Katraj News : सरहद महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचा विक्रम! एकाचवेळी तब्बल १० हजार ७५० कोरफड रोपांची लागवड
कात्रज - सरहद महाविद्यालयामधील १५१८ विद्यार्थिनींनी एकाच दिवशी एकाच वेळी तब्बल १० हजार ७५० कोरफड रोपांची लागवड करून विक्रम केला आहे. या विक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली आहे. जागतिक पर्यावरण आरोग्य दिनानिमित्त शनिवारी (ता. २१) १५१८ विद्यार्थिनींनी दहा हजारांपेक्षा जास्त कोरफडीची लागवड केली.
जागतिक पर्यावरण आरोग्य दिन साजरा करण्याबरोबरच जैवविविधता त्याचे दैनंदिन जीवनातील उपयोग, औषधी गुणधर्म विद्यार्थ्यांना समजावेत या हेतूने उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, सचिव सुषमा नहार, सरहद संस्थेचे विश्वस्त शैलेश वाडेकर, अनुज नहार, माजी प्राचार्य डॉ. हनुमंतराव जाधवर, महाविद्यालयाच्या प्रभारी संगीता शिंदे, परिक्षक चित्रा जैन, वर्षा निंबाळकर, सरहद संस्थेच्या विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थिनी, स्वयंसेवक उपस्थित होते.