. शेवटी ज्याचे जळते त्यालाच कळते. त्यामध्ये तुमची चूक नाही. एसटी कर्मचाऱ्यांचे काम धोकादायक असते. त्यांना रात्रंदिवस काम करावे लागते. त्यामुळे सदर मागण्यांविषयी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी बोलून बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत हा विषय मांडून मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. कोरोना संकटामुळे आर्थिक अडचणी आहेत. परंतु अडचणीतून मार्ग काढला जाईल. मागण्यांचा शासनदरबारी पाठपुरावा करून न्याय देण्याचा निश्चितप्रयत्न लहान किंवा मोठ्या भावाप्रमाणे केला जाईल ग्वाही राज्यमंत्री भरणे यांनी दिली.
दरम्यान, आत्तापर्यंत जवळपास पस्तीस एस. टी. कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाल्या असून त्याची दखल अद्याप कोणी घेतली नाही. त्यामुळे जोपर्यंत एसटीचे राज्यशासनामध्ये विलिनीकरण होत नाही तोपर्यंत संप चालूच ठेऊ अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.
दरम्यान दि. ७ नोव्हेंबर रोजी इंदापूर आगारातून एकही बस न गेल्याने प्रवाश्यांचे हाल झाले तर डेपोचे किमान ४ लाख रुपयांचे नुकसान झाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.